
मूळ कथा-मॉडेल मिलियोनेर.
लेखक – ॲास्कर वाईल्ड (१८५४-१९००).
या कथेचे संक्षिप्त भाषांतर केले आहे श्री अरविंद खानोलकर यांनी. इंग्रजीतील अनेक उत्कृष्ट कथांना मराठीत भाषांतरित करुन त्या संक्षिप्त स्वरुपात मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम.
“मधुकर देशमुखइतका देखणा तरूण त्या गांवाने पूर्वी कधी पाहिला नव्हता.
सत्तावीस वर्षांचा नाकी डोळी नीटस, बांध्याने सडसडीत पण सशक्त, डोक्यावर भुरभुरणारे केस आणि चेहऱ्यावर सदैव प्रसन्नता असलेला मधुकर कॉलेजमधे दोनच वर्षे गेला होता परंतु तेवढ्यांत कितीतरी तरूणींची हृदयं काबीज केली होती पठ्ठयाने.
मुलांमधेही खूप लोकप्रिय होता मधुकर.
कारण त्याचा उमदा स्वभाव.
कुणालाही कसलीही मदत करायला मधुकर हजर असे.
तेही कुठलाही आव न आणतां.
त्यामुळेच गावच्या आबालवृध्दांनाही तो आपलासा वाटे.
गांवातील सर्व घरांत त्याला मुक्त प्रवेश होता.
अशा देखण्या आणि उमद्या स्वभावाच्या माणसाकडे असायला हवी होती अशी एक गोष्ट मात्र मधुकरकडे नव्हती.
ती म्हणजे लक्ष्मी.
▪
लक्ष्मी म्हणजे गृहलक्ष्मी नव्हे.
तर त्याच्याकडे पैसे नव्हते.
तो रहात होता ते घरही भाड्याचं होतं.
जुन्या भाडेपध्दतीने वडिलांनी घेतलेलं घर त्याच्या वाट्याला आल्यामुळे त्याला भाडं कमी भरावं लागत होतं.
त्याच्या वाट्याला हा शब्द फारसा बरोबर नाही.
कारण त्या घरावर हक्क सांगायला त्याला कुणी भावंडच नव्हती.
जवळचे कुणी नातेवाईकही नव्हते.
घर त्याला सहजच मिळालं होतं.
भाडं भरायला एखादा महिना उशीर झाला तरी त्याचा मालकही कटकट करणारा नव्हता.
तोही मधुकरचं भलं इच्छिणारा होता.
मधुकरच्या घरी मोजकं सामान होतं.
एक पलंग, एक टेबल, एक आरसा, थोडी भांडी, गॅस स्टोव्ह, इ. वस्तु त्याच्याकडे होत्या.
परंतु वडिलोपार्जित संपत्तीतून सदैव चरितार्थ चालवण्याएवढं उत्पन्न मुळीच नव्हतं.
परमेश्वराने रूप देऊन पाठवलेल्या मधुकरसारख्या तरूणाला असं उत्पन्न मिळणं हा दुग्धशर्करायोग झाला असता.
पण वडिलांनी उत्पन्नाचे कांहीच साधन मधुकरसाठी मागे ठेवले नसल्यामुळे तो योग हुकला होता.
▪
मधुकर तसा आळशी नव्हता.
पैसे कमावण्यासाठी त्याने तो कांही ना कांही सतत प्रयत्न केले होते.
मधे घरोघरी जाऊन चहाची पावडर विकण्याचं काम त्याने घेतलं होतं.
गावांत सर्व घरात त्याच स्वागत होत असल्यामुळे त्या कामांत बरा लाभ होत होता.
पण सात आठ महिन्यांतच तो कंटाळला.
ते काम त्याने बंद केले.
विमादलालाकडे त्याला मदत म्हणून काम करू लागला पण ते त्याने तीन महिन्यांतच बंद केले.
शेअरमार्केटमधे पैसे गुंतवून पहाण्या एवढे पैसे नव्हतेच पण एका शेअरदलालाला मदतनीस म्हणूनही तो कांही महिने काम करत होता.
अशी त्याने बरीच छोटी मोठी कामं केली होती.
पण त्याचा पाय कुठेच ठरत नव्हता.
कारण त्याला कोणत्याही कामाचा लवकरच कंटाळा येत असे.
पण तो लोकांकडून पैसे उधार घेत नव्हता.
कधीतरी कुणाकडे चहाला तर कधी जेवायला जाई.
पण एऱ्हवी स्वत:चं पोट भरण्या एवढं तो कांही ना कांही काम करून कमावत असे.
