नवीन लेखन...

अमेरिकेतील कामगार चळवळीतील क्रांतिकारक ऐतिहासिक नेतृत्व मदर जोन्स

अमेरिकेतील कामगार चळवळीतील क्रांतिकारक ऐतिहासिक नेतृत्व

अमेरिकेतील अत्यंत धोकादायक भयंकर स्त्री’ असे अमेरिकेतील भांडवलदार आणि कारखानदार यांनी जिचे वर्णन केले आहे, ती मदर जोन्स इ.स. १८३० मध्ये आयर्लंडमध्ये मेरी हॅरिस हे नाव घेऊन जन्माला आली होती. आयर्लंडच्या मातीत आणि पाण्यातच क्रांतिकारकांचे पोषण करण्याचे गुणधर्म असावेत! मेरी हॅरिस जोन्सच्या रक्तातच देशप्रेम, त्यागीवृत्ती, अन्यायाविरुद्धची बंडखोरी आणि बेडर क्रांतिकारक वृत्ती होती. तिचे आजोबा आयर्लंडला स्वातंत्र्यप्राप्ती मिळावी म्हणून ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढताना फासावर गेलेले स्वदेशप्रेमी क्रांतिकारक होते. स्वदेशप्रेमाच्या आणि स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून ब्रिटिशांनी मदर जोन्सच्या वडिलांनाही आयर्लंडमध्ये हद्दपार केले होते.

ब्रिटिशांनी आयर्लंडमधून हद्दपार केलेल्या आपल्या वडिलांसोबत नाइलाजाने आपल्या मातृभूमीला सोडून मदर जोन्सला अमेरिकेत येऊन स्थायिक व्हावे लागले. अशाप्रकारे अमेरिकन कामगार चळवळीस एक ऐतिहासिक स्वरूपाचे क्रांतिकारक नेतृत्त्व मदर जोन्सच्या रूपात नियतीने योगायोगाने बहाल केले होते.

बालपणातच मदर जोन्स आपल्या कुटुंबासह आयर्लंडहून कॅनडातील टोरांटो येथे वास्तव्यास आली होती. इ.स. १८५८-५९ या वर्षी टोरांटो नॉर्मल स्कूल मध्ये तिने शिक्षकी व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले होते. काही काळ तिने शिक्षकी व्यवसायाबरोबरच शिवणकामाचा व्यवसायही केला होता.

इ.स. १८६१ मध्ये मदर जोन्सचा विवाह टेनेसी राज्यातील मेंफिस येथील लोखंडाच्या व्यवसायातील मोल्डर्स आणि कामगार यांचा संघटक असलेल्या जॉर्ज जोन्सबरोबर झाला होता.

मदर जोन्सच्या कपाळी सुख, शांती, स्वास्थ्य किंवा श्रीमंती नियतीने लिहिलेलीच नसावी! वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात मदर जोन्सला सतत वूर नियतीशी आणि निर्दयी, स्वार्थी राजकारणी व भांडवलदार-कारखानदार माणसांशी लढत राहावे लागले. जणू सर्व पातळीवरील सत्ताधीशांशी लढण्यासाठीच तिचा जन्म होता! गरीब आणि कामगार असलेल्या माणसांना न्याय मिळवून देण्याकरिता मदर जोन्स झगडत राहिली. लढत राहिली. हा लढा देणाऱ्या तिच्या अविचल, खंबीर आणि पर्वताप्रमाणे कणखर असलेल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण तिच्या वैयक्तिक जीवनातील पूर्वायुष्यातील संकटांशी लढतानाच झाली असावी.

इ.स. १८६१ मध्ये विवाह झाल्यावर मदर जोन्सने सहा वर्षांत चार अपत्यांना जन्म दिला होता. तिच्या दुर्दैवाने तिचे वैवाहिक आयुष्य फक्त सहाच वर्षांचे ठरले! इ.स. १८६७ मध्ये मेमफिस या गावी राहत असताना पीतज्वराच्या साथीत तिच्या पतीचे आणि तिच्या चारही अपत्यांचे निधन झाले. एखाद्या सामान्य व्यक्तीस दैवाच्या अशा निर्घृण आघाताने वेड तरी लागले असते वा त्या व्यक्तीने आत्महत्या तरी केली असती. परंतु मदर जोन्सला कुणी व कशी शक्ती दिली असेल ते सांगता येत नाही! आपल्या वैयक्तिक जीवनातील नियतीविरुद्धच्या लढाया आपल्या आपणच लढायच्या वा हरायच्या असतात, हेच सत्य!

मदर जोन्स हरणाऱ्या वृत्तीची नव्हती. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ती न कोलमडता खंबीरपणे उभी राहिली. ती शिकागोला गेली. तेथील श्रीमंत लोकांसाठी ती शिवणकाम करू लागली. मदर जोन्स स्वतःला व आपल्या परिस्थितीला सावरू लागली होती. परंतु नियतीला मदर जोन्सला सावरू द्यायचे नव्हते! वूर नियतीने मदर जोन्सची पुन्हा एकदा आग्नपरीक्षाच घेतली. इ.स. १८७१ मधील ग्रेट शिकागो फायर म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या वणव्याने सारे शिकागो शहरच भस्मसात केले होते. अर्थातच मदर जोन्सजवळील जे काही थोडेफार होते नव्हते ते सारे जळून खाकच झाले. नियतीची मेहेरबानी एवढीच, की मदर जोन्सचा जीव मात्र बचावला!

मदर जोन्सने आपल्या आयुष्यातील गरिबीचा, जीवघेण्या संकटांचा आणि अन्यायाचा पुरेपूर अनुभव घेतला होता. परंतु तिची दृष्टी फक्त स्वतःकडे पाहणारी नव्हती. त्यामुळे तिच्या आजूबाजूच्या गरीब, दरिद्री आणि कष्टकरी माणसांवर नियतीने आणि सत्ताधारी श्रीमंत माणसांनी केलेले अन्यायही तिने संवेदनक्षमतेने अनुभवले असावेत. त्यामुळेच अन्यायाविरुद्धची चीड आणि कष्टकऱ्यांच्या अडचणींविरुद्ध लढा देण्याची तीव्र इच्छा तिच्या अंतःकरणात प्रज्वलित झाली असावी. या संदर्भात मदर जोन्सने एका ठिकाणी व्यक्त केलेले विचार तिच्या आजूबाजूच्या वातावरणावर आणि तिला कार्यप्रवृत्त करणाऱ्या परिस्थितीवर प्रकाश टाकतात. मदर जोन्स म्हणाली होती, माझ्या आजूबाजूची बेकार, भुकेकंगाल आणि बर्फाने गोठलेल्या तलावाच्या काठाने हिंडणारी माणसे, मी ज्यांच्याकडे नोकरी करीत होते त्या मालकांनी दुर्लक्षित केलेली होती किंवा त्यांची काळजीही त्यांनी केलेली नव्हती, हे मी पाहिलेले होते.

शिकागोतील १८७१ च्या ग्रेट फायरने किंवा वणव्याने मदर जोन्सच्या जीवनकार्यासच प्रज्वलित केले होते! आपल्या जगण्याची दिशाच जणू त्या आग्नप्रकाशात तिला दिसली होती. कामगारांच्या मदतीसाठी ती कामगार संघटनेच्या दिशेने गेली होती. कामगार वर्गाचे जीवन सुखकर करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणाऱ्या कामगार संघटनांचे कार्य हे आपलेच कार्य आहे असे मदर जोन्सला जाणवले. आपले पुढील सर्व आयुष्य कामगारहितासाठी अर्पण करण्याचा जणू तिने निश्चय केला असावा.

या तिच्या निश्चयाने तिच्यातील जागतिक कीर्तीचे सार्वकालीन स्वरूपाचे कामगार नेतृत्त्व जन्मास आले. कामगार चळवळीत मदर जोन्स सहभागी झाली. नुसता तिचा तिने त्या चळवळीत सहभागच दिला नाही, तर त्या चळवळीचे ती नेतृत्वच करू लागली. कामगारांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ती तळमळीने आणि प्रभावी वाणीने बोलत असे. तिच्या वत्तृत्वशैलीने तिने एकहाती कामगारांचे संप घडवून आणले होते, असे सांगितले जाते. तिच्या परिणामकारक चेतावणी देणाऱ्या वत्तृत्वामुळे व प्रामाणिक वृत्तीमुळे ती कामगार संघटनांत प्रसिद्ध झाली होती. त्याचप्रमाणे ज्या कंपन्यांविरुद्ध किंवा कारखान्यांविरुद्ध ती लढा देत होती आणि ज्या कंपन्यांना संप फोडायचे होते त्यांच्या डोळ्यांत मदर जोन्स तीव्रतेने खुपू लागली होती. विविध कारखान्यांचे अधिकारी व मालक तिला अटक कशी होईल हे पाहू लागले होते. परिणामतः तिच्या आयुष्यात तिला अगणित वेळा तुरुंगवास घडला. तिच्या वयाच्या अगदी ऐंशीव्या वर्षीही तिला तुरुंगात जावे लागले होते.

मदर जोन्सने घडवून आणलेल्या संपात अनेकदा कामगारवर्ग भडकून उठत असे. कारखान्यात कामगारांकडून तोडफोड होई. अर्थातच पोलिसांकडून कामगारांवर गोळीबार होत असे. मदर जोन्स अशा वेळी अविचल वृत्तीने खंबीरपणे कामगारांचे नेतृत्व करीत असे. गोळीबाराने ती डळमळीत होत नसे. संपकरी कामगारांच्या बायकांना एकत्रित करण्याचे तिचे कौशल्यही विशेष होते. त्या बायकांनाही जेव्हा अटक होत असे, तेव्हा त्यांना आपल्याबरोबर स्वतःची मुलेही तुरुंगात घेऊन जाण्यास मदर जोन्स सांगत असे. त्याचबरोबर तुरुंगात रात्रभर गाणी म्हणण्यास त्या बायकांना मदर जोन्स सांगत असे. त्या गाण्यांच्या आवाजाने त्यांच्या जवळची ती मुले जोरजोराने रडारड व बोंबाबोंब करीत. याचा एक परिणाम तुरुंगाधिकाऱ्यांवर होई. कधी एकदा त्या स्त्रियांची सुटका तुरुंगातून होते याची वाटच ते तुरुंगाधिकारी पाहत असत.

विविध कारखान्यांतून ज्या बालकामगारांची पिळवणूक होत होती, त्या बालकामगारांच्या हक्कासाठीही मदर जोन्स झगडली होती. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस तिने बालकामगारांचेही संप घडवून आणले. अशा संपकाळात मदर जोन्स बालकामगारांच्या सभेत अग्रभागी राहून, मुलांनो, संघटित व्हा! संघटनेचे सदस्य व्हा! असे आवाहन करीत असे. आपल्या भावनाप्रधान स्फोटक वाणीने बालकामगारांना अन्यायाविरुद्ध चेतवणारी मदर जोन्स त्या मुलांना आपल्या आजीसारखीच वाटत असे.

इ.स. १९०३ मध्ये बालकामगारांच्या होणाऱ्या पिळवणुकीविरुद्ध फिलाडेल्फियातील कापड गिरण्यांविरुद्ध मदर जोन्सने चळवळ उभारली होती. या चळवळीतील तिच्या एका सुप्रसिद्ध भाषणात ती म्हणाली होती, फिलाडेल्फियातील या भव्य श्रीमंती इमारती या छोट्या मुलांच्या पिचलेल्या हाडांवर, थरथरणाऱ्या हृदयांवर आणि झुकलेल्या डोक्यांवर उभ्या आहेत!

मदर जोन्सचे आयुष्य म्हणजे विशिष्ट अर्थाने अमेरिकेच्या कामगार चळवळीचा चालताबोलता इतिहासच मानला जातो. इ.स. १९७७ मधील पिटस्बर्ग व अन्य भागातील रेल्वे संपातील मदर जोन्सचा सहभाग, इ.स. १८९९ मधील पेनसिल्वानिया येथील कोळसा खाणकामगारांची संघटना उभी करण्यातील तिचा सहभाग, इ.स. १९११ मध्ये बंडखोर मेक्सिकोला दिलेली कोट, इ.स. १९१९ मध्ये होमस्टेड येथे मदर जोन्सला झालेली अटक आणि इ.स. एव९२४ मध्ये शिकागो येथील शिवणकामाच्या व्यवसायातील कामगारांसाठी भेले कार्य म्हणजे मदर जोन्सच्या एकूण कामगार चळवळीच्या प्रदीर्घ अन्याचा छोटा आलेखच ठरतो.

मदर जोन्सच्या कामगार चळवळीतील नेतृत्वाखाली तिचे वय आड येऊ शकले नाही. कापड गिरण्यांतील, लोखंडाच्या कारखान्यांतील आणि रस्त्यावरील मोटारी दुरुस्त करणाऱ्या कामगारांच्या हक्कासाठी मदर जोन्स आपल्या वयाच्या अगदी नव्वदीपर्यंत झगडत राहिली.

मदर जोन्स ही दीर्घायुषी ठरली. शंभर वर्षे जगली. पतीनिधनाचे आणि चार अपत्यांचे जीवघेणे चिरंतन दुःख हृदयाच्या कप्प्यात बंद ठेवून आणि ओटीपोटात गाडून ठेवून ती शंभर वर्षे जगली.

मदर जोन्सच्या शंभराव्या वाढदिवशी साऱ्या अमेरिकेतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सर्व दिशांनी केला गेला. सरकारी अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अत्यंत आदरपूर्वक मदर जोन्सला शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे ज्यांच्या वडिलांविरुद्ध अनेक संप घडवून आणून मदर जोन्सने लढा दिला होता, त्या जॉन डी. रॉकफेलर यांच्यासारख्यांनी मदर जोन्सचे शतक महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या होत्या!

नियतीने जिचा वैयक्तिक संसार अनेकप्रकारे उद्ध्वस्त केला होता, त्या मदर जोन्सने कष्टकरी, गरीब, दरिद्री आणि अन्यायग्रस्त जनतेच्या हितासाठी स्वतः हालअपेष्टा व तुरुंगवास सोसून निरपेक्ष बुद्धीने समाजाचा संसारच आपला मानला होता. त्यामुळे मदर जोन्सचा शतकी जन्मदिवस अमेरिकेसारख्या खंडप्राय देशाने साजरा केला असल्यास आश्चर्य ते कुठले! आज साऱ्या अमेरिकेतच नव्हे, तर जगातील कुठल्याही कोपऱ्यातील कष्टकरी वर्गाला मदर जोन्सच्या कणखर, वादळी, संघर्षमय आणि लढाई व्यक्तित्वात संतांच्या कारुण्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाचेच दर्शन घडते!

एकाच व्यक्तीकडे विविध क्षेत्रांतील माणसे विविध दृष्टीने पाहतात. मदर जोन्सच्या आयुष्यातील घटनांकडेही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पाहतो. ऐंशी वर्षांच्या वयातही तुरुंगवास भोगणाऱ्या आणि नव्वदीतही कामगार चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या मदर जोन्सच्या वयस्कर व्यक्तिमत्त्वामुळे तुरुंगातही तिला काही सवलती दिल्या गेल्या असतील, असे इतिहासकारांना वाटले. नव्वद वर्षांच्या मदर जोन्सला तुरुंगात कोण मारहाण करणार, असा प्रश्नही काही इतिहासकारांनी विचारला होता.

अमेरिकेसारख्या श्रीमंत राष्ट्रात शंभर वर्षे आयुष्य जगलेल्या आणि कामगारांची पुढारी असलेल्या मदर जोन्सला स्वतःचे घरदारच नव्हते स्थावर-जंगम मालमत्ताच नव्हती! नगरसेवक आणि लोकसेवक म्हणविणा कून
-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–

भारतातील आपल्या कामगार पुढाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची गणना लक्षाधीशांत आणि कोट्यधीशांत असल्याचे आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांनीच जाहीर केलेल्या त्यांच्या संपत्तीच्या संदर्भात वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या वृत्तांतून वाचले आहे.

मदर जोन्सला स्वतःचे घरच नव्हते. ही वस्तुस्थिती भारतीयांना अविश्वसनीयच वाटावी अशी आहे. मदर जोन्स ही गरिबाघरची यात्री होती. संघटनेविषयी सहानुभूती असणाऱ्या व्यक्तींच्या आदरातिथ्यावर तिची उपजीविका होत असे. स्वतःच्या घराच्या पत्त्याविषयी तिने एकदा सांगितले होते, माझा घराचा पत्ता हा माझ्या पायातील बुटांप्रमाणेच आहे. माझ्याबरोबरच तो प्रवास करतो. जिथे अन्यायाविरुद्ध लढा असतो तिथेच मी राहते. तोच माझा पत्ता !

मदर जोन्सला अमेरिकेच्या इतिहासातच आता वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. कामगार संघटनांच्या उभारणीचे तिने केलेले कार्य, आणि तिचे वक्तृत्व इतिहास घडविण्याचे श्रेय या सर्वांना तिच्या लेखनापेक्षा अधिक संस्मरणीय मानले जाते. असे असूनही, दि आटोबायोग्राफी ऑफ मदर जोन्स या नावाचे तिचे आत्मचरित्र फार महत्त्वपूर्ण आहे असे मला वाटते. या आत्मचरित्रातील काही भाग तिने स्वतः लिहिला असून काही भाग मात्र तिने तोंडी सांगून अन्य व्यक्तींकडून लिहवून घेतलेला आहे. हे लेखन नैसर्गिक आणि ओघवत्या बोलीभाषेत केलेले आहे. या आत्मचरित्रातून मदर जोन्सची ठाम मते, विचार आणि संकल्पना अतिशय प्रभावीपणे आणि सुस्पष्टपणे शब्दाशब्दातून चित्रित झालेली आढळतात. खाणींच्या शबिरांतील, रेल्वेमार्गावरील शहरांतील आणि कापड उद्योगधंद्यातील लोकांच्या कार्यपद्धतीचे चित्रण मदर जोन्सने फार प्रत्ययकारीपणे केलेले आहे.

युजीन डेब्ज नामक एका लेखकाने मदर जोन्स मृत्यू पावल्यावर तिला व तिच्या कार्यास अभिवादन करण्यासाठी एक लेख लिहिलेला होता. त्या लेखातील मजकूर मदर जोन्सच्या समकालीन व्यक्तीचा म्हणून महत्त्वपूर्ण व जिवंत वाटतो. त्या लेखातील मदर जोन्सचे व्यक्तिमत्व रेखाटनही फार प्रभावी वाटते. तसेच त्या लेखातील तत्कालीन कामगार जीवनाचे आणि मदर जोन्सच्या मोर्चाचे वर्णनही प्रत्ययकारी वाटते. युजीन डेब्जने लिहिले होते,

मदर जोन्स ही सर्व आंदोलनांची आजी म्हणून अमेरिकेच्या सिनेटमध्ये परिचित होती. वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी मदर जोन्सने फिलाडेल्फियापासून न्यूयॉर्क शहरापर्यंत काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व केले होते.

त्या मोर्चात असलेल्या वस्त्रोद्योगातील शेकडो कामगारांमध्ये निम्मे आंदोलक सोळा वर्षे वयाखालील होते. राष्ट्रध्यक्ष रुझवेल्ट यांना भेटून फिलाडेल्फियामधील बालकामगारांच्या कामाच्या महाभयंकर पद्धतीचा शेवट करण्यासाठी त्यांचा पाठिंबा मिळविणे, हा त्या मोर्चाचा हेतू होता. मोर्चातील कामगार चिंध्या झालेल्या लक्तरात होते. गिरणीच्या साच्यावर काम करताना क्षणभरच झालेल्या दुर्लक्षामुळे किंवा निष्काळजीपणामुळे हाताची बोटे गमावलेले अनेक कामगार मोर्चात होते. दर आठवड्यास एकूण साठ तास त्यांना कारखान्यात काम करावे लागत होते. कोणतेही भविष्य नसलेल्या त्यांच्या आयुष्यात आठवडे नुसते येत होते आणि जात होते.

संपूर्ण अमेरिका देशातील गिरण्या, खाणी आणि कारखान्यांतील काम करणाऱ्या एकूण २० लाख बालकामगारांच्या कामाचे आठवड्याचे तास निश्चित करण्यासाठी सर्व आंदोलकांची आजी कटिबद्ध झालेली होती. अत्यंत साध्या वेशातील पाच फूट उंचीची आणि चंदेरी शुभ्र केसांची ती वृद्धा मोठी गोड दिसत होती. परंतु तारेच्या चष्म्यामागील तिच्या डोळ्यांत दुःखाची जाणीव होती. तिचा पती आणि तिची चारही मुले पीतज्वराने निधन पावल्याने आता ही दुःखी, दुर्दैवी माणसेच तिची मुले आणि नातवंडे होती आणि त्यांच्यासाठी कोणतीही किंमत देऊन तिला योग्य न्याय देणारा बालकामगार कायदा अस्तित्वात आणायचा होता. त्यासाठीच तिचा मोर्चा होता आणि त्यासाठीच तिला राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांची भेट घ्यायची होती. तिच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून जर कुणाला तिच्या अंतःकरणात पेटलेल्या अग्निकुंडाविषयी शंका असेल तर ती दूर करण्यासाठी तिचे उद्गार होते, मी मानवतावादी नाही; मी समाजात विलक्षण खळबळ माजवण्यासाठी आलेली आहे!”

