अमेरिकन शेती खात्याच्या (United States Department of Agriculture) २००७ सालच्या सर्वेक्षणाकडे नजर टाकली तर अमेरिकन शेती व्यवसाय व पशुसंवर्धनाच्या संदर्भात बरीच उद्बोधक माहिती मिळू शकते. २००७ साली अमेरिकेत सुमारे २२ लाख फार्म्स होते. मागे उल्लेख केल्याप्रमाणे अमेरिकन संदर्भात फार्म्स ही संज्ञा किंवा संकल्पना लवचिकपणे वापराय़ची आहे. प्रत्यक्ष कृषी उत्पादन तसेच पशुसंवर्धनाशी निगडीत सर्व व्यवसायांना त्यात समाविष्ट करायचे आहे.
त्यांच्या मालकांच्या जीवनपद्धतीमधे ’फार्मिंग’ला काय स्थान आहे यावरून हे फार्म्स वेगवेगळ्या प्रकारात मोडतात. यातील दोन सर्वात मोठ्या प्रकारात मोडणारे फार्म्स म्हणजे उपजीविकेसाठी वापरण्यात येणारे फार्म्स (३६%) आणि निवृत्ती फार्म्स (२१%).
उपजीविकेसाठी वापरण्यात येणारे फार्मस् – यांचे वार्षिक उत्पन्न २५०,००० डॉलर्सपेक्षा कमी असते आणि मुख्य मालक शेती शिवाय इतर काही तरी नोकरी /व्यवसाय उत्पन्नाचे साधन म्हणून दाखवतो.
निवृत्ती फार्मस् – यांचे देखील वार्षिक उत्पन्न २५०,००० डॉलर्सपेक्षा कमी असते आणि शेतीला निवृत्ती नंतरचा व्यवसाय म्हणून स्वीकारलेला असतो.
अनेक कुटुंबांमधे शेती व्यवसाय हा पिढ्यान पिढ्या चालत आलेला असतो. यातले बरेच फार्म्स आकारमानाने प्रचंड मोठे असतात. अशा या ‘मोठ्या खानदानी फार्म्स’ आणि ‘अतिशय मोठ्या खानदानी फार्म्स’चे वार्षिक उत्पन्न अनुक्रमे २५०,००० ते ५००,००० डॉलर्स आणि ५ लाख डॉलर्सपेक्षा अधिक असते.
वर उल्लेखल्या प्रमाणे पशुसंवर्धन तसेच शेतीच्या फार्म्सची घटत जाणारी संख्या, वाढत जाणारे आकारमान आणि थोड्याच परंतु सामर्थ्यवान फार्म्सच्या हातात होत चाललेले उत्पादनाचे आणि एकंदरीतच व्यवसायाचे केंद्रीकरण हा कल (trend) २००७ च्या सर्वेक्षणामधे पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे. उदाहरणार्थ, २००२ साली १४४,००० फार्म्स मिळून सुमारे ३/४ अमेरिकन शेती मालाची (किंमतीच्या स्वरूपात) निर्मिती करत होते, तर २००७ साली केवळ १२५,००० फार्म्स मिळून तेव्हढ्याच उत्पादनाची निर्मिती करत होते. वर उल्लेखलेल्या ‘मोठ्या खानदानी’ आणि ‘अतिशय मोठ्या खानदानी’ फार्म्सची संख्या, एकूण फार्म्सच्या संख्येच्या केवळ ९% आहे; परंतु एकूण शेती उत्पन्नाच्या (किंमतीच्या स्वरूपात) जवळ जवळ २/३ (६६% हून अधिक) उत्पादन हे फार्मस् करतात. वेगवेगळ्या राज्यांच्या पातळीवर जाऊन दाखले द्यायचे झाले तर मिसुरी या राज्यातले केवळ ७% शेतकरी त्या राज्यातले ३/४ शेतीमालाचे उत्पादन करतात. कान्सास राज्यामधे २/३ शेती उत्पादन हे ३% हून कमी फार्म्सवर होतं. यावरून या प्रचंड मोठ्या फार्म्सच्या उत्पादन क्षमतेची कल्पना यावी.
डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply