मोह, कर्म, मोक्ष
बाजू तीन जगण्याच्या
परी डोईजड होता शिरी
बदलून जाती भाषा
करवेना म्हणोनि जो करितो
त्यास फळ ते कैसें
तरी मोहापायी करितो
त्यास जगणे ते कैसें!!
अर्थ–
माणसाला जगायला तीन गोष्टी पुरतात त्या म्हणजे एखाद्या गोष्टीचा मोह, त्या साठी केलेले कर्म, आणि मग त्यातून मिळणाऱ्या सुखाने प्राप्त होणारा मोक्ष.
पण मोक्ष प्राप्त केव्हा? जेव्हा सुखाने समाधान मिळेल. त्यातून अजून हवंय अशी भावना उत्पन्न झाली तर काय? तर मोक्ष दुर्लक्षित होतो आणि कर्माला एक शब्द येऊन बिलगतो आणि मग त्याचे होते कर्मकांड. बाळाला आईच्या दुधाचा मोह, आईला बाळाच्या चालण्याचा मोह असतो पण जर तो मोह ते कर्म घडल्यावर सुटला नाही तर ? प्रगती कशी होणार? म्हणून मोह या शब्दाला कुंपण घालणे गरजेचे आहे.
क्रिकेट खेळण्याचा मोह होतो लहानपणापासून सर्वांना पण तो मोह कर्म करून साध्य होणार आहे का हे जेव्हा विचारात घेतले जाते तेव्हा तो मोह केवळ छंद म्हणून पाहिला जातो आणि कर्म वेगळ्या ठिकाणी घडायला सुरुवात होते. जसे सचिन तेंडुलकर एकदाच होतो परत परत नाही तसेच सचिन खेडेकर तेच कर्म करू शकत नाही किंवा दोघेही एकमेकांचे काम करून त्यातून मोक्ष म्हणजेच समाधान मिळवू शकता नाहीत. याचाच अर्थ तो काय करतो आणि त्यातुन त्याला काय मिळतं म्हणून त्या गोष्टीचा मोह होणे बरोबर असेलच असे नाही.
मनापासून जे आवडेल ते करावे मग कष्ट मनापासून होतात आणि त्यातून जे मिळतं ते मोक्ष प्राप्त करून देणार असेल यात शंकाच नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply