छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार मोहन वाघ यांचा जन्म ७ डिसेंबर १९२९ रोजी झाला.
मोहन वाघ मूळचे कारवारचे. जे. जे. कला महाविद्यालयातील शिक्षण अर्धवट सोडलेल्या वाघांनी नंतर छायाचित्रकारिता सुरू केली. छायाचित्रणापासून करिअरची सुरूवात करणारे मोहन वाघ नंतर नेपथ्य, नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते म्हणून नावारूपास आले. कमाल अमरोहींच्या पाकिजासाठी त्यांना डिझाईनचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. नाटकाच्या प्रेमापोटी ते त्या कलेकडे वळले. अनेक नाटकांसाठी त्यांनी नेपथ्यरचना केली. त्यानंतर या कलेच्या प्रेमापोटीच त्यांनी चंद्रलेखा ही नाट्यसंस्था काढली. चंद्रलेखा हे खरे तर नाटककार वसंत कानेटकरांच्या मुलीचे नाव.
त्यांनीच हे नाव वाघांना सुचवले आणि ही नाट्यसंस्था जन्माला आली. या संस्थेतर्फे त्यांनी अनेक दर्जेदार नाटके रंगभूमीवर आणली. चंद्रलेखाची नाटके म्हणजे नेपथ्यापासून, कथा, सादरीकरण, कलावंत आणि अभिनय यांचा दर्जा असा अलिखित नियम होऊन बसला. ऑल दी बेस्ट ही एकांकिका पाहिल्यानंतर तिचे नाटकात रूपांतर करण्याचे व्यावसायिक धाडस त्यांनीच दाखवले आणि हे नाटक यशस्वीही करून दाखवले. या नाटकाच्या माध्यमातून संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, भरत जाधव, श्रेयस तळपदे हे कलावंत पुढे आले. दरवर्षी ३१ डिसेंबरला नवे नाटक आणण्याचा पायंडा पाडून तो त्यांनी कसोशिने पाळला. मोहन वाघांनी तब्बल ८३ नाटकांची निर्मिती केली. त्यांचे १५,६४७ एवढे प्रयोग केले, पण त्यांची फक्त १५ नाटकंच व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी ठरली. तरीही प्रत्येक कलाकाराला प्रयोगानंतर पाकीट द्यायलाच हवं, आजचं पाकीट उद्या द्यायचं नाही, हा त्यांचा नियम होता.
नाटक चांगले पैसे मिळवून देवो अथवा नाही, पण त्यांनी कधीही कलाकारांना मानधनासाठी रखडून ठेवलं नाही. ही त्यांची शिस्त होती. त्यातही रणांगण, स्वामी, बटाट्याची चाळ, ऑल द बेस्ट ही नाटके तुफान गाजली. प्रेमगंध, बहुरूपी आणि एक तिकीट सिनेमाचं ही नाटके तर उत्कृष्ट नेपथ्यामुळेही गाजली. नेपथ्यामुळे नाटक गाजविण्याचाही विक्रम मोहन वाघ यांनी प्रस्थापित केला. मोहन वाघांनी नवख्या कलाकारांना घेऊन केलेल्या ऑल दी बेस्ट नाटकाचे तीन हजारांवर प्रयोग झाले आहेत. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर या सध्या मराठी सिनेसृष्टीत गाजणार्याआ नटांना मोहन वाघांनीच ऑल दी बेस्टमधून ब्रेक दिला. त्यांच्या गरूडझेप या नाटकाने मराठी रंगभूमीवर विशेष स्थान निर्माण केले. नाट्यपरिषदेने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते.
लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध होते. बाळासाहेबांनी तर त्यांना कॅमेराही दिला होता. रंगमंचासोबतच त्यांनी कॅमेरा हे माध्यमही अतिशय समर्थपणे पेलले. फोटोग्राफीची अत्यंत आवड असणाऱ्या लतादीदींनी तर याचे धडे मोहन वाघ यांच्याकडून गिरविले. दीदींसह असंख्य तारे-तारका आणि सुनील गावस्कर यांच्यासारखे क्रिकेटपटू मोहन वाघ यांना आपल्या जिव्हाळ्याच्या आप्तेष्टांपैकी मानत असत. पु.ल. देशपांडे, व्हि. शांताराम, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर या आणि अनेक विभुतींचे फोटो त्यांच्या कॅमेर्यााने टिपले. ते फोटो ‘वाघांचे फोटो’ म्हणून ओळखले जावेत असा त्यांचा ठसा त्यावर उमटलेला आहे. त्यांच्या या फोटोग्राफीबद्दल खुद्द लतादिदींनी त्यांना ‘हे तर फोटोग्राफीतले लता मंगेशकर आहेत, अशी कौतुकफुले उधळली होती.
मोहन वाघ यांच्यामुळेच मधुबाला, नर्गिस, वैजयंतीमाला या गाजलेल्या अभिनेत्रींची विलोभनीय छायाचित्रे लोकांसमोर येऊ शकली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांचे जावई. मोहन वाघ यांचे निधन २४ मार्च २०१० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply