अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील मनुष्यबळावर व पशुबळावर आधारलेल्या अमेरिकन शेतीचे विसाव्या शतकात झपाट्याने यांत्रिकीकरण होत गेले. शास्त्रीय संशोधनाची भक्कम बैठक, तंत्रविज्ञानातील प्रगती, रासायनिक खते, आधुनिक जंतुनाशके, सुधारित बियाणे, रोगराईचा समर्थपणे मुकाबला करू शकणार्या पिकांच्या नवीन प्रजाती, या सर्वांमुळे कृषी उत्पादनात नेत्रदीपक वाढ झाली. पशुसंवर्धनाच्या क्षेत्रात देखील शास्त्रीय प्रगती व यांत्रिकीकरणामुळे फार्म्सना कारखान्यांचे रूप आले. कृषी तसेच पशुसंवर्धनाच्या क्षेत्रात फार्म्सचे आकारमान मोठे होत जाणे हा कल (trend) सुरू होऊन गेला. कमी मनुष्यबळाच्या जोरावर, कमी कष्टात, प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पादन, हा जणू नवीन मूलमंत्र होऊन गेला. प्रगतीचे शिखर गाठले गेले आणि ‘आता याच्यापुढे काय’ असा प्रश्न भेडसावू लागला. शेती व पशुसंवर्धनाच्या औद्योगीकरणाचे दुष्परिणाम जाणवायला लागले. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातली ही परिस्थिती भविष्यात कोणते रूप धारण करते हे आत्ताच सांगणे अवघड आहे. पुढचा मार्ग हा, खनिज तेलावरचे परावलंबीत्व कमी करण्याचा प्रयत्न, पर्यावरणाचा र्हास थांबवण्यासाठी वाढत असलेली जागरुकता, नैसर्गिकरित्या उत्पादन केलेल्या अन्नाकडे होत चाललेला ग्राहकांचा कल, वाढत्या जागतिक लोकसंख्येला पुरवठा करण्यासाठी अन्न उत्पादन वाढवण्याचे आव्हान, अशी विविध ध्येय धोरणे संभाळण्याची तारेवरची कसरत असणार आहे यात शंका नाही. येत्या दशकातील सरकारी धोरणे व जागतिक बाजारपेठेचे स्वरूप अमेरिकन कृषी/पशुसंवर्धनाला जी दिशा देईल त्याचे दूरगामी परिणाम झाल्याशिवाय रहाणार नाहीत एवढे मात्र खरे !
— डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply