मित्रराज उगवताना,
सृष्टीवर घडे करामत,
आभाळ उतरे जळात,
त्याचे रूप दिसे पाण्यात,
आरस्पानी निळे सौंदर्य,
नजरा खिळवून ठेवी,
हलते डोलते आभाळ,
पाण्यात प्रतिबिंबित होई,
वृक्षांचे समूह किती,
धरतीवर कोण पेरती,
निळाईत उठून दिसती, पहा,हिरवाईने नटती ,–!!
तमाची शामत नसे, हळूहळू तो नाहीसा होई,
प्रकाशाचे किरण घेऊनी,
दिनकराचा प्रवेश होई,-!
अंधारी बुडालेली सृष्टी,
रंग तिचा बदलून जाई,
कडेकडेने सोनेरी सोनेरी,
पिवळसर उजेडाची घाई-!!
प्रकाशाचा रांजण भरुनी,
सूर्यराज दिमाखात येई,
तांबड्या सोनसळी किरणांची,
आता भाऊगर्दी होई,-!!
डोंगर आपल्या डुलक्या सोडुनी,
हात जोडुनी उभे राहती,
सूर्यसम्राटाचे स्वागत करण्यां,
भालदार चोपदार खडे होती,–!!!
भास्कर जसा उगवतसे,,-
पिवळसर प्रकाश सांडी, धरणीवरचे किरण ते,
करत, दिवसाची नांदी —!!!
©️ हिमगौरी कर्वे.
Leave a Reply