मी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून, फेसबुकवर लिहू लागलो. जसा मी लिहित होतो, त्यांच्या दसपट फेसबुकवरील लेख, कथा, कविता, माहिती वाचत होतो.. प्रत्येकाची लिहिण्याची पद्धत वेगवेगळी होती. त्यातले काही जण रोज लिहिणारे होते, तर काही चार दिवसांनी, जमेल तसं लिहित होते.. अनिता पाध्ये यांचं हिंदी-मराठी चित्रपटातील कलाकारांविषयीचं लिहिणं मला मनापासून आवडतं होतं.. काही काळानंतर ते थांबलं.. त्याच दरम्यान बाळू कुलकर्णी यांच्या पोस्ट माझ्या वाचनात येऊ लागल्या.. रोज पाच सहा नामवंत व्यक्तींच्या जीवनाचा आढावा घेणाऱ्या त्या पोस्ट मी नियमित वाचू लागलो.. त्या वाचनातून माझ्या ज्ञानात, रोजच भर पडत होती..
एकदा मी मेसेंजरवर कुलकर्णी सरांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सरांनी त्वरीत प्रतिसाद देऊन भेटण्याचे मान्य केले. यथावकाश एका सोमवारी सकाळी आम्ही भेटलो.
सर रिक्षाने ऑफिसवर आले. भरपूर गप्पा झाल्या. चहा झाला. सरांनी थोडक्यात जीवनपट सांगितला. लहानपणापासून मोठ्या कुटुंबात घालवलेले दिवस, शिक्षण, नातेवाईक, नोकरी, नोकरीतील बदल्या, मुंबईत रहाण्याची बदललेली ठिकाणं, जुन्या मुंबईतील सुटीच्या दिवशीची भटकंती.. भेटलेली तऱ्हेवाईक माणसं.. सर्व काही माझ्या डोळ्यासमोर सरांनी उभं केलं..
सरांना पुण्यात कोथरुड येथे येऊन चार वर्षे झालेली आहेत. सरांच्या रोजच्या पोस्ट वाचणारे वाचक असंख्य आहेत, मात्र ती वाचून व्यक्त होणारे, बोटांवर मोजण्याइतकेच.. ही खंत कुलकर्णी सरांनी अनेकदा फेसबुकवर व्यक्त केली.. आता मी लेखन बंद करणार असेही जाहीर केले.. अशावेळी अनेकांनी पोस्ट लिहिणं बंद करु नका, अशी विनवणी केली.. सरांनी पोस्ट लिहिणं चालू ठेवलं…
फेसबुक हा ज्येष्ठांसाठी एक प्रकारचा विरंगुळा आहे.. आपण जे लिहितोय, ते वाचायला कुणाला तरी आवडतंय.. हे मनाला सुखावून जातं.. यामध्ये एक वेगळंच मानसिक समाधान मिळतं..
मग असं ‘दुसऱ्यांना ज्ञानी करुन सोडणाऱ्या’ कुलकर्णी सरांना त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देणं, हे आपणा सर्व वाचकांचं आद्य कर्तव्यच आहे!!!
आपलाच शिष्य,
सुरेश नावडकर!
— सुरेश नावडकर.
१६-४-२२.
Leave a Reply