नवीन लेखन...

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ५

Modern American Agriculture and Animal Farming - Part-5

फार्मपासून ते जेवणाच्या टेबलापर्यंतचा या बीफचा प्रवास बघणं मोठं मनोरंजक ठरेल. बीफ फार्म्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ब्रीडींग फार्म्सवर बीफ गायींचं प्रजनन केलं जातं आणि वासरांची पैदास केली जाते. जन्मत: वासराचं वजन ६० ते १०० पाउंड असतं. अशा गाया आणि त्यांची दूध पिणारी वासरं मोठमोठ्या चराऊ कुरणांवर (ranches) चरत फिरत असतात. साधारणपणॆ वासरं ६ ते १० महिन्यांची झाल्यावर त्यांना कळपापासून दूर केलं जातं. या वासरांची लिलावात विक्री केली जाते आणि त्यातील धष्टपुष्ट वासरं फिडलॉट मधे पाठवली जातात. लिलावात विक्री होऊ न शकलेली वासरं ही साधारण वयाने लहान आणि वजनाने कमी असतात. अशा वासरांना फिडलॉट मधे पाठवण्या ऐवजी एखाद्या स्टॉकरकडे (stocker) पाठवले जाते. या स्टॉकरकडे ती वासरं पुढचे ४-६ महिने, चराऊ कुरणांवर आणखी पोसली जातात आणि तिथून त्यांची रवानगी फिडलॉट मधे केली जाते. हे फिडलॉट किंवा फिडयार्डस्‌ म्हणजे जणू बीफ बनवायच्या नैसर्गिक फॅक्टरीज असतात. या ठिकाणी बंदिस्त कुंपणांच्या आड या जनावरांना मोठमोठ्या समूहांमधे ४ ते ६ महिने ठेवलं जातं. या ठिकाणी त्यांना चरायला कुरणं नसतात. उघड्या माळरानावर आरामात चरत फिरण्याऐवजी दिवसाच्या ठरावीक वेळेला त्यांना पशुखाद्य खायला दिलं जातं. काही वेळा, अधिक जोमदार वाढीसाठी त्यांना पूरक पोषक द्रव्ये, हॉर्मोन्स, ऍंटीबायोटिक्स दिले जातात. अमेरिकेतील ९९% बीफ हे या अशा फीडलॉट मधे वाढलेल्या जनावरांपासून तयार झालेलं असतं.

१९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत बहुतेक सारे बीफ उत्पादन हे घरगुती स्वरुपाच्या छोट्या फार्म्सवर चालायचे. हे शेतकरी स्वत:च्याच जमिनीवर जनावरांसाठी धान्य/चारा उगवत. वासरे जन्माला आल्यापासून, ते ती पूर्ण वाढून त्यांची कत्तलखान्यात रवानगी हॊईपर्यंत सारा कारभार त्या छोट्या फार्मवरच व्हायचा. १९६०-७० च्या दशकामधे जनावरांच्या खाद्यामधे आमूलाग्र बदल झाला. त्यामुळे जनावरांच्या वयानुसार विशिष्ट प्रकारचे खाद्य देऊन त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देण्यात येऊ लागला. याचेच फलित स्वरूप म्हणजे, शेतकर्‍याच्या छोट्या फार्मवर धान्य, चारा उगवून जनावरांचे संगोपन करण्याऐवजी, मोठमोठ्या व्यावसायिक फिडलॉट्समधे त्यांची रवानगी होऊ लागली. त्यामुळे या सुमारास, मिडवेस्ट आणि पश्चिमेकडच्या राज्यांमधे अशा प्रचंड मोठमोठ्या फिडलॉट्सची संख्या वाढू लागली.

१९६४ साली अमेरिकेतील ६०% हून अधिक बीफ हे १००० हून कमी जनावरांची क्षमता असलेल्या फिडलॉट्समधे तयार होत होतं. पुढच्या चार दशकांत, फिडलॉट्सची क्षमता सातत्याने वाढतच गेली. त्यामुळे २००७ साली, प्रत्येकी १६००० जनावरांना एकाचवेळी पोसण्याची क्षमता असलेले २६२ फिडलॉट्स अमेरिकेमधे होते. (यातल्या सर्वात मोठ्या फिडलॉटची, एकाचवेळी १००,००० जनावरांना खाऊन पिऊन धष्ट्पुष्ट करण्याची क्षमता आहे). आज या २६२ फिडलॉट्समधून अमेरिकेतील सुमारे ६०% बीफ उत्पादन केलं जातं. यावरून, अमेरिकेतील बीफ उत्पादन हे कसे थोड्याच परंतु मोठमोठ्या फिडलॉटसमधे एकवटत आहे याची कल्पना येईल. हे फिडलॉट्स बहुतांशी स्वयंपूर्ण असतात. ते स्वत:च धान्य विकत घेतात, स्वत:च्या मालकीच्या पशुखाद्य बनवण्याच्या कारखान्यांमधे पशुखाद्य बनवतात, आपल्या ट्रक्सच्या ताफ्यामार्फत या पशुखाद्याची ने आण करतात. तसेच त्यांच्या पदरी पशुवैद्यक, जनावरांसाठी संतुलित आहार बनवणारे पशुखाद्य विशेषज्ञ (nutritionist), सेल्समन, असा सारा ताफा असतो.

‘वाढता वाढता वाढे’ हा प्रकार केवळ फार्म्सच्याच नाही तर कत्तलखान्यांच्या बाबतीतही दिसून येतो. अर्थात इथले कत्तलखानेही अत्याधुनिक, स्वच्छ आणि पूर्णपणे यांत्रिकीकरण झालेले असतात. एकेका कंपनीच्या मालकीचे अनेक ठिकाणी कत्तलखाने असतात आणि त्यांचे व्यवस्थापन पूर्णपणे व्यावसायिकपणे होत असते.

डॉं. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..