नवीन लेखन...

आमदार व मंत्री बच्चू कडू

आमदार व मंत्री बच्चू कडू यांचा जन्म ५ जुलै १९७० रोजी मु. बेलोरा ता.चांदूरबाजार जि.अमरावती येथे झाला.
ओमप्रकाश बाबूराव कडू यांना ओळखता काय, असे विदर्भात जाऊन विचारले तरी बहुतेकजण नकारार्थी माना हलवतील. पण बच्चू कडू असा उल्लेख केला, तर मात्र वेगळ्या परिचयाची गरज उरत नाही.

बच्चू कडू… महाराष्ट्रातल्या राजकारणातील एक झंझावती नाव…आक्रमक आंदोलन करणारा नेता अशीही बच्चू कडूंची ओळख. दिव्यांगांचा मुद्दा घेऊन त्यांनी राज्यभरात आक्रमक आंदोलन केली. प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आणि दिव्यांगाचे प्रश्न लावून धरले. दिव्यांगांच्या प्रश्नासाठी तर त्यांनी अनेक अधिकाऱ्यांना मारहाण केली. तर अनेक अधिकाऱ्यांना शेतकरी आणि दिव्यांगाच्या प्रश्नाची दखल घेण्यास भाग पाडलं. एकीकडे त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलनं केलीय तर दुसरीकडे आमदार म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले.

ओल्या दुष्काळामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळं शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी म्हणून बच्चू कडू यांनी मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेला. यावेळी पोलिसांनी बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र, तरीही बच्चू कडू यांचा आक्रमक बाणा कायम होता. त्यांच्या संघटनेचे नाव ‘प्रहार जनशक्ती’ हे आहे. रुग्ण आणि दिव्यांगांची सेवा हा त्यांच्या आयुष्याच्या ध्यास आहे. गरिबांसाठी लढणे हीच माझी प्रेरणा आणि श्वास असल्याचे ते सांगतात. ‘अपना भिडू, बच्चू कडू’ एवढीच घोषणा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करते.

बच्चू कडू यांचा जन्म इंदिराबाई कडू व बाबाराव कडू या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी झाला. एकूण सहा मुले आणि पाच मुली यांमध्ये बच्चूभाऊ हे त्यांचे दहावे अपत्य आहेत. . आई बाबांनी आवडीने मुलाचे नाव ‘ओमप्रकाश’ ठेवले. तर बच्चू कडू त्यांच्या मामांचे खूप लाडके, त्या मामांनी भाऊंचे नाव ‘बच्चू’ ठेवले व महाराष्ट्राला हक्काचे ‘बच्चूभाऊ’ मिळाले.
आजोबां पासून घरचा व्यवसाय म्हशी सांभाळून दूध विक्री करणे, हा होता. हा वसा आणि वारसा मिळालेले बच्चूभाऊ कॉलेजला जाऊ लागले आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढणारा एक लढाऊ विद्यार्थी नेता भेटला. कॉलेजात विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक बच्चूभाऊ लढले, ती त्यांची पहिली निवडणूक.. आणि तिथे ते ‘विद्यार्थी प्रतिनिधी’ म्हणून निवडून ही आले. पुढे विद्यार्थी जीवन संपल्यावर बच्चूभाऊ शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू लागले, पण एक नुकतेच ‘कॉलेज संपलेलं नवख पोरगं’ एवढीच त्यांची ओळख जुन्या पुढाऱ्यांना वाटायची.

पण श्वासात आंदोलन भिनलेला हा तरुण शेतकऱ्यांसाठी लढू लागला. त्यावर्षी अमरावती जिल्हा सहकारी बॅंकेने शेतकऱ्यांचे हप्ते थकल्याने त्यांचे ट्रॅक्टर जप्त केल्याच्या प्रकरणात बच्चू कडूंनी आपल्या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने जिल्ह्याला घाम फोडला. ते आंदोलन होते बॅंकेत ‘सुतळी ॲटमबॉम्ब’ फोडून केलेल्या अभिनव आंदोलन. या तरण्याबांड पोराच्या अनोख्या आंदोलनाने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परत मिळाले. या घटनेने परिसरात बच्चू कडूंच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झाले. त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला.

बाळासाहेबांच्या भाषणांचा त्यांच्यावर प्रभाव होता,ते शिवसेनेकडून चांदूर बाजार समितीचे सभापती होते. सभापती असताना त्यांनी संडास घोटाळा उघडकीस आणला, अपंगाना सायकल वाटपाचा निधी न दिल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यासोबत वाद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली. त्यांनी १९९९ मध्ये पहीली आमदारकीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यात त्यांचा अवघ्या १३०० मतांनी पराभव झाला.

बच्चू कडूच्या पहिल्या निवडणूकीत प्रचारा करिता पैसा नसल्याने त्यांच्या बऱ्याच मित्रांनी घरातील दागिने मोडली , पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले. आजही बच्चू कडू त्या मित्राचा अभिमानाने उल्लेख करतात. २००४ साली त्यांनी परत अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले, आज सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार आहेत. २०१९ मध्ये अचलपूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी पुन्हा विजय मिळविला.

आक्रमक, निडर अशी स्वत:ची ओळख निर्माण केली. रक्तदानाचे शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार बच्चू कडू आहे. बच्चू कडू यांनी आत्तापर्यंत १८ लाख रूग्णांना मोफत रूग्णसेवा दिली आहे. ‘मंगलाष्टकां’च्या नव्हे तर ‘राष्ट्रगीता’च्या सुरावटीवर व तालावर आपले शुभमंगल आटोपणारा हा अफलातून कार्यकर्ता. गरीब शेतकऱ्यांची कोंडी करणाऱ्या अधिकाऱ्याला एकदा चोप द्या, तो पुन्हा हिंमत करणार नाही, असे त्यांचे सडेतोड बोल असतात. ते कधी स्कूटरवर फिरतील, कधी पायीच भ्रमंती करतील. तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत शिदोरी खातानाही दिसतील. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी एकदा थेट मोदींच्या गुजरातेतील गावापर्यंत त्यांनी मोटरसायकलने धडक दिली होती. ‘सरकारी व्यवस्था निब्बर आहे. निवेदनांऐवजी गरिबांचा ठोसा बसला की अधिकारी सरळ होतात’, ही त्यांची थेट भाषा मतदारांना भावते. ‘बच्चूभाऊ अर्ध्या रात्रीही धावून येतो’ या विश्वासाचा त्यांच्या सलग विजयांमध्ये मोठा वाटा आहे..

२०१९ मध्ये महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर महाविकास आघाडीचा जन्म झाला व ‘शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस’ यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले तेव्हा त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन त्या सरकारला पाठिंबा दिला आणि यात या सरकार मध्ये बच्चूभाऊ कडू यांना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.नुकत्याच झालेल्या सत्ता बदलात ते शिंदे सरकार मध्ये सामील होणार आहेत.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..