आपल्या तोंडाची दुर्गंधी ही एक समस्या होऊन बसते, त्यामुळे मौखिक आरोग्यही काहीवेळा बिघडू शकते. तोंडाची दुर्गंधी ही अन्नकण अडकून राहिल्याने निर्माण होते. आपण रोज दोन वेळा टूथ ब्रशने दात घासतो पण हा अ ब्रश केवळ तोंडाच्या किंबहुना दातांच्या पंधरा टक्के भागापर्यंतच पोहोचत असतो, त्यामुळे पुरेशी स्वच्छता होत नाही.
काही अन्नकण तसेच अडकलेले राहतात. दात ज्या दिशेने उगवतात त्या दिशेने घासायचे असतात, पण दुर्दैवाने एवढे शास्त्र पाळत बसायला आपल्याला सकाळी-संध्याकाळी वेळही नसतो. दातांची स्वच्छचा नीट राखली नाही तर तोंडात जिवाणूंची वाढ होते व त्यामुळे दात किडतात तसेच हिरड्यांचे आरोग्यही बिघडते.
यावर उपाय म्हणून जो रासायनिक द्रव पदार्थ पाण्यात मिसळून चुळा भरल्या जातात त्याला माउथ वॉश असे म्हणतात. माउथ वॉश ही दात घासण्याला पूरक प्रक्रिया आहे पर्याय नाही, त्यामुळे दात घासावेच लागतात. माउथ वॉशचा इतिहास जुना आहे. आयुर्वेद व चिनी वैद्यकात त्याचा उल्लेख आला आहे. हिपोक्रॅटिसने असे सुचवले होते की, मीठ, तुरटी व व्हिनेगर यांचे मिश्रण पाण्यात तयार करून त्याने चुळा भराव्यात तो माउथ वॉशचाच प्रकार होता.
दातांवर साचणारे किटणही या माउथवॉशमुळे नाहीसे होते. फ्लुरॉईडवर आधारित माउथ वॉश हे दातांची झीज रोखतात. अँटिसेप्टिक माउथ वॉशमुळे जिवाणू मारले जातात व श्वासाची दुर्गंधी कमी होते. अँटिसेप्टिक माउथ वॉशने दातांवर डाग पडण्याची शक्यता असते. या दोन्हींचे मिश्रण असलेले माउथ वॉश हे श्वासाची दुर्गंधी, दातांची झीज रोखते. यात मॅजिक माउथवॉश असा एक प्रकार असतो त्यात डॉक्टरांनी ठरवून दिलेली औषधे मिसळून मिश्रण तयार केले जाते. मॅजिक माउथ वॉशमध्ये लिडोकेन शिवाय काही अँटासिड, अँटीहिस्टामाईन यांचा वापर केला जातो.
गरजेनुसार अँटिबायोटिक्स व स्टिरॉईडसचा समावेश केला जातो. डायफेनहायड्रामाइन या अँटी हिस्टामाईनने वेदना कमी होतात. आधुनिक माउथ वॉशचा शोध डॉ. जोसेफ लॉरेन्स व जॉर्डन व्हीट लॅम्बर्ट यांनी अँटिसेप्टिक म्हणून लावला. इंग्लंडचे डॉ. जोसेफ लिस्टर यांच्या नावावरून त्याला लिस्टरिन असे नाव मिळाले.
१९१४ मध्ये अमेरिकेत लिस्टरिन तयार करण्यात आले. लिस्टरिनमध्ये मेंथॉल, थायमॉल, मेथिल सॅलिसिलेट, युकॅलिप्टॉल, इथनॉल असे घटक असतात. यात थायमॉल अँटिसेप्टिक, मेथिल सॅलिसिलेट हे स्वच्छताकारक व मेंथॉल हे अॅनेस्थेटिक असते. त्यात क्लोरिहेक्झिडाइनही वापरतात. माउथ वॉश परवडत नसेल, तर कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करणे हितकारक असते. पेरसिका सारखी हर्बल माउथ वॉशही उपलब्ध आहेत.
Leave a Reply