अभिनेत्री गिरिजा जोशी तिचा उठावदार बोलका चेहरा, पारंपरिक आणि पाश्चिमात्य या दोन्ही पेहरावांसाठी अनुरूप आहे.
‘गोविंदा’, ‘प्रियतमा’, ‘धमक’, ‘देऊळ बंद’, ‘वाजलंच पाहिजे’ यासारख्या रूपेरी पडद्यावरच्या कलाकृतींमधून वेगळ्या धाटणीच्या भूमिकांतून नेहमीच अभिनेत्री म्हणून समोर आलेल्या गिरिजा जोशीने अल्पावधीतच आपला चाहता वर्ग तयार केला. पदार्पणापासूनच तगडय़ा कलाकारांसोबत अभिनय साकारलेल्या गिरिजाने आपला कसदार अभिनय सादर करत अभिनय क्षेत्रावर आपली वेगळी छाप पाडली. अभिनयासोबतच शास्त्रीय संगीत आणि कथ्थक नृत्याची जाण असलेल्या गिरिजाचा मोहक चेहरा अल्पावधीतच घराघरात पोहचला.
गिरिजाने २०१३ साली ‘गोविंदा’ या सिनेमातून सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही. गिरिजाने आज अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा जरी उमटवला असला तरीही लहानपणी तिला अभिनय क्षेत्रात यावं असं अजिबात वाटत नव्हतं. गिरिजाला खरंतर एअर होस्टेस म्हणून करीअर करायचं होत. मात्र गिरिजाच्या वडिलांनी तिच्यातला कलाकार बालपणीच हेरला आणि तिला अभिनयाची गोडी लावली. ‘ऐश इज बार्ंनग’ या तिने अभिनय साकारलेल्या एकांकिकेला राज्यस्तरीय पारितोषिकं लाभली आणि हाच दिवस गिरिजासाठी टार्ंनग पॉइंट ठरला.
गुढीपाढवा निमित्ताच्या विशेष फोटोशूटसाठी मला गिरिजाचं फोटोशूट करण्याची संधी मिळाली होती. या पाडव्याच्या शूटसाठी तिची वेशभूषा आणि तिचा एकूणच लूक कसा असेल हे तिच्याशी बोलून शूटचा दिवस आम्ही निश्चित केला. मॉर्डन टच असलेला पारंपरिक साज आम्ही निश्चित केला होता. हा मॉर्डन टच असलेला पारंपरिक साज लक्षात घेऊन तशीच वेशभूषा आणि रंगभूषा तिची करण्यात आली होती. पिवळ्या उठावदार रंगाची साडी, त्यावर साजेसा दिसेल असा हातात पांढऱया-लाल रंगांचा चुडा, नाकात मोत्यांची नथ, कलाकुसर केलेले दागिने, केसात मळलेला गजरा, कपाळावर टिकली असा तिचा शृंगार होता. तिचा हाच मोहक चेहरा कॅमेराबद्ध करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. गुढीची पूजा करतानाचे तिचे काही फोटो मी टिपले. वृत्तपत्राची गरज असलेले फोटो टिपल्यानांतर याच वेषभूषेतले तिचे काही पोर्टेट मी टिपले. तिच्या चेहऱयावरचं स्मितहास्य आणि सोनेरी झाक असलेली लायटिंग यामुळे मला एका पाठोपाठ एक असे अनेक चांगले फोटो टिपता आले.
पारंपरिक वेषभूषेतल्या लूकनंतर गिरिजाचं ग्लॅमरस फोटोशूट करायचं ठरलं होतं. यासाठी तिचा मेकओव्हर करावा लागणार होता. मेकओव्हरला साधारणपणे एक-दीड तास जाईल हे हेरून माझी टीम पुढच्या लायटिंगच्या तयारीला लागली. शूटच्या मध्ये बराच वेळ होता. याच वेळी गिरिजा तिच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल सांगत होती. तिला खरंतर एअर होस्टेस म्हणून करीअर करायचं होतं. पुढे त्या दिशेने तिने अभ्यासदेखील सुरू ठेवला होता. रुईया महाविद्यालयातून पॉलिटिक्स आणि सायकोलॉजी (मानसशास्त्र) या विषयांचं पदवी शिक्षण पूर्ण केलं. तर यानंतर सायकॉलॉजीचं पदव्युत्तर शिक्षणदेखील तिने पूर्ण केलं होत. गिरिजाचे वडील त्याकाळचे उत्तम दिग्दर्शक होते. त्यांच्याकडूनच गिरिजाला अभिनयाचं बाळकडू मिळालं. अभ्यासाच्या जोडीनं गिरिजाला लहानपणापासूनच नृत्य आणि संगीत याची वेगळी गोडी होती. पाचवीत असल्यापासून तिने गुरुवर्या गांगल यांच्याकडून शास्त्रीय संगीताचा नियमित अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. तर यांच्या जोडीने पं.गोपीकृष्ण यांचे शिष्य राजकुमार केतकर यांच्याकडून तिने कथ्थकचे धडे गिरवले. हाच नृत्यकलेचा उपयोग तिला पुढे झाला. महाविद्यालयात तिने दीपाली विचारे हिच्या मार्गदर्शनाखाली अनेक नृत्य कार्यक्रमांतही सहभाग नोंदवत आपल्या नृत्याची चुणूक दाखवल्याचे ती सांगत होती.
पारंपरिक लूकनंतर आता गिरिजाचा मॉर्डन आणि ग्लॅमर्स लूक होता. गोविंदा आणि प्रियतमा या सिनेमांतून तिची मध्यमवर्गीय स्त्राrची तसेच गावरान महिलेची भूमिका समोर आली होती. मात्र यापलीकडे गिरिजा किती बोल्ड आणि ब्युटीफुल आहे हे दाखवण्यासाठी तिचा ग्लॅमरस मेकओव्हर करण्याचं आम्ही ठरवलं होत.
पारंपरिक साडीनंतर गिरिजाने गडद काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला होता. वेशभूषा लक्षात घेऊन ‘लो की’ (low key) लायटिंग करून तिचे काही मिड शॉटस् आणि हेडशॉटस मी कॅमेराबद्ध केले. तर यानंतर पुन्हा लूक बदलून तिने गुलाबी रंगाचा टॉप आणि हॉट पॅन्ट परिधान केली. यात गिरिजा अधिकच बोल्ड दिसत होती. तिच्या या लूकमधल्या दिलखेच अदा मी कॅमेराबद्ध केल्या. अर्थात तब्बल सहा तास चालेल्या या एकूण शूटनंतर आणि नऊ जणांच्या अथक मेहनती अंती गिरिजाचे विविध लूक मला कॅमेराबद्ध करण्यात यश आले होते.
गोविंदा आणि प्रियतमा या सिनेमांतून गिरिजाची समोर आलेली प्रतिमा पुसून तिने पुढे काही सिनेमात अभिनय साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या आगामी सिनेमातून तिचा हा बोल्ड लूक समोर येईल. तर आगामी ‘रघु रोमिओ’ या सिनेमातही तिने साच्याबाहेरील अभिनय साकारल्याचं पाहायला मिळणार आहे. आपल्या कसदार अभिनयानं वेळोवेळी रसिकमन जिंकलेल्या गिरिजानं अथक मेहनतीने आणि परिश्रमाने तिचा पुढचा अभिनयाचा प्रवास सुरू ठेवला आहे. आगामी सिनेमांतून गिरिजा आपल्या अभिनयानं यापुढेही यशाचा आलेख उंचच उंच ठेवेल.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
Leave a Reply