नवीन लेखन...

मिस तनकपुर हाजीर हो !

म्हशीचं नांव “तनकपुर ” आणि तेही “मिस ” म्हटल्यावर अपेक्षेप्रमाणे चित्रपट निघाला- यंत्रणांवर कोरडे मारणारा ! फार पूर्वी “जाने भी दो यारो ” नामक ब्लॅक कॉमेडी कॅटॅगिरीतील चित्रपट निघाला होता – त्यांतील लक्षणीय “भक्ती ” आता लोपलीय. (नाही म्हणायला ओम पुरी तनकपुरमध्ये आहे, पण तोही आता गेलाय.) त्यांत कॉर्पोरेशन, बिल्डर लॉबी , मरणाचे विनोदी धिंडवडे ( जे आजकाल सर्वदूर निघताहेत कोविड मुळे – विशेषतः महाराष्ट्रात ) सगळं हसवता -हसवता डोळ्यांच्या कडेला जमलेलं पाणीही जाणवू देणारं असं काहीतरी भन्नाट मिश्रण होतं. नंतर “मालामाल वीकली ” आणि “भेजा फ्राय (दोन अवतार)” हेही बघितले. पण ते निव्वळ विनोदाला खेचणारे प्रकार होते.

मात्र ” मिस तनकपुर ” एक पाऊल पुढे टाकत आपल्या पोलीस आणि न्याय यंत्रणेवर कोरडे ओढतो. तसं तर अलीकडे “गंगाजल “मध्येही पोखरलेल्या कायदा -सुव्यवस्थेच्या “खांबांवर” बोट ठेवलं होतं. इथेही सगळे कोळून प्यायलेले यच्चयावत महाभाग भेटतात.

म्हशीवर बलात्कार आणि त्याचे पुढचे सोहोळे मिस तनकपुर दाखवितो. बरीच व्यक्तिगत आणि कौटुंबिक छिद्रं झाकण्यासाठी गावातील एक वजनदार असामी (अन्नू कपूर) हे सगळं बालंट रचतो. त्यात पोलीस, गावचा सरपंच, ज्योतिषी , वकील , व्हेटर्नरी डॉ. सारे सामील होतात. मग न्यायालयातील साक्षी -पुरावे , म्हशींची अदलाबदल आणि शेवटी बलात्कारी पोराचे लग्न म्हशीशी लावण्याचा घाट असा सगळा वेडाचार इथे सविस्तर दिसतो. म्हणायला हे पोलिटिकल सटायर आहे – जबरदस्त तडाखे मारणारे ! पण सगळेच इतक्या निब्बर कातडीचे झाले आहेत की कोणाच्याच पाठीवर वळ उमटत नाहीत.

नायिका माया शेवटी या साऱ्याचा उबग येऊन नायकाला (अर्जुन ) म्हणते – ” मी खरं बोलू का?”

तिच्यावरच्या प्रेमाची शिक्षा ( बहिणीचे लग्न मोडणे, वडिलांनी आत्महत्या करणे, स्वतः मारहाण सहन करणे आणि वर अब्रू जाणे ) भोगणारा प्रियकर तिला एक वैश्विक सत्य सांगतो- ” बाई गं, इथे स्त्रियांच्या सांगण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.”

तीही “वधू “(?) असलेल्या म्हशीच्या जखमी पायाला आपला दुपट्टा बांधत म्हणते – ” खूप दुखत असेल ना गं ! आपल्याला असं तोंड दाबूनच सारं सहन करावं लागतं. मला शक्य नाही पण तू तरी लग्नमंडपातून पळ काढ .”

आणि वधू लग्नमंडपातून पळून जाते.

असे अजून किती सणसणीत रट्टे आपल्याला आवश्यक आहेत , माहीत नाही. पण माझ्यासाठी हा डोकं भणाणून टाकणारा अनुभव होता

FIR मधील खुणा म्हशीच्या अंगावर तपासणारा पोलीस अधिकारी आणि न्यायाधीश, पाण्यात डुंबणाऱ्या म्हशींच्या तांड्यात विहार करीत म्हशीची ओळखपरेड करणारे पोलीस, विहिरीत जीव दिलेल्या वडिलांना देवाचा प्रसाद रहाटाच्या दोरावाटे सोडणारे महाभाग , पोलीस ठाण्यात म्हशीचे दूध काढून रिचवणारे पोलीस , असे विनोदाचे आणि मानवी कंगोऱ्यांचे किती आकृतिबंध दाखवावेत दिग्दर्शकाने म्हणजे हा समाज त्याची नोंद घेईल?
शेवटी शेवटी हसण्याऐवजी हे दशावतार आपल्याला मूक करतात, सुन्न करतात, बधिर करतात.

हे सगळं क्रिएटिव्ह स्वातंत्र्य म्हणून मी सोडून देणार होतो, पण चित्रपटाच्या शेवटी “काव्यगत ” न्याय होत, आवाज येतो- “राजस्थान के सीकर जिले में एक स्थानीय अदालत ने भैंस के साथ यौनाचार करने के आरोप में एक व्यक्ति को पांच साल की सज़ा दी है!” या सत्य घटनेवर आधारित (BBC हिंदी – बुधवार, १२ सितम्बर, २०१२)
आता काय उरलं सुरलं डोकं फोडून घ्यायचं?

जशी ही बातमी आपल्या (किमान माझ्या वाचनात )आली नाही, तद्वत २०१५ चा हा चित्रपट असाच नोंदीविना अडगळीत गेला असेल.

किमान एवढी तरी शिक्षा हवीच ना अशा अगोचर “भाष्यकारांना ?”

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..