भाजपाचे नेते व खासदार विनय सहस्रबुध्दे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९५७ रोजी झाला.
विनय सहस्रबुध्दे हे मूळचे धुळयाचे. विनय सहस्रबुद्धे यांचे वडील ‘खादी ग्रामोद्योग’मध्ये नोकरी करत होते. विनय सहस्रबुद्धे यांचे बालपण धुळे येथे गेले. पाचव्या इयत्तेत त्यांची निवड एका विशेष शाळेसाठी झाली. तेव्हाच्या नासिक महसूल विभागातून तुलनेने जरा ‘स्पार्क’ असलेली आणि हुशार मुले त्या शाळेसाठी निवडली जात असत. मधुकरराव चौधरी ह्यांच्या कल्पनेतून साकार झालेली ती शाळा होती. विदर्भातून आलेले ब्र.भा.सिंघम हे त्या शाळेचे प्राचार्य होते. ते कल्पक आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीने काम करणारे होते. त्यांचा सहकारीवर्गही तसाच होता. त्या निवासी शाळेत अभ्यासाबरोबर अन्य उपक्रमही यशस्वीपणे राबवले जात असत. शाळेत प्रिंटिंग प्रेस, डार्करूम, fret machine, ग्रंथालय आणि बाग होती. मुले fret machine वर खेळणी बनवत असत. पुस्तके नोंद करून ठेवतानाच वाचून होत असत. मुले किचनचे स्टोअर सांभाळत असत. मुलेच बागेची निगराणी करत. शाळेत लेझीम आणि बँडपथके होती. मुलांनी वर्गात बसण्याची व्यवस्थाही वैशिष्ट्यपूर्ण होती. तीन बेंचचा एक गट व त्यावर सहा विद्यार्थी बसत. असे पाच गट प्रत्येक वर्गात असत. एका वर्गात तीसच मुले असत. मुले गटागटाने वर्गातला अभ्यास आणि शाळेतली सर्व कामे करत.
विनय तेथे असताना त्यांनी `पालवी` नावाचे हस्तलिखित काढले होते. एका वर्षी त्यांनी स्वत: खिळे जुळवून एक मासिक छापलेदेखील! त्यांच्या गटाने सातवीत असताना ‘आजार्याषची खोली’ हा दोनशे पानांचा प्रबंध लिहिला होता. विनय सहस्रबुद्धे यांच्या कॉलेजजीवनाचा प्रारंभ पुण्यात स. प. कॉलेजमध्ये झाला. तिथे ते विद्यार्थी परिषदेकडे आकर्षित झाले. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे चे सक्रिय कार्यकर्ते आणि नेते बनले. ते आणीबाणीच्या काळात सत्याग्रही म्हणून तुरुंगात गेले. जेलमध्ये दीड महिना राहणे हा मनावर खोलवर परिणाम करणारा अनुभव आहे ही त्यांची प्रतिक्रिया. आसपासच्या लोकांचे अंतर्बाह्य दर्शन घडवणार्याी जेलने, मोठी वाटणारी माणसे मनाने किती छोटी असतात आणि छोटी वाटणारी माणसे मनाने किती मोठी असतात ह्याचा प्रत्यय दिला. तो दीड महिना आणि परत संघबंदीला वर्ष झाले म्हणून दोन-तीन दिवस तुरुंगात राहण्याचा काळ हा त्यांची स्वत:ची व्हिजन बनण्याचा आणि वैचारिक ओळख दृढ करण्याचा होता.
दरम्यान त्यांच्या वडिलांची बदली मुंबईला झाली आणि विनय सहस्रबुद्धे त्यांच्या कुटुंबीयांबरोबर मुंबईत दाखल झाले. ते रुइया कॉलेज मध्ये शिकत असताना ‘हवा कॉलेजची’ ह्या सदरासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स ’ ह्या दैनिकात लिहीत असत. त्यावेळी ‘मटा’त असलेल्या दि.वि.गोखले, प्रकाश अकोलकर वगैरे लोकांबरोबर भेटी होत. ‘लोकसत्ता’ च्या चंद्रशेखर वाघांनी विनय सहस्रबुद्धे यांची ‘जेल डायरी` प्रसिद्ध केली. रत्नागिरीचे सतीश कामत (पत्रकार) ह्यांनी त्यांना `माणूस’च्या श्री.ग.माजगावकर ह्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळवून दिली. साधे वाटणार्याा पण ‘ग्रेट’ असणाऱ्या माजगावकारांबद्दल विनय सहस्रबुद्धे आदराने बोलतात आणि आपल्या जडणघडणीवर त्यांचा खूप प्रभाव पडला आहे असे सांगतात. ‘माणूस`ने त्यांना १९८०साली आसाम राज्यात पाठवले. त्यांनी ‘अस्वस्थ आसाम’ ही लेखमाला लिहिली.