▪
भरीत भर म्हणून तो मालती नांवाच्या गांवातल्याच तरुणीच्या प्रेमांत पडला होता.
मालतीही सुंदर होती.
मधुकरचे प्रेम नाकारणे कोणत्याही मुलीला अशक्यच होते.
मालती तर स्वत:ही त्याच्या प्रेमात पडली होती.
त्यामुळे दोघांची जोडी गेलं वर्षभर इथे तिथे दिसत असे.
मधुकरचं उत्पन्न जेमतेम होतं म्हणून लग्न लांबणीवर टाकण्याचा विचार मालतीच्या मनांतही आला नव्हता.
कोंड्याचा मांडा करून संसार करायची जिद्द तिच्यांत होती.
मधुकरही त्या कारणासाठी लग्न लांबणीवर टाकू इच्छित नव्हता.
सैन्यामधून रिटायर्ड झालेल्या मेजरसाहेबांकडे तो मालतीचा हात मागायला गेला.
मेजरसाहेब थोडे विक्षिप्त समजले जात.
इतर गांवकऱ्यांप्रमाणे मेजरसाहेबही त्याला ओळखत होतेच.
त्यांनी त्याचे स्वागत केले.
चहा पाजला.
परंतु जेव्हां त्याने मालतीशी लग्न करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला, तेव्हा ते म्हणाले, “जरूर. तुला मालतीशी लग्न लावायला परवानगी जरूर मिळेल.
पण त्या आधी तू मला पन्नास हजार रूपये आणून दिले पाहिजेस.
मग खुशाल लग्न करा आणि सुखी रहा.”
▪
मधुकरला दहा हजारही एकरक्कमी मिळत नसत.
त्याची शिल्लक शून्य होती.
गावात दहाजणांकडे मागून पन्नास हजार जमवणे त्याच्या स्वभावाशी जुळत नव्हतं.
त्यामुळे त्यांच लग्न लांबणीवर पडलं होतं.
संपूर्ण गावाला विक्षिप्त मेजर साहेबांची ही अट माहित झाली होती.
मधुकर-मालतीचे हितचिंतक कांही बाही सल्ले देत असत.
कांही जणांनी त्या दोघांनी पळून जाऊन लग्न करावे आणि नंतर दुसरीकडे रहावे असाही सल्ला दिला होता.
मधुकरला तो अजिबात मान्य नव्हता.
त्याला विवाह सन्मानाने गांवातच करायचा होता.
दोघांना संसारही त्याच गावात करायचा होता.
उमद्या स्वभावाच्या मधुकरने असे सल्ले मनावर घेतले नाहीत.
पण त्याचबरोबर मेजरसाहेबांची अट पूर्ण करण्याचा कोणताही मार्ग त्याला सुचत नव्हता.
मधुकर-मालती यांची प्रेमकथा अशी एका विचित्र कोंडीत अडकून पडली होती.
▪
रमेश वाटवे हा मधुकरचा एक अवलिया मित्र होता.
तो चित्रकार होता.
बहुदा तो आपल्या ब्रशनी कॅन्व्हासवर कांही तरी चित्रे चितारीत उभा असे.
त्याचा एक छोटा स्टुडीओ होता.
तिथे त्याचे काम चाले.
तो आपल्या मित्रांच्या बाबतीत फारच चोखंदळ होता.
त्यामुळे त्याला फारच थोडे मित्र होते.
सालस, उमद्या आणि प्रसन्न स्वभावाच्या मधुकरला मात्र मित्र म्हणून स्वीकारणं त्याला सहज शक्य झालं होतं.
स्टुडीओत एऱ्हवी कुणाला प्रवेश न देणाऱ्या रमेशने मधुकरच्या प्रसन्न स्वभावामुळे त्याला काम चालू असतांनाही आत येण्याची परवानगी दिलेली होती.
त्या दिवशीही मधुकर असाच दुपारी चारनंतर सहज फिरत फिरत स्टुडीओत येऊन पोहोंचला.
रमेश ब्रशने कॅनव्हासवर समोर उभे असलेल्या माॅडेलचे चित्र काढत होता.
त्याने मधुकरचे स्वागत केले, “ये रे, मधुकर. बस इकडे.”
त्याचा हात सहजपणे भरभर चालत होता.
आंत येता येता मधुकरचे लक्ष मॉडेलकडे गेले.
▪
त्या दिवशीचे मॉडेल एक भिकारी होता.
त्याच्या अंगावरची चिंध्यासदृष कापडं त्याच्या दैन्यावस्थेची एका नजरेत जाणीव करून देत होती.
पण त्याहीपेक्षा त्याचा करूण आणि सुरकुतलेला चेहरा आणि त्याची क्षीण नजर कुणाच्याही
अंत:करणांत दया उत्पन्न करेल अशी होती.
दयाळू वृत्तीच्या मधुकरच्या मनांत भिकाऱ्याचे निर्जीव डोळे पाहून त्याच्याबद्दल खूप अनुकंपा दाटून आली.
‘अरेरे, कसा हालात दिवस काढत असेल हा ? ह्याच्यासाठी कांहीतरी करायलाच हवं.”
आपण फारसं कांही करू शकणार नाही ह्या जाणीवेने तो मनांत थोडा शरमिंदाही झाला.
एवढ्यांत रमेशला कुणीतरी बाहेर बोलावलं.
रमेशच्या चित्रांना सुंदर चौकटी करणारा कारागीर आला होता.
रमेश बाहेर गेला.
भिकारी तसाच उभा होता.
मधुकरने खिशात हात घातला.
त्याच्याकडे शेवटची दोनशे रूपयाची नोट होती.
त्या नोटेवर त्याला स्वत:चा पुढचा पूर्ण आठवडा
काढायचा होता.
तरीही क्षणभरही विचार न करतां त्या भिकाऱ्याची दयनीय अवस्था लक्षांत घेऊन दयार्द्र अंत:करणाने मधुकरने ती नोट आपल्या खिशातून बाहेर काढली.
सोफ्यावरून उठून तो झटकन त्या भिकाऱ्याकडे गेला आणि त्याने ती नोट त्या भिकाऱ्याच्या हातात सारली.
भिकाऱ्याने ती स्वीकारली.
एक मंद स्मितरेषा त्याच्या करूण चेहऱ्यावर क्षणभर उमटली.
तो वृध्द भिकारी हलक्या आवाजांत म्हणाला, “साहेब, धन्यवाद.”
मधुकर चटकन परत जागेवर येऊन बसला.
मधुकर विचार करत होता. खरं तर दोनशे रूपयांची मदत करून त्याला पुरेसे कपडेही घेता नसते आले.
नंतर कधी तरी ह्याच्यासाठी कांही तरी जरूर करायचे असं मनोमन ठरवून मधुकर जागेवर येऊन बसला.
रमेश परत आत आला.
त्याचे काम सुरू झाले.
पण मधुकर तिथून लौकरच बाहेर पडला.
▪
त्यानंतर चार दिवसांनी एका दुकानांत रमेशची आणि मधुकरची गांठ पडली.
मग रमेश त्याला बाजूच्या ईराण्याकडे चहाला घेऊन गेला.
मधुकरने त्याला विचारले, “रमेश, त्या दिवशीचे चित्र पूर्ण झाले कां ?”
रमेश म्हणाला, “हो, फ्रेम करून विकले सुध्दा गेले.”
मधुकरने विचारले, “रमेश, एका चित्राचा तुला किती मोबदला मिळतो ?”
रमेश म्हणाला, “पांच हजार रूपयांपासून पंचवीस हजार रूपयांपर्यंत कितीही.
चित्राचा विषय, रंग, वास्तवता, अशा अनेक गोष्टींवर चित्रांची किंमत अवलंबून असते.”
मधुकरने विचारले, “आणि तू मॉडेलला किती देतोस ?”
रमेश म्हणाला, “तीनशे ते एक हजार.”
मधुकर म्हणाला, “तुम्हां चित्रकारांना हृदय असते कां रे ?”
रमेश म्हणाला, “कां? ती आमच्या कलेची किंमत असते.
मॉडेल हे फक्त निमित्त असते.
त्याला तिथे उभे रहाण्याखेरीज कांहीच काम नसते.
आम्ही त्यांना निवडून त्यांच्यावर मेहरबानीच करत असतो.”
मधुकर म्हणाला, “जराही करूणा येत नाही तुला?
अरे मागच्या वेळी तो भिकारी किती दुरावस्थेत होता !
बिचाऱ्याला दोन वेळ अन्नही मिळतं नसावं !”
रमेश हंसला म्हणाला, “तो भिकारी. तुला त्याची दया आली ?
अरे, इतकं छान चित्र झालं आहे.”
मधुकर म्हणाला, “मला त्याला आणखी कांही मदत करावीशी वाटतेंय.
जरा बऱ्यापैकी कपडे द्यावेत, असंही वाटतय !”
हे ऐकून रमेश खो खो हंसू लागला.
▪
मधुकर म्हणाला, “कां हंसतोस ? मला वाटली त्याची दया.”
रमेश म्हणाला, “अरे मधुकर, तो कांही खरा भिकारी नव्हता.
तो एक सरदार घराण्यांतला करोडोंचा मालक आहे.
मी त्याला सरदार अशीच हांक मारतो.
तो माझी चित्रे नेहमी विकत घेतो.
बराच विक्षिप्त आहे.
भिकाऱ्याच्या वेशातलं त्याचं चित्र मी काढावं, ही त्याचीच सूचना.”
मधुकरचा उमदा चेहरा किंचित म्लान झाला.
तो म्हणाला, “खरं सांगतोयस ना !”
रमेश म्हणाला, “अगदी खरं !
समाजांतली ती एक प्रतिष्ठीत व्यक्ती आहे.
खूप मान आहे त्यांना.
त्या दिवशी तू गेल्यानंतर सरदार तुझी खूप बारीक चौकशी करत होते.
तू काय काम करतोस ?
तुझी कमाई किती ?
तुझ्या घरी कोण कोण आहे ?
मग मीही त्यांना तुझ्याबद्दल सगळं सांगितलं.
अगदी तुझ्या आणि मालतीच्या खोळंबलेल्या विवाहाबद्दल आणि मेजरसाहेबांच्या विचित्र अटी बद्दलही सांगून टाकलं.”
मधुकर म्हणाला, “झालं, म्हणजे आतां वाट लागली.”
मग अगदी अपराधी सुरात म्हणाला, “अरे, मी त्यांना खरा भिकारी समजलो आणि तू बाहेर गेला होतास तेव्हां दोनशे रूपये त्यांच्या हातांत सारले. किती मूर्ख मी.”
रमेश म्हणाला, “आतां मला संगती लागली की ते तुझी एवढी बारकाईने कां चौकशी करत होते त्याची.
तू त्यांना खरा भिकारी समजलास हा माझा विजय आहे कारण मी ते जुने कपडे त्यांच्यासाठी आणले होते.
पण तो त्यांचाही विजय आहे.
चेहऱ्यावर आणि डोळ्यांत उपाशी भिकाऱ्याचे भाव आणणे हे एका करोडपतीला किती कठीण जाऊ शकते, त्याची कल्पना येत्येय मला.”
मधुकर म्हणाला, “मी एवढ्या नामांकीत माणसाला ओळखतही नव्हतो आणि त्यांना खराच भिकारी समजलो, ते नक्कीच माझ्यावर रागावले असतील.””
▪
मधुकर तिथून घराकडे परततांना सरदारांची क्षमा कशी मागायची ह्याचाच विचार करत होता.
इतक्या मोठ्या व्यक्तीवर आपण दया करायला गेलो, त्याला भिकारी समजलो.
आता त्यांची क्षमा मागायची.
त्यांना कसं भेटायचं ?
काय बोलायचं ?
ह्याची योजना करत अपराधी मनाने तो त्या दिवशी झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर जायची तयारी करत असतांना त्याच्या दारावर टकटक ऐकू आली.
त्याने दार उघडलं.
बाहेर एक वकीलाच्या वेशांत असलेला गृहस्थ उभा होता.
त्याच्या हातातले पाकिट पाहून मधुकरच्या मनांत धस्स झालं.
बहुदा हा माफी मागणारी नोटीस घेऊन सरदारांच्या वतीने आला असावा.
कदाचित त्यांनी अपमानाची आर्थिक भरपाई पण मागितली असेल.
थरथरत्या हाताने त्याने वकीलांकडचे पाकीट घेतले. पाकीटाच्या वरच लिहिले होते, “मधुकर आणि मालती यांच्या लग्नासाठी आहेर- सरदार” आंतमधे पन्नास हजार रूपयांचा मधुकरच्या नांवे चेक होता.
लौकरच सुमुहूर्तावर मधुकर मालतीचे लग्न झाले.
लग्नांत अंतरपाट एका बाजूने रमेशने धरला होता तर दुसऱ्या बाजूने सरदारांनी स्वत: धरला होता.
सरदारांकडे पहात रमेश मनांत म्हणत होता, “करोडपती मॉडेल (चित्रवस्तू) मिळणं कठीण असतंच पण मॉडेल (आदर्श) करोडपती त्याहून दुर्मिळ असतो.”
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा-मॉडेल मिलियोनेर.
लेखक – ॲास्कर वाईल्ड (१८५४-१९००)
Leave a Reply