गणपतीबाप्पाबद्दल कुतुहल आणि त्यातून येणार्या बर्याच अनुत्तरीत प्रश्नांची उकल करणारे हे नवे सदर….
मोरया माझा – १ :
श्री गणेशांबद्दल आपल्या मनात जे प्रश्न येतात त्यापैकी हा एक महत्त्वाचा प्रश्न. खरेच आहे एखाद्या महानगरातल्या सगळ्या माता- भगिनींच्या अंगावर मिळून सुद्धा इतका मळ असूच शकत नाही. मग जगज्जननी त्रिपुरसुंदरी पार्वती इतकी अस्वच्छ कशी असेल?
प्रश्न तर बरोबर आहे. पण अडचण ही झाली आहे की, शास्त्राने सांगितलेला मळ आहे आतला आणि आपण शोधत मात्र बाहेरच आहोत.
मुळात या सर्व पौराणिक कथा आध्यात्मिक अंगानेच अभ्यासायला हव्यात. अध्यात्माचे एक सूत्र आहे,”जे पिंडी ते ब्रह्मांडी,” अर्थात या संपूर्ण विश्वात जे काही आहे ते माझ्या या देहातही आहे. अर्थात ही कथा सुद्धा शरीरातच अभ्यासायची आहे.
आपल्या शरीरात पार्वती कोणती? तर पार्वती ही स्त्री आहे. आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाची स्त्रीलिंगी गोष्ट म्हणजे बुद्धी. अर्थात बुद्धी हीच पार्वती. त्या बुद्धीच्या ध्यानाची ही कथा आहे.
ही बुद्धीरूपी पार्वती ध्यान करताना, मन रुपी नंदीला सांगते की कोणालाही आत सोडू नको. पण तरी श्रीशंकर आत आल्यानंतर देवी पार्वती चिडते. कां? तर आज पर्यंत ती नंदीला आपला गण समजत होती. स्वतःला त्याची मालकीण समजत होती. नंदीने शंकरांना आत सोडल्यामुळे तिच्या या मीपणा, माझेपणाला धक्का बसला.
पार्वतीचा हा गळालेला मीपणा आणि माझेपणा यालाच शास्त्रात मळ असे म्हटले आहे .
“मी आणि माझे” रूपी मळ गळून गेल्यावर ज्या परमात्म्याचे दर्शन होते त्याला ” “उमांगमलज” असे म्हणतात.
त्याला पुढे गज मस्तक कां बसवले?
या प्रश्नाचे चिंतन उद्या करू.
जय गजानन
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply