गणपतीबाप्पाबद्दल कुतुहल आणि त्यातून येणार्या बर्याच अनुत्तरीत प्रश्नांची उकल करणारे हे नवे सदर….
मोरया माझा – ४ :
संस्कृत भाषेत वर्णन केलेल्या अनेक गोष्टी केवळ संस्कृतच्याच व्याकरणाने समजू शकतात. मराठी व्याकरणाने त्याचे अर्थ लावले तर काय गोंधळ होतो, याचे उदाहरण म्हणजे वक्रतुंड.
मराठी व्याकरणाने या शब्दाचा अर्थ कसा लावणार? मग अडचण लक्षात आली की लोक गंमत करतात ते म्हणतात की मोरया आणि त्याची सोंड वळवलेली आहे म्हणून ते वक्रतुंड. तर नाही. कारण प्रतीक रूपात हत्तीचे मस्तक स्वीकारायचे तरी सोंड हे हत्तीचे नाक आहे तोंड नाही. शब्द वक्रनासिका असा नाहीतर वक्रतुंड आहे. मग वक्रतुंड याचा नेमका अर्थ काय?
तर वक्रा हा शब्द मायेसाठी वापरला जातो. ती वेडीवाकडी आहे. अजब कार्य करते. तिचे स्वरूप समजत नाही. तिचा पार लागत नाही.
” अघटित घटना पटीयसी ” अशा शब्दात जगद्गुरु शंकराचार्य महाराज तिचे वर्णन करतात.
ही मायाच सर्व दुःखाचे कारण आहे. या मायेच्या पसाऱ्यात अडकल्यानेच सर्व दुःख वाट्याला येतात.
या मायेला दूर करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळेच तिला वक्रा असे म्हटले.
या वक्रा असणाऱ्या मायेला जे आपल्या तोंडाने म्हणजे फुंकरीने सहज उडवून लावतात त्यांना वक्रतुंड असे म्हणतात. ज्यांच्या कृपेची एक झुळूक आली तरी या मायेने निर्माण केलेली संसारातील सर्व दुःखे सहज लयाला जातात त्या परमात्म्याला, त्या मायापतीला वक्रतुंड असे म्हणतात.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
नमस्कार !
विद्यावाचस्पति श्री स्वानन्द गजानन पुंड शास्त्री यांची बरीच पुस्तके सध्या उपलब्ध नाहीत. ही पुस्तके व ग्रंथ मिळण्याची माहिती दिल्यास अत्यन्त आभारी होईन.
धन्यवाद !
– विवेक म. सोनार
मो.9898291458