“गाय येली मोरी गनुबा,गाय येली मोरी;मोरीला झालाय गोऱ्हा गनुबा,मोरीला झालाय गोऱ्हा”
ही गाण्याची गावठी धून आज सायंकाळी सर्वत्र ग्रामीण भागात आणि विशेषतः शेतकऱ्याकडे नक्की ऐकायला मिळाली असेल.आज वसुबारस त्यामुळे गायी-वासराची पूजा आज सर्वत्र केली जाते.तिच्याजवळ तेलाचा दिवा लावून त्या उजेडात तिचे पूजन केले जाते तसेच विविध गाणीही म्हटली जातात.हिंदू धर्मात गायीला दैवत मानले आहे आणि वसुबारस हा दिवस तिची पूजा करण्याचा दिवस मानला जातो.अर्थात गायी-वासराच्या अंगी असणारी उदारता,शांतता व समृद्धीची भावना सामान्य माणसाच्या अंगी वृद्धिंगत व्हावी अशी त्यामागची भावना असते.शेतकऱ्याच्या घरी अशी समृद्धी गायी-वासराच्या आणि दुध-दुभत्याच्या रुपाने सतत नांदत राहावी व त्यातून शेतकऱ्याची सर्व बाजूंनी भरभराट व्हावी ही भावनाही पूजा करण्यामागे नक्कीच असते.हल्ली कोणतीही पूजा सहेतुक होत असली तरी त्यामागे श्रद्धेचा,संस्कृतीचा,परंपरेचा एक भाग म्हणून त्याकडे बघितले जाते.
पूर्वीच्या काळी शेतकऱ्याकडे खूप गायी असायच्या.त्यांची नावेही भवळी,मोरी,कपिली,खिलारी,तांबडी अशी छान असायची.प्रत्येक घरात एक तरी गाय असायचीच आणि त्यामुळे आहारात हमखास दुध व दुधाचे पदार्थ असायचेच असायचे.जर गावात एखादी गायी व्याली तर शेजाऱ्यांना कच्च्या दुधापासून बनविलेला खरवस खायला लोक आवर्जून बोलवायचे.दही-दुधाचा घरात नुसता पूर असायचा.पण पुढे ‘जिथं पिकतं तिथ विकत नाही’ या म्हणीला छेद गेला आणि शेतकरी सक्षमीकरणासाठी राबविलेल्या योजनेंतर्गत स्थापिलेल्या दुध-संघाने दुध घ्यायला सुरुवात केली.एकदा दुध विकण्याची गोडी निर्माण झाल्यावर दरात मनमानी सुरु झाली आणि एकूण व्यवसाय खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना परवडत नाही म्हणून दुधाची गुणवत्ता खालावत गेली व मनाचा कोतेपणा वाढत गेला.ज्याच्या घरात चार-पाच गायी आहेत तोही बिचारा बिगर-दुधाचा चहा पिऊ लागला.दह्या-दुधाचा माठ हा शब्दप्रयोग फक्त गाण्यातच(गवळणीत) दिसू लागला.आता त्याची जागा किटली आणि वाटीने घेतलीय.शहरात पूर्वी थोड्या-फार प्रमाणात गायी दिसायच्या पण आता त्यांची संख्या खुपच कमी आहे.शहरात प्राण्यांच्या संकल्पना स्पष्ट करताना शिक्षकांना प्रतिकृती किंवा चित्राचा आधार घ्यावा लागतो.फार फार तर शहरात एखाद्या मंदिराच्या बाहेर उभी असलेली गाय आणि चारा घेऊन असलेला गोरक्षक दिसतात.भाविक मग त्या गोरक्षकाकडील चारा विकत घेतात.गायीला चारतात आणि गोमातेचे दर्शन झाले या आनंदात घरी परततात.
शेतकरी मोसमी हंगामामुळे शेतीपासून दूर जात आहे.ग्रामीण भागातून शहरात होणाऱ्या स्थलांतरित लोकांची वाढत जाणारी संख्या आणि त्यातून वाढणारे शहरीकरण यामुळे काही सांस्कृतिक बाबी काळाच्या ओघात लुप्त होतात की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे.१९९० च्या दशकात शिक्षक,भूगोल किंवा अर्थशास्त्र शिकविताना ग्रामीण भागात ७०% व शहरी भागात ३०% लोकसंख्या राहते असे सांगायचे.आता त्यांनाच ग्रामीण भागात ५५% व शहरी भागात ४५% लोकसंख्या राहते असे अलीकडच्या सर्वेनुसार सांगावे लागते.त्यामागे विविध कारणे आहेत.बदल हा जरी सृष्टीचा नियम असला तरी तो आश्वासक असला म्हणजे पचनी पडायला सोपा जातो.
अशी ही गाय आणि तिचे मानवी जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे.गायीच्या पूजेच्या दिवशी आणि नेहमीच देशी,गावरान आणि एकूण सर्वच गायींचे मानवी जीवनातील नैसर्गिक महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे आणि तिचे गाणेही जोपासले पाहिजे-
“दिन दिन दिवाळी,गायी-म्हशी ओवाळी;गायी कुणाच्या?………..लक्षीमनाच्या”.
– भाऊसाहेब लाला टुले
tulebhausaheb1986@Gmail.com
Leave a Reply