मोटारकारमधील विद्युत उपकरणे चालवण्यासाठी विद्युतधारा कोठून मिळते? मोटारकारमध्ये एक विद्युतघट (बॅटरी) असतो. त्यातून मिळणाऱ्या विद्युतधारेमुळे मोटारकार सुरू होते आणि इतर विद्युत उपकरणेही चालतात. मोटारकारमधील विद्युतघटात सल्फ्युरिक आम्ल असते. त्यात शिसे (लेड) या धातूच्या पट्ट्या अर्धवट बुडालेल्या स्थितीत उभ्या असतात. दोन्हींच्या अभिक्रियेतून विद्युतधारा निर्माण होते. यामुळेच या विद्युतघटाला ‘लेड ॲसिड बॅटरी’ आणि सल्फ्युरिक आम्लास ‘बॅटरी ॲसिड’ या नावांनी ओळखले जाते.
अभिक्रियेमुळे शिसे व सल्फ्युरिक आम्ल यांचे घटातील प्रमाण हळूहळू कमी होत जाऊन एका क्षणी विद्युतधारा मिळणे बंद होते. या घटाला बाहेरून विद्युतधारा पुरवल्यास (रिचार्जिंग) मूळ पदार्थ तयार होतात आणि पुन्हा विद्युतनिर्मिती करण्यासाठी विद्युतघट सज्ज होतो. म्हणजेच, हा विद्युतघट पुनःपुन्हा वापरता येतो.
पेट्रोलियम, औषध, खत, रंग अशा अनेक रासायनिक उद्योगांमध्ये सल्फ्युरिक आम्ल हे प्रमुख रसायन म्हणून वापरतात. एखाद्या देशाची औद्योगिक प्रगती तेथील सल्फ्युरिक आम्लाच्या उत्पादनावरून जोखता येते. पर्फ्यूम, डिटर्जंट, घरातील मोरीची स्वच्छता, कर्करोगग्रस्त पेशींचा नाश यांसाठीही हे आम्ल वापरतात.
तीव्र सल्फ्युरिक आम्लास पाण्याचे अतिशय आकर्षण असते. ते त्वचेच्या पेशींमधील पाणी त्वरित शोषून घेते व त्वचा भाजून निघते. खाण्याचा सोडा लावून त्वचेवर सांडलेल्या आम्लाचे त्वरित उदासीनीकरण करता येते. डोळ्यांशी आम्लाचा संपर्क आल्यास आंधळेपणा येऊ शकतो. मोटारकारच्या विद्युतघटामध्ये मात्र तुलनेने सौम्य आम्ल पाण्यातील द्रावण) वापरतात. कारखाने, वाहने यांत (आम्लाचे सल्फरयुक्त इंधने जाळल्यावर सल्फर डायॉक्साइड वायू बनतो. पावसाच्या पाण्यात मिसळून सौम्य सल्फ्युरिक आम्लाच्या रूपात तो खाली पडतो. यालाच आपण ‘आम्ल पर्जन्य (ॲसिड रेन) म्हणतो.
कांदा कापल्यावर त्यातील सल्फर डायॉक्साइड वायू आपल्या डोळ्यांतील पाण्यात मिसळून सल्फ्युरिक आम्ल तयार होते व डोळ्यांची आग होते. अश्रूंद्वारे आम्ल बाहेर निघून जळजळ कमी होते.
सूर्यकिरणांमुळे मंगळाच्या वातावरणातील सल्फर डायॉक्साइड, बाष्प यांपासूनसल्फ्युरिक आम्लाचे ढग तयार होतात. त्यामुळे पृथ्वीवर जसा पाण्याचा पाऊस पडतो तसा मंगळावर तीव्र सल्फ्युरिक आम्लाचा पाऊस पडतो.
सुशील चव्हाण (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply