कधीकधी अमुक एखादा माणूस बोलबच्चन आहे वगैरे आपण ऐकतो.. ही बोलबच्चनगिरी सगळ्यांनाच जमते असं नाही पण ज्यांना ती जमते ते यशस्वी होतात असा अनुभव आहे. यशस्वी होतात म्हणजे आजच्या जगाच्या भाषेत पैसे कमावतात असंच म्हणावं लागेल.
बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, अटलबिहारी बाजपेयी वगैरेंसारखी माणसं बोलायला लागली की समोरचा जनसमुदाय कान टवकारुन ऐकत रहातो, अक्षरश: मंत्रमुग्ध होतो. या मंडळींच्या बोलण्यात एकप्रकारची जादू असते.
जी गोष्ट या नेतेमंडळींची तीच शिव खेरा वगैरेंसारख्या मोटिव्हेशनल स्पिकर्सची. ही मंडळी त्यांच्या श्रोत्यांना एकप्रकारची प्रेरण देतात. आजच्या स्पर्धात्मक युगात बर्याच तरुणांना नैराश्याने ग्रासलेले असते. अशा तरुणांना या मोटिव्हेशनल स्पीकर्सचा बराच मोठा आदार वाटतो.
खरंतर मोटिव्हेशनल स्पीकर ही काही नवी संकल्पना नाही. अगदी जुन्या काळातसुद्धा अशा काही व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी इतरांना आधार देण्याचं काम केलं. श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर भगवदगीतेच्या स्वरुपात जे काही सांगितलं ते एक प्रकारचं मोटिव्हेशनच होतं ना? मग श्रीकृष्णालाही मोटिव्हेशनल स्पीकर म्हणावंच लागेल.
आज मात्र मोटिव्हेशनल स्पीकर हे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणारं करियरचं क्षेत्र बनलंय. तसंच ती एक इंडस्ट्रीसुद्धा बनलेय. इथे जसे अनेक तरुण मार्गदर्शनासाठी येतात तसेच अनेकजण या क्षेत्रातील भरभराट बघून या क्षेत्रात करियर करायलाही इच्छुक असतात.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करण्यात हे मोटिव्हेशनल स्पीकर्सही मागे नाहीत. यापैकी बर्याचशा जणांच्या वेबसाईट तर आहेतच पण यु-ट्युबवर त्यांच्या भाषणांचे व्हिडिओही आहेत. बरेचजण आता ऑनलाईन माध्यमांचाही वापर करतात. बर्याचशा मोटिव्हेशनल स्पीकर्सची पुस्तकेही आता अतिशय लोकप्रिय झाली आहेत आणि बेस्टसेलर्सच्या यादीतही झळकत आहेत.
शिव खेरा वगैरेसारखे मोटिव्हेशनल स्पीकर्स एकेका विद्यार्थ्याकडून तीस पस्तीस हजारांची फी घेतात. त्यामानाने मराठी मोटिव्हेशनल स्पीकर्सची फी अतिशय कमी असते आणि त्यांची समजावून सांगण्याची भाषाही मराठी असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही ते पसंत असतात.
या क्षेत्रात करियर करण्याचा विचार करणार्या माणसांकडे जशी बोलण्याची कला हवी तसाच ज्ञान आणि माहितीचा खजिनाही हवा. सोप्या-छोट्या उदाहरणातून विषय समजावून देऊन प्रेरणा देण्याची हातोटीही हवी.
Leave a Reply