गणपतीबाप्पाबद्दल कुतुहल आणि त्यातून येणार्या बर्याच अनुत्तरीत प्रश्नांची उकल करणारे हे नवे सदर….
मोरया माझा – १० :
भगवान श्री गणेशांच्या दोन बाजूला दोन शक्ती उभ्या असतात. एकीचे नाव देवी सिद्धी असते. तर दुसरीचे नाव देवी बुद्धी असते. पण यातील नेमकी सिद्धी कोणती? आणि बुद्धी कोणती?
बुचकळ्यात पडलात ना? आपण कधी याचा विचारही करीत नाही. पण शास्त्रकारांनी सर्व गोष्टींचा विचारही केला आहे आणि कारणेही दिलेली आहेत.
भगवान गणेशांच्या डाव्या हाताला असते ती सिद्धी आणि मोरया च्या उजव्या हाताला असते ती बुद्धी.
जणू काही या रचनेतच मोरया सांगत आहे की सिद्धी डावी आहे बुद्धी उजवी आहे.
जगातील पैसा, सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा या सगळ्याला सिद्धी असे म्हणतात. तर ज्ञानाला बुद्धी असे म्हणतात.
आता आपल्या लक्षात येईल की बुद्धीने सिद्धी तर मिळवता येते. पण सिद्धीने बुद्धी प्राप्त करता येत नाही. याच साठी सिद्धी डावी आहे बुद्धी उजवी आहे.
सिद्धीला मूल्य नाही असे नाही. जगात सिद्धीच्या क्षेत्रातील प्रत्येकच गोष्ट आवश्यक आहे. पण त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे बुद्धी.त्यामुळे सिद्धी डावी म्हणताना बुद्धीपेक्षा गौण हा अर्थ आहे.
श्रीक्षेत्र मोरगाव ला या दोघींची दोन वेगवेगळी मंदिरे आहेत. मोरयाच्या उजवीकडे पूर्वेला बुद्धी तर दुसरीकडे सिद्धी.
यातील सिद्धीचे मंदिर दूर तर बुद्धीचे जवळ आहे. जणू मोरया सांगत आहे की जो सिद्धीच्याजवळ तो माझ्यापासून दूर.
याच साठी डावी सिद्धी, उजवी ती बुद्धी.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply