नवीन लेखन...

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग १०

Modern American Agriculture and Animal Farming - Part-10

सामिष किंवा आमिष खाद्य संस्कृती ही झाली शेती व्यवस्थापनाची अंतिम पायरी. परंतु खाद्य संस्कृतीचे औद्योगीकरण जितक्या झपाट्याने झाले त्यामानाने प्रत्यक्ष शेती व्यवसायाचे औद्योगीकरण बर्‍याच धीमेपणाने झाले. याची सुरुवात झाली ती शेती व्यवसायात यांत्रिकीकरणाने शिरकाव केला तेव्हापासून. परंतु या बदलाची झळ जाणवण्यासाठी विसावे शतक निम्मे सरून जावे लागले. दुसर्‍या महायुद्धानंतर खर्‍या अर्थाने शेतकी व्यवसायाच्या बदलत्या स्वरूपाने अमेरिकन शेतीचा आणि त्यायोगे एकंदरीत ग्रामीण अमेरिकेचाच चेहरा मोहरा बदलून टाकला. महायुद्धाच्या समाप्तीनंतर, युद्धसाहित्यासाठी लागणार्‍या रासायनिक उद्योगांचे, तत्परतेने शेतीसाठी लागणार्‍या रासायनिक खतांच्या कारखान्यात परिवर्तन करण्यात आले. रासायनिक खतांच्या सढळ वापरामुळे वाढणार्‍या शेती उत्पादनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी, शेतीव्यवसायाला नियोजनबद्ध व्यवस्थापनाची आणि अधिकाधिक यांत्रिकीकरणाची गरज भासू लागली. यामुळे शेती उत्पादन अधिकाधिक साचेबद्ध आणि एकसुरी होत गेले खरे आणि त्यातच तेलबिया, धान्य, गुरं, कोंबड्या, पालेभाज्या, फळं अशा विविध आणि संमिश्र उत्पादन करणार्‍या छोट्या छोट्या कौटुंबिक फार्म्सच्या र्‍हासाची बीजं रोवली गेली.

संपूर्ण विसावं शतकभर रासायनिक, जैविक, यांत्रिक तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शेती उत्पादनाची कमान सतत चढतीच राहिली. त्यामुळे भरमसाठ उत्पादन, त्यातून शेतीमालाच्या पडणार्‍या किंमती आणि त्यातून उद्भवणारी शेतकर्‍यांवरची आर्थिक बिकट संकटे, अशा दुष्टचक्रांची आवर्तनं ठरावीक कालावधीनंतर येतच राहिली. बहुतेक नवीन तंत्रज्ञानाचा भर हा महागडी उपकरणं, अवजड आणि मोठाली यंत्रसामग्री, लांब आवाक्याची फवारणी यंत्रणा, अशा साधनांच्या जोरावर उत्पादन वाढवण्यावर असायचा. अर्थात अशा गोष्टींचा लाभ छोट्या शेतकर्‍यांपेक्षा मोठ्या शेतकर्‍यांनाच अधिक व्हायचा. याचा परिणाम म्हणजे येणार्‍या प्रत्येक नव्या आरिष्टाबरोबर हजारो, लाखो छोटे शेतकरी शेती व्यवसायातून उठवले जायचे आणि त्यांची जमीन गिळंकृत करुन मोठे फार्म्स अधिकाधिक मोठे होत जायचे.
औद्योगिकरणाची अंतिम पायरी म्हणजे ‘उभे एकत्रीकरण’ (vertical consolidation); जे उत्पादनाच्या विविध टप्प्यांमधे किंवा कार्यात्मक स्तरांवर (between stages or levels) होते. यात उत्पादनाच्या बरोबरच प्रक्रिया (processing), वितरण आणि किरकोळ विक्रीचा देखील समावेश होतो. याच्या उलट ‘आडवे एकत्रीकरण’ (horizontal consolidation) हे उत्पादनाच्या विविध टप्प्यांअंतर्गत (within stages) होते. अमेरिकन खाद्य संस्कृतीमधे ‘आडवे एकत्रीकरण’ प्रथम सुरू झाले ते अन्नपदार्थांच्या प्रक्रियेच्या (food processing) क्षेत्रामधे आणि त्यानंतर हे लोण किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात देखील पोहोचले. शेतीच्या क्षेत्रात आडव्या एकत्रीकरणाची प्रक्रिया त्यामानाने लवकर सुरू झाली परंतु तिची प्रगती मात्र संथ गतीने होत गेली.

ज्या कंपन्यांनी आडव्या एकत्रीकरणामधे आपले प्रस्थ निर्माण केले होते त्या कंपन्यांना ‘उभे एकत्रीकरण’ करण्याची उत्तम संधी होती. उदाहरणार्थ अन्न पदार्थांवर प्रक्रिया करणार्‍या सर्वात मोठ्या कंपन्यांनी स्वत:चं कार्यक्षेत्र केवळ प्रक्रियेपुरतं मर्यादित न ठेवता, सर्वप्रथम उत्पादनाच्या आणि वितरणाच्या क्षेत्रात देखील आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. अगदी १९३० च्या दशकात देखील भाजीपाल्यावर प्रक्रिया करणार्‍या कंपन्यांनी स्वत: देखील भाजीपाला उत्पादनाच्या क्षेत्रात उडी घेतली होती. एवढंच नव्हे तर इतर स्वतंत्र भाजीपाला उत्पादकांशी करार करून त्यांचे सारे उत्पादन विकत घेण्याची प्रथा देखील सुरू केली होती. सरतेशेवटी अन्न पदार्थांवर प्रक्रिया करणार्‍या मोठमोठ्या कंपन्यांनी उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधल्या घाउक विक्रेत्याला घरी बसवले आणि त्यांच्या पायाभूत सुविधां (infrastructure) च्या जागी स्वत:चे बांधील विक्रेते, स्वत:च्या मालकीची अद्ययावत गोदामे, आणि शीतगृहे, मालाच्या वाहतुकीसाठी ट्रक्स आणि मालगाड्यांचा ताफा, असा सारा कारभार उभा केला. स्वत:चे स्थान मजबूत करण्यासाठी आणि संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी या कंपन्यांनी दोन मार्गांचा अवलंब केला. एक म्हणजे सर्व कारभारावर स्वत:चा मालकी हक्क प्रस्थापित करायचा, दुसरा म्हणजे स्वत: उत्पादनाची जबाबदारी न घेता वेगवेगळ्या फार्म्सबरोबर सर्वसमावेशक असे करार मदार करायचे. या दुसर्‍या प्रकारामधे उत्पादनाची जबाबदारी वेगवेगळ्या फार्म्सच्या गळ्यात टाकून त्यांचे सारे उत्पादन बांधून घ्यायचे अशी पद्धत असते. मांस उत्पादनाच्या क्षेत्रामधे हा दुसरा प्रकार अधिक प्रचलित झालेला दिसून येतो.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..