लहानपणापासून जे पाहिले, अनुभवले त्या क्रित्येक प्रसंगाची, व्यक्तीची, व्यंगाची, चालीरीतींची अनेक प्रतिबिंब मनावर कोरली गेली आहेत. अशीच एक व्यक्ती समईच्या प्रकाशात शिवपिंडीवर विराजमान असलेल्या बेलपत्रावर गुलाबाच्या फुलाने छानपैकी विराजावे त्याप्रमाणे मनाच्या सांदीकोपऱ्यात दडलेली आहे. ती महानता आपणां सर्वाना ठाऊक असेलही.पण त्या व्यक्तिमत्वाकडे पाहिले तरी एक गोड कहर उसळतो. वामनमूर्ती … गव्हाळवर्णाची आणि सदैव प्रसन्न आणि हसतमुख चेहरा.बोलण्यात ऐट होती. अदब होती. पण लाचारी दिसत नव्हती. त्यांच्याविषयी लिहिताना डोक्यात भुंगे अनेक घोंघावत आहेत पण शब्द अपुरे पडतील असा त्यांचा जीवन परिचय. शून्यातून विश्व निर्माण करणारा हे विशेषण सर्वार्थाने एखाद्या व्यक्तीला लावतो. पण मी यांच्याविषयी असं लिहिणं टाळतो.कारण हा माणूस किती मोठा असला तरी त्याने आपले आयुष्य घोडपदेवच्या छोट्याश्या घरात व्यतीत केले आणि करीत आहेत. कुणालाही मैत्री करावीशी वाटावी असा लोभस माणूस सन्माननीय श्री मोहन लोके.
आठवणीतील माणसं लिहिताना सुंदर सुंदर आठवणींची ओंजळ रीती केली परंतु अफाट सागरातून मुठभर वाळू घेताना शिंपले हाताला लागले आणि त्यातल्या मोत्याविषयी माझ्याकडून झरझर उतरत गेले. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया म्हणजे स्वर्गीय सुखाचा अभिषेक झाल्यासारखे वाटले. आज मला आपल्याबरोबर राहत असलेले श्री मोहन लोके गेली ५ दशके मराठी चित्रपटसृष्टीसाठी योगदान देणाऱ्या…. कॅमेऱ्याने सिनेतारे- तारकांना ग्लँमर मिळवून देणारे …. दादा कोंडके पासून आजच्या निर्मात्यापर्यंत आणि अभिनेत्यापर्यंत सलोख्याचे संबंध असलेले… सहकलाकार म्हणून अनेक चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे…. भावनिक अविष्कारांना कॅमेऱ्यात कैद करणारा… जवळ जवळ १५८ चित्रपटात स्थिरचित्रणाचे काम करून स्टुडीओ एक तुही निरंकारचे नांव झळकविणारा…आपला माणूस.
एक वेळा लेखनाचा इतिहास बदलता येतो पण फोटोग्राफीचा इतिहास बदलता येत नाही. श्री लोके यांची छायाचित्रण या विषयावरील आस्था ही त्यांची जीवनमूल्य ठरली आहेत. कौशल्य उत्तम रंगसंगतीची जाण, नवनिर्मितीची क्षमता, कलात्मक भान, दृश्यमांडणीची कल्पकता, निरीक्षण शक्ती, आत्मविश्वास, प्रसंगावधान, जागरूकता, मेहनत आणि मुळात छायाचित्रण हा आपला आत्मा मानणारा एक मनस्वी छायाचित्रकार. फोटो काढताना डोक्याने न काढता आपल्या हृदयापासून काढून त्या भावनांचे तांत्रिक क्षण टिपणारा एक प्रतिभावंत माणूस.
जीवनात अनेक दुर्दैवाचे प्रहार झेलीत, आव्हानं, संकट यांचा स्विकार करीत त्यांनी आयुष्यात आपल्या निराशमनावर गुलाबपाण्याचे शिंतोडे शिंपडून आनंद फुलवीत जीवनाला खरा आकार दिला. १९४२ साली गरीब कुटुंबात जन्मलेल्या या भूषणावह व्यक्तीचे सध्या अमृतमहोत्सवी वर्ष सुरु आहे. पांडू हवालदार, येऊ का घरात, आली अंगावर,शूर आम्ही सरदार, बजरंगाची कमाल, सून लाडकी सासरची, जिवलगा, नवरा माझा नवसाचा आदि अनेक चित्रपटात त्यांच्या छोट्या भूमिका कौतुकास्पद आहेत. असे अभिनय करीत असताना दादा कोंडके यांना भारी खुमखुमी यायची. असाच प्रसंग आली अंगावर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना एक छोटीशी भूमिका होती.. भगवान दादा पोलीस इन्स्पेक्टर होते. लोके गावातल्या टपोरी माणसाची भूमिका करीत होते. नुकतीच सासू निर्वतल्यामुळे सर्व कार्य त्यांना करावे लागले होते.त्यामुळे डोक्यावर केस नाहीत म्हणून दादांनी केसाचा विग त्यांच्या डोईवर घातला होता. त्यावेळेस भगवानदादांनी टपोरीला खोटं खोटं मारायचा शॉट घ्यायचा होता. तसं ठरले होते पण मध्येच भगवानदादांच्या कानात दादा कोंडके कुजबुजले. तेव्हा भगवानदादांनी सहनायकाला डोक्यातला विग काढून बुटाने मारला तेही खरेखुरे. सर्व शूटिंग स्टाफ अवाक होऊन पाहत राहिला पण परत शॉट घेण्याचा प्रसंग दादांवर आला नाही. त्यांना हवा असलेला प्रसंग प्रत्यक्षात त्यांना मिळाला होता. पण शूटिंग संपेपर्यंत मात्र दादाच नव्हे सारा स्टाफ पोट धरून हसत होता. दादा कोंडके यांचे या माणसावर अतीप्रेम. घरातल्याची चौकशी नेहमीच करीत. अशा या माणसाला सन २०११ साली अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने *स्टील फोटोग्राफी* क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल त्यांना चित्रकर्मी पुरस्कार देऊन गौरविले. रविंद्र नाट्य मंदिरात झालेल्या सोहळ्यात आपल्या श्री मोहन लोके यांना सन्मानचिन्ह घेताना पाहिलेला क्षण आम्हां घोडपदेव समूहाच्या दृष्टीने अविस्मरणीय आहे. अभिनंदनीयच. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना उदंड आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
— अशोक भेके
घोडपदेव
Leave a Reply