पुण्यात गरवारे कॉलेजमध्ये एफवाय बीए करणाऱ्या सोनालीला ट्रेकिंगचे वेड होते, पण आई बाबांचा तिच्या या छंदाला सक्त विरोध होता. मनिष आणि जयश्री या सुखवस्तू दांपत्याची ती एकुलती एक मुलगी. इतर मुलांसारखं तिने यूपीएससी करावं किंवा एनडीएची परीक्षा द्यावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी ते भरपूर खर्चही करायला तयार होते.
सोनालीचे सगळे मित्र पाचवीपासूनच बिझी झाले होते, कुणी आयआयटीची कसून तयारी करीत होता तर कुणी एम्स आणि मेडिकल साठी झटत होता. यशने तर सीएचा अभ्यास अकरावीपासूनच सुरू केला होता, त्याला लवकरात लवकर त्याचे सीए संपवून लॉ सुद्धा करायचे होते. तोरलचं लग्नं कुठल्यातरी बिझनेसमन फॅमिलीमध्येच करायचे असे घरून नक्की झालेले होते त्यामुळे तिने एमबीए एंट्रन्स कॅट इत्यादींची तयारी सुरू केली होती.
सोनालीला तिची फिरण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती, तिच्या आवडीचं काहीच तिला तिच्या अभ्यासक्रमात सापडलं नव्हतं. तिला मराठी इंग्रजीमध्ये रस होता, पण नुसतीच भाषा शिकणं कोणत्याच प्रोफेशनल कोर्सला पुरेसं नव्हतं. तिच्या आवडी निवडीला साजेसा कोणताच विषय तिला अभ्यासक्रमात सापडत नव्हता. सोनाली हा आई वडिलांच्या डोक्याला ताप झालेला होता, तिचं वागणं त्यांच्या सोसायटीतल्या नात्यातल्या ओवी संदेश सुरभी नेहा प्रीतम या सगळ्यांपेक्षा खूपच वेगळं होतं आणि अभ्यासातही सगळाच आनंद होता.
एकदा आई वडिलांना न कळवताच ती एका ग्रुप बरोबर साठवलेले पैसे भरून राजगड ट्रेकला गेली. ती त्या ग्रुपलीडरच्या मागे नकळत चाललेली होती, पण तिचे खरे लक्ष इकडच्या वाटेने जाऊन बघ, तिकडच्या दरीत डोकावून बघ, पलीकडे उतरून पहा, झाडाच्या फांद्यांना लटक, खोडांच्या बेचक्यात उभं राहून फोटो काढ असेच होते. तिथे तिला गावातला शंभू भेटला. शंभू फारसा शिकलेला नसला तरीही त्याला जंगलांची बऱ्यापैकी माहिती होती. कोणती फुलं पावसाळ्यात येतात, उन्हाळ्यात कोणत्या गवताला मोठं मोठे तुरे फुटतात, कोतवलाची घरटी काटे सावरीवर का असतात? अशा त्याच्या कडून मिळालेल्या माहितीमुळे ती खूपच उत्साहित झाली आणि मी पुन्हा आल्यावर संपूर्ण जंगल फिरवून आणण्याची कबुली तिने त्याच्याकडून घेतली आणि नंतरच तिने तो ट्रेक व्यवस्थित पूर्ण केला. ती एक महिन्याभराने परत राजगडला आली, यावेळी शंभू आणि ती विंझर मधून सिंहगडवर जाण्यास निघाले, त्यांना शंभुचा मित्र शंकऱ्या भेटला. शंकऱ्याला सुद्धा जंगलाची प्राण्यांची आणि डोंगरदऱ्यांची बरीचशी माहिती होती पण ते दोघेही फारसे फिरलेले नव्हते. त्यांची मजल जेमतेम आठ दहा किलोमीटर्सच्या परिसरापूरतीच होती. तिने त्या दोघांना चालत रायगडला जाण्याचा प्रस्ताव दिला. ते दोघेही सुरुवातीला नकोच म्हणत होते पण शेवटी खाली कोंकणात उतरण्यास तयार झाले. मधल्या वस्त्यांमध्ये त्यांना प्रमिला आणि प्रसाद भेटले आणि त्या सर्वांनी मिळून भटकंती करायचं निश्चित केलं. पुण्याची सुरभी खरेतर युपीएससी आणि एमपीएससी सिरियसली देत होती, पण ती दुसऱ्या परीक्षेत खाली राहिली, तिला आता नव्याने तयारी सुरू करायची होती, फ्रेश होण्यासाठी म्हणून ती या चांडाळ पंचकात सामील झाली.
जंगल प्राणी वनसंपदा हेच आपल्या आवडीचे विषय आहेत, हे आता सोनालीच्या लक्षात येऊ लागले होते. स्थानिक लोकांना उपयुक्त अशी जंगली वनस्पतींची लागवड आपण जंगलात वनखात्याच्या परवानगीने सुद्धा करू शकत नाही, हे तिच्या लक्षात आले. सुगंधी गवतं औषधी तेल देणाऱ्या करंज्या सारख्या वनस्पती अशा अनेक वनस्पती तिला माहिती झाल्या होत्या पण त्याच्यासाठी ती काहिही करू शकत नव्हती. जंगलाच्या जवळ राहणाऱ्या लोकांना त्याची माहिती करून देऊन रोजगार उपलब्ध करता येईल असे तिला वाटत होते, पण जंगल फक्त नांवाला आपले असते, त्याची खरी मालकी सरकारचीच असते, हे तिच्या लक्षात आले. आपण आपल्या जंगल संवर्धनासाठी काय करू शकतो? हा विचार ती करू लागली. तिने यासंबंधी कोणते कोर्सेस आहेत? याची युनिव्हर्सिटी मध्ये चौकशीही केली, पण समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. झूलॉजी आणि बॉटनी शिकण्यासाठी तिला पुन्हा बारावी सायन्स मधून करावे लागणार होते, पण तशी सोय उपलब्ध नव्हती.
फॉलिएज किंवा पगमार्कस् सारख्या संस्था, गाईडचे कोर्सेस आयोजित करतात, त्यामध्ये ते फोटोग्राफी आणि टुरिस्टस् ना आवश्यक तेवढी जंगलांची माहिती देतात, असे सोनालीला समजले, तिने चौकशी केली, त्यांच्या कोर्सच्या किंमती शंकर शंभू प्रसाद आणि प्रमिलाला परवडणाऱ्या नव्हत्या आणि त्यांचे कमी शिक्षण आणि तोकडे इंग्रजीचे ज्ञान त्यांच्या पुढच्या शिक्षणाच्या आड येत होते. बीए पूर्ण झाल्यामुळे तिचे आईवडील आता लग्नासाठी तिच्या मागे लागले होते, तिला स्थळंही येऊ लागली होती.
सोनालीला तिची आवड तर समजली आहे, तसे मित्रही मिळाले आहेत, सरकार दरबारी मदत करायला यूपीएसी करणारी मैत्रीण तिला येऊन मिळाली आहे. ती तिचे प्रश्न सोडवू शकेल का? तिला कायद्यात राहून प्रश्न सोडवायचे नाहीत, तर प्रश्न सुटण्यासाठी कायद्यात सुयोग्य बदल हवेत, अशीच तिची धारणा आहे. अयोग्य कायद्यांमुळे बऱ्याच अडचणी जटिल होऊन बसतात, असे तिला वाटते.
ती हि लढाई लढेल? का ती लग्नं करून संसाराला लागेल? जशा जशा या चांडाळ पंचकाच्या छोट्याशा विश्वात घटना घडतील तशा तशा मी तुम्हाला सांगत राहीन.
कोणत्याही विषयांत पारंगत व्हायचं असेल तर त्या विषयाला प्रत्यक्षामध्ये भिडणे आवश्यक असते. प्रत्यक्ष जागेवरच्या प्रश्नाचे भान आपल्याला शाळेतले विषय जास्त समजावून सांगू शकते. आजकाल मुलं आयुष्याशी दोन हात करताना दिसत नाहीत, ते फक्त शाळा क्लासेस आणि परीक्षेच्या तयारीमध्ये मश्गुल असतात. आज अनेक इंजिनियर्स घरे बांधू शकत नाहीत, किंवा अनेक सीए कंपनीची प्रत्यक्षातील परिस्थिती समजून घेऊ शकत नाहीत. आयुष्याशी भिडत दोन हात करत पुढे जायला शिकणे हेच खरे शिक्षण आहे.
आजच्या सिस्टीम मध्ये मला अनेक प्रश्नांची आणि अनेक स्तरातील समाजाची वेगवेगळ्या प्रकारे होणारी पिळवणूक दिसली. शिक्षणाने आणि कायद्याने नागरिक नाकर्ते बनविले आहेत, काहीही करण्याचा अधिकार फक्त राजकारणी आणि सरकारी नोकरांनाच आहे. हे दारुण पारतंत्र्य अजूनही लोकांच्या लक्षात येत नाहीये.
माझे जंगल असून मी त्याचं भलं करू शकत नाही आणि वन्यजीव माझे मित्र असून मी त्यांच्याशी जवळीक साधू शकत नाही. आज जे कोणी उत्तम काम केलेले जंगलप्रेमी आणि वन्यजीव प्रेमी आहेत, कायद्याने दुर्लक्ष केल्याने ते मोठे झाले आहेत. राजकारण्यांच्या प्रत्येक झाडावर आणि मातीच्या कणावर राज्य करण्याच्या हव्यासामुळे आपली परिस्थिती दारुण झालेली आहे.आणि त्यात बुरसटलेल्या सामाजिक चालीरीतींनी भर घालून ठेवलेली आहे. त्यावर प्रकाश टाकण्यासाठी हे छोटेसे कथानक लिहावे असे मला वाटले.
— विनय भालेराव.
Leave a Reply