गंगारामचं गावात सलूनचं दुकान होतं. त्याच्या संपर्कात एक विवाहित स्त्री आल्यानंतर तिच्याशी सूत जमवून ते दोघे नवरा बायको सारखे राहू लागले. कोरोनाच्या संकटामुळे सलूनचा व्यवसायही फारसा चालत नव्हता. त्याच्यासोबत रहाणारी सुभद्रा, गंगारामला ते गाव सोडून नाशिकला जाण्याचा आग्रह करीत होती.
गंगारामला ते काही पटत नव्हतं. त्याला त्याच्या मामांनी या गावात आणलं होतं. दुकान चालू करुन दिलं होतं. मामांना सोडून जाणं, त्याच्या गणितात बसत नव्हतं. जेव्हा सुभद्रा हट्टाला पेटली, तेव्हा त्यानं एक योजना आखली. आपल्या सोबत एका मित्राला घेऊन त्याने सुभद्राला एका निर्जन ठिकाणी नेले व तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. तिच्या प्रेताची विल्हेवाट लावून गावी परतला व सलूनमध्ये काहीच न घडल्यासारखे भासवून, काम करु लागला.
आता गंगारामला रितसर लग्न करण्याची गरज वाटू लागली. त्याने ओळखीतून एक स्थळ पाहिले व लागलीच लग्न करुन मोकळा झाला. घाईघाईत लग्न केल्याने बायकोला तो दागिने करु शकला नव्हता, ते करण्यासाठी त्यानं गावातील एका सराफाशी संपर्क साधला.
गावातील त्या तरुण सराफाने गंगारामवर विश्र्वास ठेवून सांगितल्याप्रमाणे दागिने तयार केले. तसा त्याने गंगारामला निरोप दिला. मात्र गंगारामकडे सराफाला देण्यासाठी पैसेच नसल्याने, त्याने सराफालाच दागिने घेऊन दुकानावर बोलाविले. मागे जो मित्र सोबत होता त्यालाही बोलावून घेतले.
सराफ आला त्याने दागिने दाखवले. सगळी खातरजमा करुन घेतल्यावर गंगारामच्या डोक्यात सैतान संचारला. त्याने मित्राच्या मदतीने दागिन्यांच्या मोहापायी सराफाचा धारदार कात्रीने खून केला व दागिने घेऊन पसार झाला.
सराफाचा खून झाल्याचे कळताच त्याचे सत्तर वर्षांचे आजोबा, या धक्कादायक बातमीने मृत्यू पावले. गावातील लोक या घटनेमुळे हतबुद्ध झाले.
गंगारामने असा अघोरी खून केलेला पाहून त्याचे मामा स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागले. गंगारामला या गावात आणल्याचा त्यांना आता पश्र्चाताप होऊ लागला.
पोलीस तपास सुरु झाला. गंगारामच्या मामांना पोलीसांनी चौकशीसाठी चौकीत बोलाविले. मामांच्या साध्यासरळ जीवनात असा मानहानीचा प्रसंग कधीही आला नव्हता. त्यांनी विष घेऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.
शेवटी तपास करणाऱ्या पोलीसांना गंगाराम व त्याचा मित्र, दोघेही सापडले. त्यांना पोलीस कोठडीत टाकून पोलीस आता पुढची कारवाई करीत आहेत.
ही कालच्या ‘दै.लोकमत’ मध्ये आलेली बातमी मन सुन्न करणारी आहे. बातमीला मी कथेचं स्वरुप दिलं आहे. पात्रांची मूळची नावं बदलली आहेत.
या कोरोनाच्या काळात कसेही करुन फक्त जगणे, एवढीच माफक अपेक्षा ठेवणं गरजेचं असताना गंगारामला दुर्बुद्धी सुचली आणि तो एकापाठोपाठ एक चुकीच्या गोष्टी करत गेला.
विवाहित स्त्रीशी संबंध ठेवणे ही पहिली चूक. तिचा निघृण खून करणे दुसरी चूक. एका स्त्रीच्या खूनाचा आरोपी असताना, दुसऱ्या स्त्रीशी लग्न केलं ही तिसरी चूक. आर्थिक ऐपत नसताना सराफाला दागिन्यांची आॅर्डर देऊन, ते दागिने ताब्यात घेतल्यावर त्याचा खून करणे ही चौथी चूक. सराफांच्या खूनाची बातमी समजल्यावर त्याच्या आजोबांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याची, पाचवी चूक. ज्या मामांनी विश्वासाने आसरा दिला, त्यांना भाच्याने खून केल्याचे समजल्यावर आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय न राहिल्याची, सहावी चूक. स्वतः तर शिक्षा भोगणारच पण त्यातसुद्धा आपल्या मित्राला पापात सहभागी करण्याची, सातवी चूक.
क्षणिक सुखासाठी समाजातील असे अनेक गंगाराम खून, चोऱ्या, लबाडी, फसवणूक, बळजबरी करुन निष्पाप जनतेवर अन्याय करीत राहतात. एखाद्याच गंगारामबद्दल वर्तमानपत्रात अशी बातमी छापून येते. कित्येक घटनांना साक्षी पुरावे नसल्यामुळे त्या कधीच प्रकाशात येत नाहीत…
कायद्यानुसार गंगारामला काही वर्षांची किंवा जन्मठेपेची शिक्षा होईलही. मात्र गंगारामने ज्यांचं आयुष्य अजूनही असताना, त्यांना त्याआधीच निर्दयतेने संपवलं… त्याला कारणीभूत होती गंगारामची ‘मोहा’ची कात्री…
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
५-६-२१.
Leave a Reply