पूर्वी गायीचं दूध हातानं काढावं लागायचं. आता बहुतेक ठिकाणी यंत्रांच्या सहाय्यांनी मिल्किंग पार्लर्समधे गायीचं दूध काढलं जातं. त्यामुळे पूर्वी छोट्या कौटुंबिक फार्म्सवर आई, वडील, मुलं मिळून ३०-४० गायींचं दूध काढता काढता थकून जायची. आता मोठमोठ्या डेअरी फार्म्सवर मिल्किंग पार्लरमधे हजारो गायींचं दूध दिवस रात्र काढलं जातं. बहुतेक डेअरी फार्म्सवर लॅटीन अमेरिकन मजूर हे दूध काढण्याचं काम करतात. दिवसातून दोनदा दूध काढलं जात असल्यामुळे बहुतेक मोठ्या फार्म्सवर हे मजूर दिवसपाळी / रात्रपाळीच्या कामगारांसारखे काम करतात. काही मोठ्या फार्म्सवर तर दिवसातून दोनच्याऐवजी तीन वेळां दूध काढलं जातं. त्यामुळे जवळ जवळ ८ तासांची एक अशा तीन कामाच्या पाळ्या चालू असतात.
हे मिल्किंग पार्लर बहुदा फार्मवरच्याच एखाद्या स्वतंत्र इमारतीत असते. दिवसाच्या / रात्रीच्या ठरावीक वेळेला दुभत्या गायींना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून चालत चालत या मिल्किंग पार्लर पर्यंत आणले जाते. तिथे त्यांना पाण्याचे फवारे मारून साफ सफाई करून दूध काढण्यासाठी तयार केले जाते. मिल्किंग पार्लरच्या क्षमतेनुसार एका वेळी साधारणपणे ८, १२, २४ किंवा ४८ गायी मिल्किंग पार्लरमधे घेतल्या जातात. गायी देखील शिकवल्याप्रमाणे न्हाव्याच्या दुकानात एकेका खुर्चीवर गिर्हाईकाने बसावे, त्याप्रमाणे एकेका मशीन समोर जाऊन उभ्या राहतात. गायींची उभी राहण्याची व्यवस्था अशी असते की गायी दोन बाजूंना समांतर रांगांमधे किंवा वर्तुळाकार आकारात उभ्या राहतात. मधल्या भागात ४ फूट खोलीचा खड्डा असतो त्यात दूध काढणारे मजूर उभे असतात. प्रत्येक गायीची कास साफ करणे, तिच्या आचळांना मशीनचे कप लावणे, प्रत्येक मशीन व्यवस्थित चालले आहे की नाही ह्याचेवर वरचेवर लक्ष ठेवणे, दूध काढून झाल्यावर आचळापासून मशीन दूर करणे, पुन्हा आचळावर जंतूनाशक औषध लावणे, ही सारी कामे हे दोन तीन मजूर धावून धावून करत असतात. प्रत्येक गायीच्या पुढ्यात, तिचे दूध काढले जात असताना खाद्य उपलब्ध असते, त्यामुळे एकीकडे यंत्राने दूध काढले जात असताना दुसरीकडे गायी शांतपणे खात असतात. सहा-सात मिनिटात दूध काढून संपले की सार्या गायी हलत डुलत आपल्या रहात्या ठिकाणी जाण्यासाठी चालू लागतात. गायींच्या एका बॅचचे दूध काढून संपले की मजूर तत्परतेने पाण्याचे फवारे मारून मिल्किंग पार्लर पुनश्च साफ करून ठेवतात आणि पुढच्याच मिनिटाला गायींची पुढची बॅच दूध काढून घेण्यासाठी मिल्किंग पार्लरमधे शिरते. हा प्रकार अव्याहत काही तास चालू रहातो आणि फार्मवरच्या शेकडो किंवा हजारो गायींचे दूध चार-सहा तासांत काढून होते. मधे काही तासांची मोकळीक आणि ‘पुनश्च हरी ओम’ म्हटल्याप्रमाणे गायी हलत डुलत मिल्किंग पार्लरची वाट चालू लागतात. काही फार्म्सवर जिथे दिवसातून तीन वेळा दूध काढले जाते तिथे तर शेवटच्या गायीचे दूध काढून होईपर्यंत पुन्हा पहिल्या गायीचे दूध काढायची वेळ येते. त्यामुळे दुधाचा हा महापूर दिवसरात्र अव्याहत चालूच असतो.
वराहपालन देखील असेच औद्योगिक स्वरुपाच्या फार्म्सवर होऊ लागलं आहे. वराह उत्पादनाचे तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात वराहाची पैदास केली जाते. या ठिकाणी माद्या पिल्लांना जन्म देऊन त्यांना दोन-तीन आठवड्यांपर्यंत पोसतात. या सुमारास त्यांचे वजन ८ ते१२ पाउंड असते. दुसर्या टप्प्यात या पिल्लांना पुढचे सहा आठवडे खायला घालून त्यांचे वजन ४०ते ५५ पाउंड होईपर्यंत त्यांना वाढवतात. शेवटी तिसर्या टप्प्यात सहा महिन्यांपर्यंत या पिल्लांचे पोषण केले जाते आणि ती साधारणपणे २५० ते २९० पाउंड वजनाची झाली की त्यांची विक्री होते. साधारणपणे १९९२ पर्यंत बहुतेक सारे फार्म्स वराहांच्या उत्पादनाचे हे तिन्ही टप्पे स्वत:च संभाळत असायचे. परंतु आता असे फार्मस् सापडणं अवघड होत चाललं आहे. मोठमोठ्या कंपन्या आता अनेक फार्म्सना हाताशी धरून सारा कारभार आपल्या हातात एकवटू बघत आहेत. फार्म्स देखील या तीन पैकी एखादाच टप्पा हाताळण्याचे कौशल्य मिळवू लागले आहेत.
वराहपालनाच्या उद्योगातील कंपन्या लहान आणि मध्यम आकाराच्या फार्म्सना गिळंकृत करून मोठ्या होत चालल्या आहेत. आज अमेरिकेत दर वर्षी मार्केटमधे येणार्या सुमारे १०० दशलक्ष वराहांपैकी जवळ जवळ ७५% वराह केवळ ४० मोठ्या कंपन्यांच्या अखत्यारीत येतात. यावरून या मोठ्या कंपन्यांचा मार्केटमधील प्रभाव आणि त्यांची दादागिरी समजून यावी.
— डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply