सालस मनीं, चाल होती सरल, जीवन मार्गावरती ।
सालोसाल वाट होती, नित्य रोहच्या, वहिवाटीची ।।
धुंद ऐशा मार्गावरती, अवचित आली घटिका, साल “गिरा” ची ।
अवचित आली घटिका, साल “गिरा”ची ।।धृ।।
हळूवारपणे काम-धाम, अगदी नीट नेटके, असेच होते ।
नव्हती घाई कसली, धांवा-धांवास, सदा दिलेत फाटे ।।
क्षण अनमोल जीवनांचे, स्वयें जपले, मी अपार कष्टाने ।
मंद मंद जरी, चुस्त-मस्त राहुनि, होते जगणे, चवी चवीने ।।
ठेवुनि आनंद कंद मनीं, हलकी-फुलकी चाल, रस्त्यावरची ।
धुंद ऐशा मार्गावरती, अवचित आली घटिका, साल “गिरा” ची ।।
अवचित आली घटिका, साल “गिरा” ची ।।१।।
बसली खीळ जरी चलनाला, शैय्या होती, माझ्या साथीला ।
आधार मजसी, तिचाच लाभला, मनांपासुनि दिसा-दिसांचा ।।
धांवुनि आले सारे, तोंड मी देत होते, प्रश्नांच्या सरबत्तीला ।
अचल क्षणींया, स्नेहमयी सहवास लाभला प्रीय जनांचा ।।
जाणवले अंतरी, आली प्रचिती पुरती, सात्विक वत्सलतेची ।
धुंद ऐशा मार्गावरती, अवचित आली घटिका, साल “गिरा” ची ।।
अवचित आली घटिका, साल “गिरा” ।।२।।
निजुनि, पडल्या पडल्या, जीवन गाणे, रंगु लागले ।
मनांत, हलके हलके, स्वप्न-फुलांचे, रंग गहिरे, बहरु लागले ।।
नीरव समयीं, कळून आले, मर्म, क्षणभंगूर जीवनाचे ।
असहाय क्षणीं, सामर्थ्य अलौकिक, कळलेल्या भगवंताचे ।।
भोगांतुनि, होते उपभोगीत मी, मृदुल-मुलायम साथ शैय्याची ।
धुंद ऐशा मार्गावरती, अवचित आली घटिका, साल “गिरा” ची ।।
अवचित आली घटिका, साल “गिरा”ची ।।३।।
कटकट, कुरबुर, जराही येत नव्हती, मम कर्णांवरती ।
वेदनाऽतिरेकांतुनि, चित्त, मुळीच नव्हते, पुरते थार्यावरती ।।
मार मुका तो, निपचित, होता बसुनि, माकड हाडावरती ।
कण्हणे-कुथणे, सुरुच होते, तीव्र वेदनेच्या, ठणक्यांवरती ।।
आयुष्याच्या उतरणीवरती, सुरु घसरणही संथपणाची
धुंद ऐशा मार्गावरती, अवचित आली घटिका, साल “गिरा” ची ।।
अवचित आली घटिका, साल “गिरा”ची ।।४।।
लक्ष्य होते, देऊनि औषध, लवकर उभी करण्यावरती ।
सेवे पोटीं, स्वार्थ होता, व्हावे रुजूं, सत्वर मी, कामावरती ।।
घेतली काळजी, जपून जरी, बरे वाटणे, नव्हते, माझ्या हातीं ।
परी जिद्द राखुनि, बरे होणे, घेतले, मी पक्के मनावरती ।।
दिव्य ऐसा ठेवा, कुणा न लाभो, हीच प्रार्थना, या गुरुदासाची ।
धुंद ऐशा मार्गावरती, न यावी अवचित आली घटिका, असल्या साल “गिरा” ची ।।
न यावी अवचित आली घटिका, असल्या साल “गिरा” ची ।।५।।
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply