नवीन लेखन...

मोहीम तलाव पुनरुज्जीवनाची

यशोगाथा सार्वत्रिक व सर्व दूर असायलाच हव्यात.पर्यावरण व प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असतानाच काही व्यक्ती स्वतःच्या प्रतिभेचा वापर करून नवनवीन मार्ग व त्यावर उपाय शोधत आहेत.गोंदिया येथील शालू जगदीश कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळेच अनेक तलावांनी मोकळा श्वास घेतलाय,त्याचबरोबर६३तलावांचे पुनरुज्जीवनही झाले आहे. तसेच शालूताईंनी महिलांना मासेमारी क्षेत्रात आणून या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली. यासाठी त्यांनी महिलांना मासे पकडण्यापासून ते बाजारात त्यांची विक्री करण्यापर्यंत आवश्यक ते प्रशिक्षण दिले.निमगाव, मोरगाव अर्जुनी तालुका, जिल्हा गोंदिया येथील शालू जगदीश कोल्हे या गेल्या नऊ वर्षांपासून फीड (FEED) या संस्थेच्या माध्यमातून माजी मालगुजार तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम करीत आहेत.

या तलावांमधील बेशरमाची झाडे नामशेष झाली आहेत. शालू कोल्हे म्हणतात, “केवळ पाणी आणि माती असणे यास तलाव जिवंत आहे, असे म्हणता येत नाही. जीवविविधता, प्राणी, पक्षी, जनावरांसाठी चारा व लोकोपयोगी वनस्पती जर तलाव परिसरात विपुल असेल तरच तो तलाव जीवनदायक ठरतो.आज महाराष्ट्रातील अनेक तलावांमध्ये बेशरम अस्ताव्यस्त वाढलेली दिसते. थोडीही ओल मिळाली की ही वनस्पती सुसाट वाढते, तिच्या वाळलेल्या काडीलाही कोंब फुटतात. कोणतेही जनावर चारा म्हणून बेशरमचा पाला खात नाही, विषारी असल्यामुळे नाइलाज असेल तरच सरपणासाठी तिचा उपयोग केला जातो. तलावांमध्ये बेशरम वाढली की, अत्यावश्यक स्थानिक पाणवनस्पती नष्ट होतात. साखळ्या चिला, शेमळ्या, गाद, हरदोली, पांढरे कमळ, सिमणी फूल, देवधान, चौरा तसेच कंदमुळे नष्ट झाल्यामुळे पाणपक्ष्यांना, मासोळ्यांना खाद्य मिळत नाही. स्थानिक माशांच्या जाती नष्ट होतात, तसेच तलावांमधील माशांचे उत्पन्नही कमी होते. पाळीव प्राण्यांना तसेच लगतच्या जंगलातील वन्यजिवांना मिळणार्‍या चार्‍याचे प्रमाणही कमी होते. परिणामी पशुधानासाठी चारा उपलब्ध होत नाही, यातूनच मासेमारी व्यवसायावर उदरनिर्वाह करणार्‍या ढिवर समुदायाच्या उपजीविकेलाही बाधा पोहोचते. झाडू बनविण्यासाठी वापरले जाणारे आसेरा नामक गवतही नष्ट झाल्याने महिलांच्या रोजगारावर त्याचा थेट परिणाम होतो.

माजी मामलेदार (मामा) तलाव पूर्वी अतिशय समृद्ध होते आणि त्यावर गावातील लोकांचा उदरनिर्वाह सहज होत होता. कालांतराने बंगाली अर्थात परदेशी माशांचे बीज तलावामध्ये टाकले गेले आणि त्यानेच सारा घात केला.काही माशांमुळे प्रारंभी उत्पन्नवाढ झाली. पण त्यांनी जीवविविधता नष्ट करण्यात बेशरम वनस्पतीबरोबर हातभार लावला. परदेशी मासे त्यांच्या वजनाच्या चौपट अन्न खातात आणि वनस्पती हेच त्यांचे मूळ खाद्य असते. त्यामुळे तलावातील ही वनस्पती संपली, हे अभ्यासात लक्षात आले. एकीकडे बेशरमचे संकट आणि दुसरीकडे बंगाली माशांचा उपद्रव यातून मामा तलावांचा श्वास कोंडला. हीच कोंडी फोडण्यासाठी शालू कोल्हे, त्यांचे मार्गदर्शक मनीष राजनकर यांच्या साथीने उभ्या झाल्या.शालूताईंनी येथील सहकारी संस्थांना एकत्र केले आणि लोकसहभागातून गोंदिया जिल्ह्यातील 45 मालगुजारी तलावांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन करण्यात त्या यशस्वी ठरल्या.

तलावांचे पुनरुज्जीवन झाल्यामुळे 59 स्थानिक माशांच्या जातींचे संरक्षण व संवर्धन झाले, त्याचबरोबर निरनिराळ्या 214 वनस्पतींनाही बहर आला. तलाव जीवित झाल्यामुळे जीवविविधतेत भर पडली. आता तलाव परिसरात 66 प्रकारचे पक्षी विहरताना दिसत आहेत. हा प्रकल्प तलावांमधील माशांच्या वृद्धीसाठीही कारणीभूत ठरला. त्यामुळे स्थानिक माशांची संख्या तर वाढलीच, शिवाय त्यांचे वजनही दोन ते अडीच पटींनी वाढले. ढिवर समाजातील कुटुंबांचे उत्पन्न वाढून, त्यांचा जीवनस्तरही उंचावला.यशाचा हा टप्पा गाठला असला, तरी ध्येय सहज नव्हते. तलाव जिवंत करण्यासाठी त्यात बंगाली मासे सोडायचे नाहीत, असा संकल्प व्यावसायिकांकडून करून घेण्यात आला. प्रारंभी एका तलावाची प्रयोगासाठी निवड केली गेली. जिल्ह्यातील प्रत्येकच तलावात बेशरमचे साम्राज्य पसरले होते.

बेशरम हटविण्यासाठी ग्रामपंचायत, बचत गटाच्या महिला आणि मासेमारांनी तलावात श्रमदान केले. बेशरमचे झाड वाळले की ते जाळून टाकायचे अशी योजना झाली. सरकारी योजनेनुसार मोठ्या मशीन्स लावून तलावातील बेशरम काढली जात असे. पण त्याने तलावात मोठमोठे खड्डे पडून जीवविविधता नष्ट होत असे. त्यामुळे सरकारकडे रोजगार हमीच्या नियोजनात सदाफुली (बेशरम) काढायच्या कामाचा समावेश करण्याचा, तसेच ही वनस्पती यंत्राने न काढता मजुरांच्या हाताने काढण्याचा आग्रह केला गेला. काही तलावांमध्ये जेसीबीने ही वनस्पती काढली जात होती. त्या वेळी शालूताई जेसीबीला आडव्या आल्या आणि यंत्राचे काम थांबविले. काही उपाययोजना करून तलावाच्या पुनरुज्जीवनास प्रारंभ झाला. पण त्यातील नाहिशी झालेली जीवविविधता आणायची कुठून? हा प्रश्न होता. तो सोडविण्यासाठी पहिल्या पावसानंतर तलावात नांगरणी केली गेली. पतीराम तुमसरे आणि नंदलाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनात तलावात पाणी भरू लागताच काही वनस्पती लावण्यात आल्या. या तलावांमध्ये मासेमारीसाठी मोठे जाळे वापरण्यास बंदी घातली गेली. मासेमारांनीही लहान जाळे वापरण्याची सूचना तंतोतंत पाळली. सहा महिन्यांत परिणाम मिळाले. सदाफुली अर्थात बेशरम नामशेष झाली. इतरही वनस्पती तलाव आणि परिसरात दिसू लागल्या.

51 प्रकारचे मुलकी मासे आढळून आले. मुलकी मासे वैशिष्ट्यपूर्ण यासाठी की, ते वर्षभर मासेमारांना दररोज उत्पन्न देतात. हे मासे 200 ते 700 रुपये किलोप्रमाणे विकले जातात. विशेष म्हणजे या माशांचे बीज बंगाली माशांप्रमाणे दर वर्षी टाकावे लागत नाही. मुलकी मासे भाजून आणि कच्चे दोन्ही प्रकारे विकले जातात. या प्रयोगातून ढिवर समाजातील लोकांचे उत्पन्न वाढले आणि तलावही जीवविविधतेने समृद्ध झाले.यानंतर शालूताईंनी महिलांच्या मासेमारीचा नवा प्रयोग आरंभिला. मासेमार महिलांचे बचत गट तयार केले. शालूताईंचे सारे शिक्षण अनुभवातूनच झाले आहे. हळहळू त्यांनी ग्रामपंचायती गाजविल्या. तेथे महिलांचे प्रश्न मांडले. सरकारी योजना खेचून आणल्या. महिला सक्षमीकरणाचे त्यांचे प्रयत्न आता 63 गावांपर्यंत पोहोचले आहेत. मुलकी माशांचे लोणचे हा नवा उपक्रम त्यांनी हाती घेतला, तोही यशस्वी ठरला. सध्या पाच गावांत प्रत्येकी 16 विविध समाजातील महिला हा उपक्रम राबवीत असून, त्याला मोठी मागणी येत आहे. शालूताईंनी महिलांना मासेमारी क्षेत्रात आणून या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली. सुरुवातीला महिलांना मासे पकडताच येईनात. हळूहळू प्रयत्नपूर्वक मासे पकडणे त्या शिकल्या.

मग ते बाजारात नेणे, स्वच्छ धुऊन, कापून ग्राहकांना देणे यासाठी बाजारातील ओटेही त्यांनी काबीज केले. सर्व कामे महिलांनी केली आणि पुरुषांना तोंडात बोटे घालायला भाग पाडले. या उपक्रमाची सुरुवात त्यांनी स्वत:च्या गावापासून केली. हा उपक्रम यशस्वी होऊन त्यावर सरकारचीही पसंतीची मोहर उमटत आहे. या उपक्रमासाठी तलाव लीजवर घेतले गेले किंवा सोसायट्यांच्या तलावात मुसंडी मारली गेली. महिला मासेमारीचा प्रयोगही सफल झाला. तलावांमध्ये योग्य त्या उपाययोजना केल्यामुळे अडीच ते चार किलोचे मासे विकसित होत आहेत.

आधी लोक महिला मासेमारांची टर उडवत. पण आता त्यांचा प्रयोग बघण्यासाठी आणि राज्याच्या इतर भागातही त्याची अंमलाजावणी करण्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंतच्या अधिकार्‍यांनी शालूताईंचे गाव गाठले आणि त्यांच्यापासून यशाचा कानमंत्र घेतला. जंगलातून बाहेर येण्यासाठी पायवाटच असावी लागते,तसेच‌ निसर्गातील अनेक प्रश्नावर आपल्यालाच पायवाटा शोधाव्या लागतील.

डॉ.अनिल कुलकर्णी

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 36 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..