गणपतीबाप्पाबद्दल कुतुहल आणि त्यातून येणार्या बर्याच अनुत्तरीत प्रश्नांची उकल करणारे हे नवे सदर….
मोरया माझा – ९ :
मोरयाला दूर्वा किती? २१. मोरया ला मोदक किती? २१. मोरया समोर दक्षिणा किती? २१. हे तर सगळ्यांना नक्की माहिती आहे पण २१ च का?
हे समजून घेण्यासाठी प्रथम दूर्वा म्हणजे काय ते पहावे लागेल? शास्त्र दूर्वेचा अर्थ सांगताना म्हणते, जी दुःखांचे वारण म्हणजे दूर करते ती दूर्वा.
दुःख का होते? त्याचे कारण सांगताना शास्त्राने षड्रिपू असे वर्णन केले.
हे षड्रिपू कुठून येतात? तर प्रपंच. प्रपंचाचे अधिष्ठान काय? तर अंतकरण चतुष्टय. ज्याचा आधार काय? त्रिगुण. त्रिगुणाचा आधार द्वैत. शेवटी अद्वैत.
६+५+४+३+२+१=२१.
अशा स्वरूपात मूळ अद्वैताला सोडून बाकीच्या वीस गोष्टी स्वीकारल्यामुळे आलेली सर्व दुःखे, अद्वैताचा कल्पनेसह आत्मनिवेदन करणे याला २१ दूर्वा अर्पण करणे असे म्हणतात.
हाच नियम मोदकांच्या बाबतीत.
मोदकही २१च अर्पण करायचे. त्यांचा नैवेद्य दाखवायचा. अर्थात निवेदन करायचे. त्यानंतर ते मोरयाने स्वीकारले हा भाव. त्यानंतर त्यातील अद्वैताकार झालेली वृत्ती, एका मोदकाच्या रूपात मोरया जवळच ठेवायची. उरलेले २० परतच घ्यायचे. पण आता ते मोदक नसतात तर प्रसाद असतो.
प्रसादाचा एक नियम असतो. तो डोळे मिटून घ्यायचा असतो. अर्थात जे मिळाले ते मुकाट्याने मान्य करायचे असते.
आयुष्यात आलेली प्रत्येक गोष्ट भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारणे हाच, दुःख मुक्तीचा मार्ग आणि २१ चा अर्थ आहे.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply