आमच्या गावी श्री अनंतदास महाराज यांच्या सेवे प्रित्यर्थ दरवर्षी प्रवचन भजन वगैरे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असत. पण गावात लांब ठिकाणी हे होत म्हणून आमच्या भागातील लोक जात नसल्याने या भागातील दत्त मंदिरात हे सगळे कार्यक्रम रात्री ठेवण्यात आले होते. म्हणून खूप लोक यायचे. नवू दिवस खूप नावजलेले. प्रवचनकार असे मोठे लोक प्रवचन करत असत. आणि लहानपणी मला माहीत नव्हते म्हणून मला खूप आवडायचे.
कार्यक्रमात एक दिवस मी प्रवचन करावे असे मला सांगणारे होते आदरणीय श्री व्यंकटराव डांगे म्हणजेच दादा. मला वाटले की ते माझी थट्टा करतात. स्वभाव होता तसाच म्हणून. पण त्यांनी खरच सांगितले आहे असे म्हणाले. एवढेच नव्हे तर शाळेत मुलांना कसे शिकवता अगदी तसेच इथेही समजून सांगा. आता शिकवणे आणि प्रवचन?आणि लगेच सांगितले की बहिणाबाई वर प्रवचन करा. खर तर माझे वाचन. अभ्यास अवांतर ज्ञान नाही म्हणून मला भिती वाटली होती. दादांना अनेक अडचणी सांगितल्या होत्या पण त्यानी ऐकले नाही. खूपच दडपण आले होते. माझ्या वर विश्वास ठेवून मला बोलवले आहे तेंव्हा त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे ठरवून मी दुसर्या दिवशी सकाळी शाळेत गेल्यावर काही पुस्तके वाचून टिपणी तयार केली. रात्री मंदिरात गेल्यावर श्री दत्त गुरुंच्या पाया पडून व्यासपीठाच्या पाया पडून श्रोत्यांना वंदन केले व खोपा यावर माझे निरुपण संपवून मी श्रोत्यांकडे पाहिले. पण रोजचा आनंद काही दिसला नाही. उलट कुजबुज होती. मी निराश झाले. माझा चेहरा पाहून दादा माईक हातात घेऊन म्हणाले की बाई विद्यार्थ्यांना का आवडतात हे आज समजले. किती सुंदर शब्दात मानवी स्वभाव आणि निसर्गाची शिकवण याचे वर्णन केले आहे. त्यामुळे या पुढे दरवर्षी त्यांच्या साठी राखून ठेवला जाईल. आता तर दुहेरी कोंडी झाली होती. ते म्हणाले की खर तुम्ही सगळे काय विचार करत आहात हे मला माहित आहे. त्यामुळे मी त्याची उकल करतो. चूक माझीच आहे. मी त्यांना बहिणाबाई एवढेच म्हणालो होतो म्हणून इथे हा सम्रंभ निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता मी संत बहिणाबाई असे सांगायला हवे होते. तरीही बाईंनी खोपा यावरही उत्तम असे निरुपण केले आहे. या त्यांच्या दिलासामुळे माझ्या मनावरचे ओझे उतरले. मी विचार केला की एक होत्या संत एक होत्या कवयित्री पण दोघींच्या मनातील भावना एकच आहेत. भक्ती मार्ग स्विकारा. आणि त्या वेळी मनातील विकाराला आवरा. तेंव्हा ते पुढे म्हणाले की बाईंचे आभार मानले पाहिजेत की एकाच नावाच्या दोन व्यक्तींनी आपल्याला जे काही अभंगातून. कवितेतून सांगितले आहे याचा विचार करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे वाचताना नवीन जुने याचा सुवर्णमध्य कसा गाठायचा ही दृष्टी मिळाली आहे.
लोकांना कदाचित ते पटले असावे. म्हणून त्यांनी दादांच्या बोलण्याला छान दाद दिली. माझ्याही मनावरचे ओझे कमी झाले. आणि ठरवले की या पुढे आपण खूप खूप वाचन करायचे. अशी मोठ्या मनाची माणसं भेटतात आणि आपले विचारही बदलून जातात.एवढ्या लोकांत मला सावरुन घेतले. लोकांच्या मनातील विचार समजून घेऊन त्यांचेही समाधान केले. मुख्य म्हणजे यासाठी स्वतःची चूक कोणती हे सांगितले. याचाच परिणाम माझ्या मनावर जास्त झाला. या साठी मन फार मोठे लागते..
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply