गणपतीबाप्पाबद्दल कुतुहल आणि त्यातून येणार्या बर्याच अनुत्तरीत प्रश्नांची उकल करणारे हे नवे सदर….
मोरया माझा – ५ :
श्री गणेशाबद्दल बाह्यरूप पाहून जनसामान्यांना जे प्रश्न पडतात त्यापैकी नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे, एवढे मोठे विशाल देहधारी मोरया एवढ्या लहानशा उंदीरावर कसे बसतात? उंदीरावर बसता तरी येते का?
तर वरपांगी हा प्रश्न बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी उंदीरावर बसता येत नाही हे जर आपल्याला समजते, तर शास्त्रकारांना कळत नव्हते का? तरीही सांगितले तर त्यात काहीतरी वेगळा अर्थ नक्कीच असेल ना? तो समजून घेण्याची जबाबदारी कोणाची?
येथे उंदीर हा प्राणी एवढा मर्यादित अर्थ नाही. त्या उंदराला प्रतीक रूपात घेतले आहे. पाहायचे आहेत ते त्याचे गुण.
उंदीर कार्य कसे करतो? तर तो निशाचर अर्थात रात्री काम करतो. म्हणजे आपल्या नकळत कार्य करतो. दुसरी गोष्ट आत लपून काम करतो. तिसरी गोष्ट म्हणजे सर्व पदार्थ कुरतडतो.
नकळत कार्य करणे, आत राहून कार्य करणे आणि सर्व गोष्टी कुरतडणे. अगदी असेच कार्य करणारी आणखी ही गोष्ट आहे.
कोणती? तर काळ. तोही आपल्याला नकळत कुरतडत आहे. आपले हे शरीर आतल्याआत कुरतडल्या जात आहे. काळ सर्वच गोष्टींना कुरतडत असतो.
अशा या काळाचे प्रतीक आहे उंदीर. त्यावर जे बसतात अर्थात काळावर ज्यांची सत्ता चालते त्या “कालत्रयातीत” परमात्म्याला मूषकवाहन म्हणतात.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply