नवीन लेखन...

विनोदी बॉलिवूड कलाकार मोहम्मद उमर अली मुक्री

मुक्री यांच्या वडिलांची उरण येथे मिठागरे होती. लहानपणापासूनच मुक्री यांना शिक्षण वगैरे क्षुल्लक गोष्टींचे फारसे आकर्षण नव्हते. त्याच्या हाडीमांसी सिनेमाच मुरलेला होता. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९२२ रोजी झाला. एका मुलाखतीत मुक्री यांनी सांगितले होते `उरणमध्ये पूर्वी गल्लीबोळात सिनेमे दाखविले जात. अब्बाजींचा डोळा चुकवून मुक्री हे सिनेमे हटकून बघायचा. एक दिवस चोरी उघडकीस आली. बापाने चांगला मार दिला, पण मुक्री काही सुधारला नाही. वडिलांसमोर अभ्यासाचे नाटक करायचे आणी त्यांच्या माघारी चित्रपट बघायचे हा नेम त्याने काही चुकविला नाही.’ वयाच्या दहाव्या वर्षी मुक्रीने घरातून एकदा पलायनच केले. बाप से बेटा सवाई हे अब्बाजींना कळून येताच त्यांनी मुक्रीची रवानगी आपल्या मोठ्या भावाकडे मुंबईला केली.

शाळेच्या कोंडवा़ड्यापेक्षा बाहेरचे मुक्त जग मुक्रीला अधिक प्रिय होते. मुंबईत आल्यानंतर तर त्याला मोकळे रानच मिळाले. नाना हिकमती लढवून तो सिनेमे बघायचा. त्या विश्वात रंगून जायचा. याच मंतरलेल्या अवस्थेत मुक्रीला सिनेमात काम करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. बोरीबंदरच्या अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीचा सहाध्यायी होता दिलीपकुमार. पुढे दोघेही सिनेमाक्षेत्रात स्थिरावले. दिलीपकुमारची प्रतिमा `लार्जर दॅन लाईफ’ असलेल्या नायकाची झाली व मुक्री विनोदी नटाच्याच पायरीवर घुटमळला. पण दिलीपकुमार आपल्या या शाळुसोबत्याला कधीही विसरला नाही. दोघांच्या जिव्हाळ्यामध्ये कीर्ती, पैसा असे लौकिक अडथळेही कधी आले नाहीत. आपल्या अखेरच्या दिवसांतही मुक्री दिलीपकुमारच्या या मनमोकळेपणाचा आदराने उल्लेख करीत असे.

कुठेतरी मुक्रीची आठवण प्रसिद्ध झाली आहे. चौथी इयत्तेत शिकणारे मुक्री नावाचे कार्टे सरोज मुव्हिटोनच्या मालकापुढे जाऊन उभे राहिले. मला चित्रपटात काम करायला द्या म्हणून त्याच्या खनपटी बसले. त्याकाळी चित्रपटात गाणार्या कलावंतांची परंपरा होती. स्टुडिओच्या म्युझिक रुममध्ये नसीर व झेबुन्निसा या त्यावेळच्या कलावंतांसमोर मुक्रीने अत्यंत भसाड्या आवाजात शिरी फरहाद चित्रपटातले गाणे म्हणायला सुरुवात केली. गाणे म्हणताना मुक्रीने असे काही विनोदी हावभाव केले की म्युझिक रुममधील सर्व मंडळी हसून लोटपोट झाली. खरं म्हणजे मुक्रीला गाणे बजावणे यापैकी काही म्हणजे काही येत नव्हते. पण कॅमेर्यासमोर उभी राहायची आस त्याला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे तो चक्क खोटे बोलून सरोज मुव्हिटोनच्या म्युझिक रुममध्ये गायला उभा राहिला होता. पण खोट्याचेही खरे झाले. मुक्रीला विनोदी नट म्हणून महिना ७५ रुपये पगारावर सरोज मुव्हिटोनमध्ये नोकरी मिळाली.

अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीने दिलीपकुमारबरोबर अनेक नाटकांत भूमिका केल्या. त्या गाजविल्या. किमान शिक्षण पूर्ण करुन मुक्रीने पुन्हा चंदेरी दुनियेत पाय ठेवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीने एक वळण घेतलेले होते.` नादान’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक म्हणूनही त्याने काम केले. फुल चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम करणार्या मुक्रीला देविकाराणीने हेरले. ठेंगण्याठुसक्या, भरगच्च गालांमधून हसतानाही दांत न दाखविण्याची किमया साधणार्या मुक्रीला देविकाराणीने `प्रतिमा’ चित्रपटातील मालकिणीच्या विनोदी नोकराची भूमिका करण्यासाठी पाचारण केले. या चित्रपटातील दिलीपकुमार-मुक्री यांची जोडी पुढे अनेक चित्रपटांत कायम राहिली. कोहिनूर, आन, अमर, अनोखा प्यार, राम और श्याम या चित्रपटांत दिलीपकुमारसमवेत मुक्रीने आपल्या विनोदी आविष्काराने अक्षरश: धमाल उडवून दिली. याचवेळी स्टंटपटांचाही बराच बोलबाला होता.

स्टंटपट हे तसे दुय्यम दर्जाचेच समजले जात. पण तिथेही मुक्रीने आपल्या अभिनयाची कमाल दाखविली. दणकट पहेलवान शेख मुख्तार याच्या जोडीने मंगू दादा, दिल्ली का दादा, उस्ताद पेद्रो, कैदी नं. ९११ अशा चित्रपटांमधून मुक्रीने बहार आणली. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसले. त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. शिवाय तो जमानाही कथिलाचा नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद या लिजंड्सबरोबर काम करताना मुक्री कधीही दुय्यम कलाकार वाटला नाही. देव आनंदबरोबर असली नकली, काला पानी, राज कपूरबरोबर चोरी चोरी असे काही चित्रपट त्याने केले. त्याकाळचे लोकप्रिय नायक सुनील दत्त, राजकुमार, मनोजकुमार यांच्या संगतीतही मुक्री पडद्यावर रमला.

विनोदी भूमिका हे त्याचे पंचप्राण होते. तो त्यात जगला, त्याच प्रतिमेत मुक्रीचा श्वासही विरघळला. गोल्डन एरानंतर अँग्री यंग मॅनचे वादळ घोंघावू लागले. चित्रपटसृष्टीमध्ये होणार्या बदलांशी ज्यांनी जुळवून घेतले नाही, असे अनेक कलावंत नंतर मोडीत निघाले. पण या परिवर्तनात मुक्री लव्हाळ्याच्या स्थितप्रज्ञतेने टिकला.

सुपरस्टार पदाची वस्त्रे राजेश खन्नाने खाली उतरविल्यानंतर आपला तमाम प्रेक्षकगण अमिताभच्या मनस्वी, प्रसंगी विखारी व्यक्तिरेखांमध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहू लागले. अमिताभच्या प्रतिमेला खुलविण्यासाठी मुक्रीनेही यथाशक्ती प्रयत्न केले. `बॉम्बे टू गोवा’पासून ते थेट `शराबी’पर्यंत अमिताभ व मुक्री यांच्यामधील विनोदी प्रसंग प्रेक्षकांच्या मनात अजूनही ताजे आहेत. `तय्यब अली प्यार का दुश्मन’ हे गाणे फक्त त्याच्यासाठीच जन्माला आले होते. मुक्रीने तब्बल सव्वाशे चित्रपटांतून विविधढंगी भूमिका केल्या.

चित्रपट कारकीर्दीच्या प्रारंभी तो सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत वावरला. जीवनाच्या अखेरीस मस्तान चित्रपटाचे दिग्दर्शन करुन हे वर्तुळ पूर्ण करण्याची तयारी मुक्रीने केलेली होती, पण त्याच्या निधनामुळे या वर्तुळालाच छेद गेली आहे. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसला.

त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. मा.मुक्री यांचे ४ सप्टेंबर २००० रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ समीर परांजपे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..