मेरी जोन्सने खरोखरच अशातऱ्हेने समाजात अस्वस्थता आणि खळबळ निर्माण केली, की तिच्या आणि तिच्या मुलांच्या मागे लोकमत खंबीरपणे उभे राहिले. लोकप्रतिनिधींची गाळणच उडाली. सिनेटर थॉमस प्लॅट याला जेव्हा ती आपणास भेटण्यासाठी येत आहे असे समजले, तेव्हा हॉटेलच्या मागच्या रस्त्याचा आसरा तिला टाळण्यासाठी त्याने पकडला आणि ट्रॉलीत उडी मारून तो पळून गेला. रुझवेल्टने स्वतःला मोर्चापासून दूर ठेवण्यासाठी सिव्रेट सर्व्हिसद्वारे रस्ते आणि रेल्वेलाइन्सवर पहारा ठेवला. परंतु मदर जोन्स मात्र त्वरित वेगळीच चाल खेळली. तिने तीन गिरणी बालकामगारांना चांगले कपडे घालून रेल्वे गाडी पकडली आणि रविवारसारख्या सुट्टीत एखादे कुटुंब एखाद्या स्थळदर्शनासाठी प्रवासास जाते त्याप्रमाणे ती गेली. ती राष्ट्रध्यक्ष रुझवेल्ट यांच्या निवासस्थानापर्यंतही पोचली. परंतु तेथून तिला आत जाऊ न देता बाहेरच्या बाहेर हुसकावून देण्याव्यतिरिक्त रुझवेल्ट काही करू शकत नव्हता! मात्र शंभर मैल चालून आलेला मोर्चा आणि मदर जोन्सची खळबळजनक झालेली भाषणे यांनी मोर्चाचा हेतू साध्य झाला होता. वृत्तपत्रांतून लोकांचा सरकारविरुद्धचा आक्रोश प्रकट झाला. एकामागून एका राज्यास बालकामगारांच्या संरक्षणासाठी कायदे करावे लागले. ज्या राज्यात ते कायदे होते त्यांचे पालन होईल हे पाहिले जाऊ लागले.

मदर जोन्स आयुष्यभर कामगारहितासाठीच झगडत होती. स्थलांतरित खाणकामगार आणि भूमिहीन शेतमजूर यांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हक्कांसाठी तिचा झगडा होता. मदर जोन्सने कोलोराडो ते व्हर्जिनिया येथील खाणकामगारांना आणि त्यांच्या बायकामुलांना संघटित करून डबे-भांडी-थाळ्या वाजवत अधिकारीवर्गापुढे आणि संपफोड्या कामगारांपुढे जाब विचारण्यास सामोरे नेले होते.

मुंबईतील पाणीवाली बाई म्हणून सुप्रसिद्ध मृणाल गोरे आणि अन्य महिलांच्या थाळी-भांडी-कळशा-लाटणे या आधुनिक मोर्चांचे मूळ मदर जोन्स हिच्या मोर्चापद्धतीतच असावे!

मदर जोन्सने काढलेल्या अशा मोर्चाचे वर्णन करताना तिचा समकालीन युजीन डेब्ज म्हणाला होता, मदर जोन्सच्या या मोर्चेकरी सैनिकांपुढे खरे सशस्त्र, बंदुकधारी शिपाई त्यांच्या खेचरांपेक्षा अधिक घाबरून गेले होते!

मदर जोन्सला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न कामगारविरोधी यंत्रणेने अनेकदा केला होता. वेस्ट व्हर्जिनिया येथील कोळशाच्या खाणकामगारांबरोबरच करार संपुष्टात आला तेव्हा झालेल्या आंदोलनात कामगार आणि खाणसंरक्षकांत गोळीबार झाला होता. मदर जोन्सने कोळशाच्या कंपनीच्या मालमत्तेपासून दूर राहून खाडीच्या किनाऱ्याने चालत जाऊन कामगारांपुढे भाषणे दिली होती. त्यामुळे तिच्यावर समन्स बजावून इतर आरोपींसह तिला कोर्टासमोर उभे करण्यात आले असता लष्करी न्यायाधीशांनी तिला वीस वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा दिली होती.

तुरुंगात मदर जोन्स डगमगली नाही. झोपडीसारख्या ज्या तुरुंगात तिला ठेवली होती तिथे घोंगडीखालील एक छिद्र तिने शोधून काढले होते. त्या छिद्रातून वृत्तपत्रांना आणि काँग्रेसमनना वा लोकप्रतिनिधींना खाणमजुरांची दयनीय स्थिती आणि लष्करी न्यायालयाने केलेला अन्याय यांची माहिती अनेक पत्र पाठवून तिने दिली होती. विशेष बाब म्हणजे दोन बीयरच्या बाटल्या वाजवून ती तिच्याविषयी सहानुभूती असलेल्या एका पहारेकरी शिपायास खूण करून बोलावीस असे. त्या झोपडीखालील भागात रांगत रांगत जाऊन तो शिपाई मदर जोन्सची पत्रे मिळवीत असे.

वीस वर्षांच्या तुरुंगवासातील पहिल्याच महिन्यात मदर जोन्सला निमोनियाचा ताप आल्याने डॉक्टरांनी तिला तुरुंगातून बाहेर काढून एका खाजगी घरात उपचारार्थ ठेवले होते. तिच्यावर उपचार करणारे डॉ. हेन्री हॅटफिल्ड हे वेस्ट व्हर्जिनियाचे गव्हर्नर म्हणून नुकतेच त्यावेळी निवडून गेलेले होते. लष्करी कोर्टाने मदर जोन्सला दिलेल्या शिक्षेचा निकाल मागे घेतला जाईपर्यंत डॉ. हॅटफिल्ड यांनी तिला खाजगी घरातच ठेवले होते.

मदर जोन्सला तिचे विरोधक अमेरिकेतील महाभयंकर धोकादायक स्त्री म्हणून जरी संबोधीत असले तरी कामगारांना मात्र ती देवदूतच आहे असे वाटे. मायनर्स एंजेल म्हणूनच तिला तिच्या कामगारांकडून संबोधले गेले होते. मदर जोन्स मात्र आपल्या कामगारांना बॉईज म्हणत असे. त्या कामगारांवर तिचे जिवापाड प्रेम होते.

मदर जोन्सचा शतकमहोत्सवी वाढदिवस साजरा झाल्यानंतरही पुढे सात महिने ती तिच्या कामगारांसाठी कार्यरत होती. इलिनाईस राज्यातील व्हर्डेन येथील खाणमजुरांच्या १८९८ मधील दंगलीत मृत्यू पावलेल्या कामगारांच्या थडग्याशेजारी मरणोत्तर आपल्या मृत शरीराचे दफन केले जावे, अशी अंतिम इच्छा मदर जोन्सने व्यक्त केलेली होती. ती म्हणाली होती, त्या शूर मुलांबरोबर जमिनीखाली चिरनिद्रा घेणे म्हणजे त्यांचे सांत्वन केल्यासारखे मला वाटेल.

इ.स. १९३६ मध्ये माऊंट ऑलिव्हज युनियन मायनर्स सिनेटरी येथे ८० टन वजनाचे मिनेसोटा ग्रानाईट दगडातील भव्य स्वरूपातील मदर जोन्सचे स्मारक उभारण्यात आले आहे. पन्नास हजार जनसमुदायाच्या उपस्थितीत ते स्मारक उभे राहिले. तिच्या या भव्य आणि प्रेरक स्मारकास भेट देणाऱ्या व्यक्तीस तिच्या दफनभूमीवरील शीळेवर पुढील मजकूर लिहिलेला वाचावयास मिळतो.

तिने आपले सारे आयुष्य कामगार जगतास अर्पण केलेले होते. तिचा पवित्र आत्मा स्वर्गस्थ झाला आहे. परमेश्वराच्या हाताच्या बोटाचा तिला स्पर्श झालेला असून ती आता चिरनिद्रा घेत आहे!

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..