देवांच्या बैठकीला देशभरातील मोठं मोठ्या देवस्थानचे सगळे देव उपस्थित होते. त्यांच्यासह इतर लहान मोठ्या शहरांसह खेडेपाड्यातील लहान मोठी मंदिरातील तसेच गरीब श्रीमंत आणि सर्वसामान्य लोकांच्या देवघरातील देव सुद्धा हजर होते.
सगळे गणपती, सगळे साईबाबा, सगळे राम, विठ्ठल, दत्तगुरु आणि त्यांच्यासह सगळ्या देवी, आई आणि माता सुद्धा. विषयाला कोणी आणि कुठून सुरुवात करायची याची सगळे जण एकमेकांच्या तोंडाकडे बघून वाट बघत होते. शेवटी न राहून एका लहानशा खेडेगावात असलेल्या गणेश मंदिरातील गणपती बाप्पा बोलायला लागले.माझ्या समस्त आदरणीय आणि माननीय आणि वंदनीय देवांनो आपण सगळे वेगवेगळे आहोत का??
बाप्पांच्या या प्रश्नाला कोणाकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही. प्रश्न विचारणारे गणपती बाप्पा आपण काही चुकीचं तर विचारले नाही ना म्हणून जरा जास्तच गंभीर झाले.गणपती बाप्पांचा गंभीर चेहरा बघून एक गावदेवी म्हणाल्या, बाप्पा आपण सगळे देव सारखेच आहोत. मोठ्या देवस्थानातील देव सुद्धा सगळ्या भक्तांवर तसेच प्रसन्न होऊन सुखी समृद्ध होण्यासाठी आशीर्वाद देतात जसे आपण लहान मोठ्या गावातील देवी देवता देतो तसं.
आता सगळीकडून कुजबुज सुरु झाली तशी एका मोठ्या देवस्थानचे देव उठून बोलायला लागले, समस्त देव आणि देवीगण आपण सगळे एकच आहोत, आपल्याकडे श्रद्धेने आणि भक्तिभावाने येणाऱ्या कोणत्या भक्ताला आपण आशीर्वाद दिल्याशिवाय जाऊ देतो का?? घराघरातील देवघरात असणाऱ्या तुम्हा देवापुढं अंगणातील ताजी आणि सुगंधाने दरवळणारी फुलं अर्पण करून ज्या भक्तिभावाने आणि मनमोकळपणाने मागणं मागणारे भक्तांसाठी तुम्ही सगळे देव आमच्या सारख्या मोठं मोठ्या देवस्थानातील देवांपेक्षा वेगळे ते कसे काय असू शकतात.
ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते गाडी घोडे आणि कुटुंब कबिल्याचा लवाजमा घेऊन निघतात ते श्रद्धेपोटीच पण ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही ते घरातील देवघरात किंवा त्यांच्या गावातील मंदिरात आपली श्रद्धा आणि भक्ती अर्पण करतातच ना.
परंतु गावातील गणेश मंदिरातील गणपती बाप्पांचे हे सगळं ऐकून समाधान झाले नाही. ते बोलायला लागले, मी ज्या गावातील मंदिरात आहे त्या मंदिरात माझ्या दर्शनाला गावातली लोकं वर्ष वर्षभर येत नाहीत, मंदिरासमोरून कित्येक वेळा जा ये करतात कोणी उजवा हात कपाळाला आणि तोंडावर एक दोन वेळा टेकवून नमस्कार केल्यासारखं करूनही जातो पण मंदिरात येऊन घंटानाद करून दोन चार मिनिट भर बसण्याचे कोणाला सुचत नाही. काही काही लोकं तर हल्ली घरात आर्थिक सुबत्ता आणि गाड्या वाहने असूनही आठ दहा दिवस पायपीट करून मोठ्या मोठ्या देवस्थानांतील देवांच्या दर्शनाला जातात. तिथं गेल्यावर धक्काबुक्की, एकदा अर्पण केले हार, नारळ आणि पूजेचे साहित्य पुन्हा पुन्हा अर्पण करत असतात. पैसे आणि ते खर्च करायचे स्वातंत्र्य ज्याला त्याला पण आरतीचं ताट घेऊन आलेला भक्त बदलतो पण ताटातील हार नारळ तोच तोच पुन्हा पुन्हा येत असतो. सगळ्या भक्त लोकांना कळत असतं की आपली लूट होतेय तरीही श्रद्धेच्या आणि भक्तीच्या नावाखाली ही लूट होऊनही दानपेटीत सढळ हस्ते दान टाकले जाते. समस्त देवांनो महिन्याला आणि हल्ली हल्ली तर दिवसाला करोडो रुपयांचे दान गोळा होणारे मोठमोठ्या देवस्थानातील देव आणि आमच्या सारखे गावपाडयातील लहान मंदिरातील देव कसे काय सारखे असणार.
देवांच्या सगळ्या मूर्ती एकतर दगडाच्या, धातूच्या किंवा मातीच्या असतात एकूणच काय निर्जीव असतात तरीपण देवांचे अस्तित्व मानले जाते पण मग सगळ्या देवांची एकरूपता आणि सगळे देव एकच आहेत हे का नाही मान्य होत? आता तर कोरोनाने मागील सहा महिन्यात सगळ्या मोठ्या देवस्थानात जाणाऱ्या सर्वांना दाखवून दिलेच ना की सगळे सारखेच आहेत. घराघरात असणाऱ्या देव्हाऱ्यातील देवाने सर्वांचे रक्षण केलेच ना.
गणपती बाप्पांचे बोलणे ऐकून झाल्यावर सगळ्या देवांनी असा विचार केला की, मोठ्या देवस्थानात असलेलाच देव आशिर्वाद देतो आणि पावतो असं म्हणणाऱ्यांनी स्वतःच्या गावातल्या घरातल्या आणि त्याहीपेक्षा स्वतःच्या मन मंदिरातल्या देवाकडे कधी काही मागितले आणि मिळाले नाही असा प्रश्न सगळ्या भक्तांनी स्वतःलाच विचारला पाहिजे.
मनातल्या देवाशी माझे काय चुकले आणि मी काय करायला पाहिजे एवढं विचारलं आणि त्यावर आत्मचिंतन केले तरच, त्यांना खरा देव समजल्याशिवाय राहणार नाही.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply