नवीन लेखन...

आधुनिक हृदयशल्यचिकित्सा: एक प्रवास

हृदय-रोगाची व्याप्ती व तीव्रता प्रत्येक रुग्णामध्ये भिन्न असते. कधी कधी केवळ औषधोपचार पुरेसे नसतात. अशावेळी हृदय-रोगचिकित्सक शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवितात.

आज जरी आपल्याला यातील बऱ्याच शस्त्रक्रिया अगदी सोप्या ‘रुटीन’ वाटत असल्या तरी शंभर काय अगदी पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती फारच निराळी होती. हृदय-प्रत्यारोपण ही सगळ्यात वरची पायरी होती पण तेथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याआधी बरेच प्रयत्न झाले. खरेतर १८९६ मध्येच पहिली हृदय-शस्त्रक्रिया करण्यात आली.

जर्मनीतील फ्रांकफुर्ट येथील डॉ लुडविग ऱ्हेन यांनी १८९६सालात एका रुग्णाच्या हृदयाला भोसकण्यामुळे झालेली जखम यशस्वीपणे बरी केली. ही हृदयावर केलेली पहिली शस्त्रक्रिया मानली जाते. डॉ लुडविग ऱ्हेन यांनी केलेली शस्त्रक्रिया संपूर्णपणे यशस्वी झाली. १८९६च्या पहिल्या हृदय-शस्त्रक्रियेनंतर १९६७मध्ये हृदय-प्रत्यारोपणाचा टप्पा गाठेपर्यंत हृदय-शल्यचिकित्सेने बरीच मोठी मजल मारली आहे. हृदयाशी निगडीत बरेच विकार, उदाहरणार्थ ईश्चेमिक हार्ट डिसीज, जन्मजात असलेला हृदय-रोग, हृदयाला असलेले छिद्र किंवा हृदयाच्या झडपांना झालेली इजा अशा कितीतरी विकारांवर शस्त्रक्रिया करून इलाज केला जातो. पण या प्रत्येक प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी खूप प्रयत्न झाले व त्यानंतरच त्या यशस्वी होऊ लागल्या.

१८९६च्या पहिल्या शस्त्रक्रियेपासून १९६७च्या डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांनी केलेल्या हृदय-प्रत्यारोपणापर्यंतची सारी वाटचाल अतिशय रोचक म्हणावी अशीच आहे. त्यात १९५३ सालातील डॉ जॉन गिबन यांनी केलेली  ‘ओपन-हार्ट सर्जरी’, १९५९ मधील स्वीडनमध्ये डॉ अके सेनिंग यांनी केलेली  ‘पेस-मेकर’ ची शस्त्रक्रिया व १९६४मध्ये रशियात डॉ कोलेसोव्ह यांनी व १९६६मध्ये अमेरिकेतील ह्युस्टन येथील  डॉ मायकेल डीबेकी यांनी यशस्वी केलेली ‘बायपास’ची शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.

हृदय-शल्यचिकित्सेतील महत्त्वाचे टप्पे अधोरेखित करणारे टपाल तिकीट भारतीय टपाल खात्याने १९९६मध्ये प्रसृत केले. निमित्त होते पहिल्या हृदय-शस्त्रक्रियेच्या शताब्दीचे !
हृदय-शल्यचिकित्सेतील महत्त्वाचे टप्पे अधोरेखित करणारे टपाल तिकीट भारतीय टपाल खात्याने १९९६मध्ये प्रसृत केले. निमित्त होते पहिल्या हृदय-शस्त्रक्रियेच्या शताब्दीचे !

ओपन हार्ट सर्जरी या  शस्त्रक्रियेचा विशेष उल्लेख करण्याचे कारण म्हणजे ओपन हार्ट सर्जरीचे तंत्रज्ञान विकसित होण्यापूर्वी,  रुग्णाची हृदय-क्रिया थोडीशी हळू करून शस्त्रक्रिया केली जात असे. हृदयावर शस्त्रक्रिया करताना हृदयाचे काम थांबविता येत नव्हते. यातून मार्ग काढण्यासाठी त्यावेळी हृदय-शल्यचिकित्सकांनी विविध उपाय अनुसरले. सुरुवातीच्या काळात त्यामुळे ‘क्लोझ्ड-हार्ट’ अथवा आंधळी शस्त्रक्रिया म्हणजे हृदयाचे काम न थांबविता शस्त्रक्रिया करण्यात येत असे.

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान डॉ डवाईट हार्केन लष्करात शल्यचिकित्सक होते. त्यांचे कौशल्य असे की त्यांनी शस्त्रक्रिया केलेले रुग्ण दगावण्याची शक्यता अगदी नगण्य होती. अशा शस्त्रक्रिया करण्याची त्यांनी एक पद्धती विकसित केली होती. १९४८च्या दरम्यान डॉ डवाईट हार्केन व फिलाडेल्फिया शहरातील डॉ चार्ल्स बेले यांनी स्वतंत्रपणे हृदयाच्या झडपेवर हार्केन ची पद्धत वापरून शस्त्रक्रिया केली. या पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेत प्रथम हृदयाला लहानसे छिद्र पाडण्यात आले. मग त्या छिद्रातून हाताचे बोट हृदयात घालून अरुंद झडप (व्हॉल्व्ह) थोडीशी मोठी करण्यात आली. सुरुवातीला यात रुग्ण दगावण्याचे प्रमाण बरेच होते. पण हळूहळू हृदय-शल्यचिकित्सकांना यात प्राविण्य मिळाले व अशा शस्त्रक्रिया सुलभतेने होऊ लागल्या. ही झाली ‘क्लोझ्ड-हार्ट’ अथवा आंधळी शस्त्रक्रिया.

ह्या शस्त्रक्रियेमुळे कितीतरी रुग्णांना फायदा झाला असला तरीही या पद्धतीला बऱ्याच मर्यादा होत्या. हृदय-रोगाचे असे इतरही बरेच प्रकार होते ज्यावर या पद्धतीनुसार शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. जर का हृदयाच्या आत हात घालून काम केले नाही तर यात शस्त्रक्रिया करणे अवघड होते. याशिवाय आणखी एक खूप मोठी अडचण होती ती म्हणजे या पद्धतीमध्ये रुग्णाच्या हृदयाची धडधड चालूच रहात असे. रक्ताभिसरणाचा वेग कमी करून (टेंपररीली स्टॉपिंग ए पेशंटस सर्क्युलेशन) शल्यचिकित्सकांना शस्त्रक्रियेसाठी फक्त चार मिनिटे इतकाच अवधी मिळत असे. त्यानंतर रक्तपुरवठा पूर्ववत झाला नाही तर मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे मेंदूला इजा पोहोचण्याची शक्यता निर्माण होण्याचा धोका संभवू शकत होता. त्यामुळे हृदयातील सर्वप्रकारचे दोष विशेषतः ज्यासाठी चार मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागेल अशा शस्त्रक्रिया करणे दुरापास्त होते. ( या पद्धतीला इनफ्लो ऑक्लूजन असे संबोधिले जाते)

यावरही एक उपाय करण्यात आला. शरीराचे तापमान कृत्रिमरीत्या खूप कमी करून हृदयाचे ठोके अतिशय कमी करावयाचे. इतक्या कमी तापमानाला शरीराची प्राणवायूची गरज अगदी कमी होते व त्यामुळे रक्तपुरवठा जास्त काळ रोखून धरला तरी मेंदूला इजा पोहोचत नाही. तरुण कॅनेडीयन शल्यचिकित्सक  डॉ बिल बिगेलो यांनी ही कल्पना मांडली.(मला सांगावयास आनंद होतो की मला डॉ बिगेलो यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली) १९५२च्या सप्टेंबर महिन्यात डॉ लीलेहाय आणि डॉ जॉन लुवीस यांनी या पद्धतीचा वापर करून प्रथमच एका पाच वर्षांच्या लहान मुलीवर हृदय-शस्त्रक्रिया केली. या पद्धतीमुळे ती मुलगी शस्त्रक्रिया चालू असताना दहा मिनिटेपर्यंत हृदयाची धडधड थांबली असताना देखील जिवंत राहू शकली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

पण तरीही १० मिनिटेसुद्धा मोठ्या शस्त्रक्रियांसाठी कमीच पडत होती. शस्त्रक्रिया करण्यासाठी उपलब्ध कालावधी वाढविण्याची नितांत आवश्यकता होती. ‘हार्ट-लंग’ मशिनच्या विकासानंतर ही गरज अधिकांशाने पूर्ण झाली. अमेरिकेतील डॉ जॉन गिबन यांच्याकडे या प्रणालीच्या विकासाचे जनकत्व जाते. ६ मे १९५३ला डॉ जॉन गिबन यांनी हार्ट-लंग मशिनच्या सहाय्याने ओपन-हार्ट शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडलेली पहिली ओपन-हार्ट शस्त्रक्रिया मानली जाते. सामान्यांच्या भाषेत सांगायचे तर यात हृदय उघडून शस्त्रक्रिया केली जाते.

आज या घटनेला ६४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या शस्त्रक्रियेमध्ये हार्ट-लंग मशीनचा वापर करण्यात आला. शस्त्रक्रियेदरम्यान हृदयाचे कार्य अव्याहतपणे चालू रहाण्यासाठी अशा प्रकारची प्रणाली विकसित करणे हे वैद्यकीय संशोधकांचे स्वप्न होते. डॉ जॉन कर्कलीन यांनी प्रथम गिबनच्या ऑक्सीजनेटर पंप-प्रणालीचा वापर केला. तर लंडन येथील डॉ डेनिस मेलरोज यांनी शस्त्रक्रिया चालू असताना हृदयाची स्पंदने थांबविणारे इंजेक्शन विकसित केले ज्यामुळे हृदय-शल्यचिकित्सा अधिक सुलभ झाली.

यानंतरचा हृदय-शल्यचिकित्सेतील महत्वाचा टप्पा म्हणजे हृदय-प्रत्यारोपण! १९६७च्या पहिल्या हृदय-प्रत्यारोपणा नंतर आज पन्नास वर्षांनी जेव्हा मागे वळून पाहिले जाते तेव्हा असे लक्षात येते की त्या क्रांतिकारी घटनेमुळे आधुनिक वैद्यक-शास्त्रीय शल्यचिकित्सेला गती मिळाली. डॉ लुडविग ऱ्हेन यांच्यापासून सुरू झालेल्या या प्रवासात कितीतरी बिनीचे शिलेदार आहेत ज्यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे आज आपल्याला ही मजल गाठणे सहज साध्य झाले आहे.

— डॉ हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 

Avatar
About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 20 Articles
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..