साखर हे एक कर्बोदक असून ह्याच्या वापराने पदार्थास गोडी येते. फळ, भाज्या, व इतर पदार्थ ह्यांच्यात निसर्गच साखर निर्माण करत असतो. ती साखर अदृश्य स्वरुपात असते. आपण जी साखर वापरतो तिला सुक्रोज असे संबोधले जाते, व ह्याचा पदार्थाची चव वाढवण्यासाठी व त्यास गोडी आणण्यासाठी उपयोग केला जातो उदाहरणार्थ केक, चॉकलेट, फळांचे रस, मिष्टान्न. अश्या वरून घातलेल्या साखरेला ” आडेड शुगर” असे संबोधले जाते. ती साखर दृश्य स्वरुपात असते
साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी म्हण प्रचलित आहे पण साखरेचे खाणार त्याला देव नेणार अशी म्हण प्रचलित होईल की काय असे नवनवीन प्रयोगावरून वाटायला लागले आहे. साखर व आरोग्य ह्या विषयीच्या प्रयोगावरून साखर व प्रदीर्घ आजार ( क्रोनिक आजार) ह्यांचा संबंध आहे असे आढळून आले.
दृश्य स्वरुपात किती साखर घ्यावी ह्याबद्दल एकूण उष्मांकाच्या ५ ते १० टक्के उष्मांक हे दृश्य स्वरुपात घेतले तर चालतील असे जागतिक आरोग्य संस्था सांगते तर अमेरिकन हार्ट असोसिऐशन नुसार स्त्रियांनी ६ चहाचे चमचे किवा २४ ग्रॅम ; पुरुषांनी ९ चहाचे चमचे किवा ३६ ग्रॅम व मुलांनी ३ ते ६ चहाचे चमचे किवा १२ ते २४ ग्रॅम साखरेचे सेवन करावे.
दृश्य स्वरूपातील साखरेच्या सेवनाचा अतिरेक केल्यास रक्त प्रवाहात जास्तीची साखर मिसळते व ह्या रक्त प्रवाहातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शरीरात इन्सुलिन ह्या घटकाची जास्त निर्मिती करावी लागते. ह्या जास्तीच्या इंसुलीनच्या निर्मिती मुळे जास्तीच्या उष्मांकाचे चरबीत रुपांतर होऊन ती शरीरात साठवली जाते. जास्तीच्या इन्सुलिनच्या निर्मितीचा परिणाम भूक शमण्याच्या प्रक्रियेवर होतो कारण जास्तीच्या साखरेच्या सेवनाने चरबीचा प्रतिकार (लिपीड रेसिस्टनट) कमी होतो ज्यामुळे मेंदूपर्यंत पोट भरले असा संदेश पोहचत नाही.
प्रयोगानुसार अतिसाखरेच्या सेवनाचे आरोग्यावर होणारे परिणाम –
- गोड खाण्याची चटक लावते व वाढवते
- वृद्धत्वाकडे झुकण्याची प्रक्रिया वयाच्या आधीच सुरु होते
- स्थूलता व लठ्ठपणा ह्यातील महत्वाचा घटक अगदी लहान मुलांसाठी महत्वाचा घटक ठरू शकतो
- लहानथोर सगळ्यांमध्ये पोटाचा घेर वाढण्याची शक्यता बळावते
- साखरेच्या सेवनामुळे रक्तातील चरबी मुख्यत्वे ट्रायग्लिसरेड वाढू शकतात.
- शरीरात आतून कमी प्रमाणात सूज येण्याची शक्यता वाढते.
- रक्तदाब वाढतो व तो मिठाच्या सेवनाने होणाऱ्या रक्तादाबापेक्षाही जास्त दुष्परिणाम करणारा ठरू शकतो
- meTabolik सिंड्रोम व इन्सुलिन रेसिस्टनट निर्माण करू शकतो
- मधुमेह होण्याची शक्यता बळावते. प्रयोगात असे आढळले आहे कि जर साखरेच्या स्वरुपात तुम्ही १५० उष्मांकाचे सेवन केल्यास तुमची मधुमेह होण्याची शक्यता १ टक्क्यांनी वाढते तर तेच उष्मांक दुसऱ्या एखाद्या पदार्थातून केल्यास ती शक्यता 0 .१ टक्क्यावर येते
- हृदयरोगामुळे मृत्यू येतो असे प्रयोगात निष्पन्न झाले आहे
- मूत्रपिंडावर अतिरिक्त भार येतो तसेच मूत्रमार्गात जंतूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते
नुसतीच साखर नाही तर नवनवीन प्रयोगानुसार कृत्रिम साखरेचा उपयोगही तितकासा चांगला नाही असे प्रयोग दाखवतात. कृत्रिम साखरेच्या सेवनाने लठ्ठपणा, मधुमेह, मेटाबोलिक सिंड्रोम तसेच हृदयरोग होण्याची शक्यता वाढते
डॉक्टर शीतल म्हामुणकर
आहारतज्ज्ञ
Leave a Reply