लहानपणी शासकीय निवासी शाळेत राहिल्याने संघाच्या शाखेत जाणे विनय सहस्रबुद्धे यांना शक्य नव्हते. अर्थात घरातले वातावरण संघाचेच होते. त्या मुळे अ.भा.वि.प. च्या मार्गाने विनय नंतर संघपरिवारात सामील झाले. अर्थात असे असूनही यशवंतराव केळकर यांच्यासारख्या अनेकांनी सर्व विचारांच्या व्यक्तींशी मैत्री करण्याचीच शिकवण आम्हाला दिली असे ते सांगतात. शिवाय ‘माणूस’च्या संस्कारामुळे त्यांच्यात कधी झापडबंदपणा आला नाही असे ते नमूद करतात. ते पदव्युत्तर शिक्षण घेत असताना एका ‘न्यूज एजन्सी’त इंग्लिश आणि मराठीतून स्तंभलेखन, सदरलेखन करत होते. ते शिक्षण संपवून तब्बल पाच वर्षे अ.भा.वि.प. चे पूर्ण वेळ कार्यकर्ते बनले. त्या काळातले त्यांचे गुरू व मार्गदर्शक प्रा.यशवंतराव केळकर, ह्यांना ते कधी विसरू शकणार नाहीत. ‘कार्यकर्ता म्हणून मी जो काही आहे त्याचे सगळे श्रेय केळकर ह्यांना आहे’ असे ते म्हणतात. तो नेतृत्वगुण बाणण्याचा काळ होता. त्याच वेळी स्टुडंट्स एक्सपीरियन्स इन इंटरस्टेट लिविंग (SEIL ) ह्या योजनेअंतर्गत ते वारंवार पूर्वांचलात जात. ‘एकाकी पूर्वांचल’ (१९८७) हे पुस्तक त्या अनुभवाचे संकलन आहे. ते अ.भा.वि.प.चे काम थांबवून १९८५ नंतर सार्वजनिक जगतात स्वतःची ओळख काय आहे ते अजमावून पाहण्यासाठी मिडीयाच्या जगात शिरले. ते ‘मिड-डे ’ ह्या दैनिकात उपसंपादक म्हणून पाच-सहा महिनेच रमले. मग ते ‘कॅम्लिन ’मध्ये PRO म्हणून काम करू लागले. तिथे ते दोन वर्ष राहिले. त्याच दरम्यान ते विवाहबद्ध झाले.
त्यांच्या पत्नी नयना सहस्रबुद्धे ह्याही अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्या. त्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मॅनेजर म्हणून काम पाहतात. त्या भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या सचिवही आहेत. त्यांनी स्वत:कडे घराची, विशेषत: आर्थिक जबाबदारी घेऊन विनयना त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्याची मुभा दिली आणि फेब्रुवारी १९८८ मध्ये विनय संघपरिवाराच्या एका महत्त्वाच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत नवीन आव्हाने स्वीकारायला सज्ज झाले. तेव्हापासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही त्यांची कर्मभूमी झाली. आता प्रबोधिनी म्हणजे विनय सहस्रबुद्धे असे समीकरण झाले आहे. प्रबोधिनीची वाटचाल गेली अठ्ठावीस वर्षे जोमाने सुरू आहे.
राजकीय क्षेत्रात ग्रामपंचायत सदस्यांपासून, आमदार-खासदार, तसेच राज्य सरकारच्या मंत्र्यांपर्यंत, तर स्वयंसेवी क्षेत्रात बचत गटातील महिलांपासून पर्यावरणापर्यंतच्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणापर्यंत प्रबोधिनीने स्पर्श केला आहे. संघटनाशास्त्र, नेतृत्वशास्त्र, संस्थाबांधणी ह्या संकल्पनांचे वर्तमान व्यावहारिक संदर्भ तपासून व्यवस्थापन शास्त्राचा उपयोग स्वयंसेवी संस्थांच्या बळकटीसाठी आणि कार्यकर्त्यांच्या गुणवत्ताविकासासाठी कसा करून घेता येईल या दृष्टीने प्रबोधिनी कार्यक्रम आखते. प्रबोधिनीने शैक्षणिक संस्थांमधील घटकांसाठी क्षमता विकास कार्यक्रम, स्वयंसेवी संस्थांमधील कार्यसंस्कृतीबाबत दिशादर्शन, सार्वजनिक कार्यक्रमांची आखणी, वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये शिबीर, प्रकल्प प्रस्ताव लिखाण तंत्र असे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले होते.
प्रबोधिनी ज्यांच्या नावाने ओळखली जाते त्या रामभाऊ म्हाळगी यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आदर्श विचार करून तो अमलात आणला होता. ते आपण प्रतिनिधी म्हणून केलेल्या कामाचा अहवाल दरवर्षी जनतेसमोर ठेवत असत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन प्रबोधिनीनेही आपल्या कामाचे अहवाल १९८९ पासून ते काम करत असे पर्यत प्रसिद्ध केले आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रबोधिनीच्या विविध कक्षांपैकी महत्त्वाचे असे केंद्र म्हणजे ‘संदर्भ, माहिती आणि प्रलेखन केंद्र ’ देश-विदेशातील वृत्तपत्रे, मासिके व नियतकालिकांमधून पस्तीस निवडक विषयांवर, अभ्यसनीय व संदर्भ असलेला मजकूर कात्रण स्वरूपात पाठवणारी पाक्षिक सेवा तेथून पुरवली जाते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा आंतरराष्ट्रीय कक्ष हा सांस्कृतिक स्नेह्बंधातून आंतराष्ट्रीय सामंजस्य हे मुख्य सूत्र धरून काम करणारा मंच आहे. प्रबोधिनी प्रकाशनाच्या क्षेत्रातही उतरली आहे. प्रबोधिनीने ‘संघटनशास्त्र’, ‘प्रमोद महाजन : दूरदर्शी नेतृत्व’, ‘सार्वजनिक कार्यकर्ता : मनोरचना आणि व्यवहार’, ‘निवडक माणूस’ ही विनय सहस्रबुद्धे यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत.
प्रबोधिनीचे संचालकपद सांभाळत विनय सहस्रबुद्धे ह्यांचा अभ्यास आणि देश-विदेशात दौरे चालू असत. त्यांनी सर्व पातळ्यांवर अवमूल्यन होऊन र्हा्स पावत असलेली लोकशाही आणि बहुतांश राजकारणी लोकांची वृत्ती व एकंदरीतच राजकीय वातावरणाचा वेध घेणारा अभ्यास करून ‘Political Parties as Victims Of Populism and Electoral Compulsions : A Quest for Systemic Solutions.’ हा प्रबंध लिहून Ph.D. (मुंबई विद्यापीठ) मिळवली आहे.
विनय सहस्रबुद्धे यांचा अनेक मान्यवर संस्थांशी अध्यक्ष, सभासद, सल्लागार ह्या नात्याने संबध आला आहे. त्यांच्या मते, ह्यांतली बरीच पदे ही शोभेची असतात, आपण फारसे काही करू शकत नसलो तरी ह्या विविध संस्थांचा कारभार कसा चालतो, मोठ्या माणसांना जवळून पाहणे ह्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वाला नवीन आयाम देणाऱ्या असतात. ते भाजपच्या कार्यकारी समितीचे सभासद २००८ पासून राहिले आहेत आणि पक्षाच्या अध्यक्षांचे राजकीय सल्लागार म्हणून काम त्यांनी केले आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून विनय सहस्रबुध्दे यांनी काम केले आहे. सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत. भाजपाच्या वैचारिक अभ्यासगटात महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply