गणपतीबाप्पाबद्दल कुतुहल आणि त्यातून येणार्या बर्याच अनुत्तरीत प्रश्नांची उकल करणारे हे नवे सदर….
मोरया माझा – ६ :
त्रेतायुगात झालेल्या श्री गणेशा यांच्या मयुरेश्वर अवताराचे वाहन मोर वर्णिले आहे.
पुन्हा कालचाच प्रश्न पडतो की मोरावर कसे बसता येईल. तर लक्षात घ्या की एक भगवान शंकराचा नंदी दुसरा देवी लक्ष्मीचा हत्ती आणि तिसरा यमराजाचा रेडा सोडला तर कोणत्याही देवतेच्या वाहनावर बसताच येत नाही.
तशी आवश्यकताही नाही कारण येथे प्रत्यक्ष या प्राण्यांचा विचार अपेक्षित नसून त्यामागील गुणांचा विचारच अपेक्षित असतो.
मोराच्या बाबतीत विचार करायचा तर, मोर दिसायला अत्यंत आकर्षक आहे. त्याचा पिसारा मयूर नृत्य कितीही वेळा पाहिले तरी मन भरतच नाही.
पण मोरात दोन अडचणी आहेत. काव्यात्मक वर्णनात येते की मोर शिखिंडी आहे. अर्थात तो संयोग करत नाही.पर्यायाने आपल्या सोबत्याला तृप्त करीत नाही.
दुसरी अडचण म्हणजे मोर कितीही सुंदर असला तरी त्याचे पाय हा अतिशय घाणेरडे आहेत. कुरूप आहेत.
वरपांगी आकर्षक, तृप्त न करु शकणारा आणि पाया खराब असलेला या तीन गुणांनी युक्त असणारा दुसरा विषय म्हणजे संसार.
संसार ही असाच आकर्षक आहे पण त्याचे माणूस कधीही तृप्त होत नाही. संसाराचा पाया असणारी वासना अशीच कुरूप आहे.
अशा संसारालाच मोर असे म्हणतात. या संसारावर ज्यांची सत्ता चालते त्या परमात्म्याला मयुरेश्वर म्हणतात.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply