मिसेस पॅकलटाईडला स्वतः वाघ मारायचा होता.
तो तिचा निश्चय होता व त्यांत तिला आनंद होता.
वाघाला मारण्याची लालसा काही एकाएकी उत्पन्न झाली नव्हती की तिला असेही वाटले नव्हते की माणसांगणिक वाघांचं असणार प्रमाण एक वाघ मारून थोडंसं कमी करून भारत देश ती आली तेव्हां होता त्यापेक्षा सुरक्षित करावा.
तिचे पाय अचानक तिकडे वळायला लावणारं खरं कारण हे होतं की लूना बिंबरटनला अलिकडेच एक अल्जिरीयन वैमानिक विमानांतून अकरा मैल दूर घेऊन गेला होता आणि ती आता त्याशिवाय दुसरं कांही बोलतच नव्हती; अशा प्रकाराला यशस्वी प्रत्युत्तर द्यायला स्वत: वाघ मारून मिळवलेल्या त्याच्या कातड्याची आणि वर्तमानपत्रांत शिकारीची अनेक छायाचित्रे प्रसिध्द होणं,हेच आवश्यक होतं.
मिसेस पॅकलटाईडने मनांत ठरवूनही टाकलं होतं की तिच्या कर्झन स्ट्रीटवरच्या घरी लूना बिंबरटनच्या सन्मानार्थ, निदान दाखवायचं कारण तरी हेंच असणार होतं, मोठी मेजवानी द्यायची.
त्यावेळी कार्पेटच्या बराचश्या भागावर वाघाचं कातडं पसरायचं आणि मेजवानीच्या टेबलावर वाघाच्या शिकारीबद्दलचं बोलणं चालू ठेवायचं.
तिने मनाशी असाही बेत ठरवला होता की वाघाच्या नखांचा एक ब्रूच बनवून तो लूना बिंबरटनला तिच्या येत्या वाढदिवसाला भेट द्यायचा.
जग हे मुख्यतः प्रेम आणि भूक ह्या दोन गोष्टींवर चालत असतं असं म्हणतात पण मिसेस पॅकलटाईडचं जग हे मुख्यतः तिला लूना बिंबरटनबद्दल वाटणाऱ्या तिरस्कारावर चालत असे.
परिस्थिती तिला साथ देणारी होती.
तिने जास्त श्रमाशिवाय आणि धोका न पत्करतां वाघ मारायची संधी देण्याबद्दल एक हजार रूपये देऊ केले होते आणि असं झालं होतं की एका म्हाताऱ्या थकलेल्या आणि मोठ्या प्राण्यांची शिकार न करू शकल्यामुळे लहान सहान प्राणी खाऊन पोट भरणाऱ्या वाघाने आपलं भक्ष्य शोधण्याचं ठिकाण म्हणून जवळचचं एक गांव निवडलं होतं.
मिसेस पॅकलटाईडकडून मिळण्याची शक्यता असलेल्या हजार रूपयानी गांवकऱ्यांची खिलाडू वृत्ती आणि धंदा करण्याची प्रवृत्ती जागी केली होती.
गांवाच्या वेशीवर असलेल्या जंगलांत त्या वाघावर लक्ष ठेवण्यासाठी मुलांचे दिवस रात्र पहारे बसवण्यांत आले होते.
तो भक्ष्याच्या शोधात कुठेतरी लांब निघून जाऊ नये म्हणून त्याला सहज पकडतां येतील असे छोटे बकरे वगैरे त्याच्या आजूबाजूला पसरून ठेवत म्हणजे तो खुशीने तिथेच राहिला असता.
मड्डमसाहेबांनी बंदुकीने मारण्याआधीच जर तो भुकेने किंवा म्हातारपणाने मेला तर त्यांचे हजार रूपये गेले असते.
जंगलातून कामावरून परत येणाऱ्या बायका सुध्दा त्यांची नेहमीची गाणी म्हणत नव्हत्या कारण त्यांच्या गाण्यामुळे त्या म्हाताऱ्या वाघाची झोंपमोड होऊन तब्येत बिघडली असती तर !
ती महत्त्वाची रात्र येऊन ठेपली.
चंद्रप्रकाशाने न्हालेली आणि आकाशांत अजिबात ढग नसलेली.
एका सोयीस्कर झाडावर एक अतिशय आरामदायक मचाण उभारली होती आणि त्यावर मिसेस पॅकलटाईड आणि त्यांची पगारी जोडीदार मिस मेबीन दोघी दबा धरून बसल्या होत्या.
तिथून अगदी योग्य अंतरावर एक सतत बें बें ओरडणारा एक बकरा ह्या आशेने बांधला होता की थोडासा बहिरा वाघ देखील ते सहज ऐकू शकेल.
निदान अशी अपेक्षा होती.
अचूक नेम झाडतां येईल अशी बंदूक आणि वेळ घालवण्यासाठी बरोबर ठेवलेले पत्ते घेऊन त्या दोघी आपल्या सावजाची वाट पहात बसल्या होत्या.
मेबीन मधेच म्हणाली, “मला वाटते, आपल्याला कांहीतरी धोका आहे.”
खरं तर ती त्या वाघाला मुळीच घाबरली नव्हती.
पण तिचा स्वभाव असा होता की तिला जो पगार मिळत असे, त्यापेक्षां अगदी पैचं सुध्दा जास्त काम करायची तिची पध्दत नव्हती.
मिसेस पॅकलटाईड म्हणाली, “काय हा मूर्खपणा ?
तो एक अगदी जख्ख म्हातारा वाघ आहे.
त्याची इच्छा असली तरी तो इतकी उंच उडी मारू शकणार नाही.”
“जर तो इतका म्हातारा वाघ आहे तर तुम्हांला तो स्वस्तात मिळायला हवा होता.
एक हजार रूपये हे खूपच पैसे आहेत.”
लुईसा मेबीनने मिसेस पॅकलटाईडचे संरक्षण करणाऱ्या मोठ्या बहिणीसारखा पवित्रा पैशांच्या बाबतीत राष्ट्रीयता किंवा आपण कोण आहोत ह्याचा विचार न करता घेतला.
तिने रशियामधे अनेकांचे रूबल्स, फ्रान्समधे फ्रँक्स, इतरत्र सेंटस असे चुकीच्या हातात पडण्यापासून वाचवले होते.
तिचं वाघाच्या मार्केटमधल्या किंमतीच्या घसरणीबद्दलचं बोलणं मधेच राहिलं कारण तो वाघ स्वतःचं समोर आला होता.
त्याने जसं त्या बांधलेल्या बोकडाला पाहिलं तसा तो जमीनीवर पंजे पसरून आडवा झाला.
तो अता कांही झेप घेण्यासाठी किंवा परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी तरूण नव्हता तर मोठा हल्ला करण्यापूर्वी त्याला विश्रांतीसाठी झोंप घ्यायची होती.
लुईसा जवळच्याच झुडुपांत लपलेल्या गांवाच्या प्रमुखाला ऐकू यावं म्हणून मुद्दाम मोठ्याने आणि हिंदीत म्हणाली,”मला वाटतय, तो आजारी आहे.”
“गप्प, गप्प. मिसेस पॅकलटाईड म्हणाली आणि त्याच वेळी वाघ आपल्या भक्ष्याच्या दिशेने हळूहळू सरकूं लागला.
लुईसा मेबीन उत्साहाने म्हणाली, “आता जर त्याने त्या बकऱ्याला स्पर्शही नाही केला तर आपण कांही त्याचे पैसे द्यायचे नाहीत.”
बकऱ्यासाठी थोडे पैसे वेगळे द्यायचे होते.
बंदूक क्षणभर चमकली आणि मोठा बार वाजला.
त्या महाकाय पिवळसर प्राण्याने एका बाजूला उडी घेतली आणि पाठीवर पडून तो मृत्यूच्या शांततेच्या आधीन झाला.
एका क्षणात तो जमाव आनंदाने ओरडू लागला आणि क्षणाक्षणाला गर्दी वाढू लागली.
बातमी गांवात वाऱ्यासारखी पसरली आणि लोक ढोल ताशांच्या गजरात विजयगीत गात नाचू लागले.
आणि त्यांच्या आनंदाचा प्रतिध्वनी मिसेस पॅकलटाईडच्या हृदयांतही वाजू लागला.
तिला आता कर्झन रोडवरची पार्टी बरीच जवळ आलेली डोळ्यांसमोर दिसू लागली.
लुईसा मेबीनने मिसेस पॅकलटाईडचं लक्ष त्या बोकडाकडे वेधलं.
त्या बोकडाला बंदुकीची गोळी लागून जखम झाली होती व तो मरणाच्या दारांत होता तर त्या वाघाला बंदुकीची गोळी लागलीच नव्हती.
स्पष्ट होतं की चुकीच्या प्राण्यावर गोळी झाडण्यात आली होती आणि सावज असलेला म्हातारा वाघ बंदुकीच्या आवाजाने घाबरूनच मेला होता.
मिसेस पॅकलटाईडच्या हे लक्षांत आल्यावर ती क्षणभरचं खूप नाराज झाली.
पण कांही असलं तरी तो मृत वाघ आता तिच्या ताब्यांत आला होता.
आणि हजार रूपयांच्या बक्षिसावर नजर असलेले गांवकरी तिनेच तो वाघ मारला ह्याची साक्ष द्यायला तयार होते.
मिस् मेबीन ही तिची पगारी नोकर होती.
तेव्हा मिसेस पॅकलटाईडने वृत्तपत्रांना भरपूर फोटो आरामात घेऊ दिले.
तिची वृत्तपत्रांतील प्रसिध्दी अगदी टेक्सासच्या स्नॅपशाॅट आणि इलस्ट्रेटेड विकलीच्या नेहमीच्या आवृत्तीत तसेच खास पुरवणीपर्यतही पोहोचली.
लूना बिंबरटनने मात्र अनेक दिवस इलस्ट्रेटेड विकलीला हातच लावला नाही.
तिचं वाघाच्या नखांचा ब्रूच भेट पाठवल्याबद्दल आभार मानणारं जे पत्र आलं ते म्हणजे खऱ्या भावना कोंडल्यावर काय लिहिले जाऊ शकते ह्याचा उत्तम नमुना होता.
लंच पार्टीला तिने नकारच दिला.
सहन करायला कांही सीमा असते.
प्रत्यक्ष भेटीत भावना अनावर होऊन मनांतलं खरं ते बाहेर येऊन हातून कांहीही होऊ शकतं.
कर्झन स्ट्रीटवरून यथावकाश ते वाघाचे कातडे इंग्लंडमधील मनोर हाऊसमधे गेले.
तिथे सर्वत्र प्रसिध्द झाले.
एका वेशभूषा नाचाला ती डायना (देवी) बनून गेली तेव्हां लोकांनी तिचं खूप कौतुक केलं.
पण क्लोवीसची सूचना होती की प्रत्येकाने आपण मारलेल्या प्राण्याचं आणि तिने वाघाचं कातडं घालून नाचावं.ही विनंती करतांना लाजत असंही म्हणाला होता की त्याने दोन सशांखेरीज कांही मारले नव्हते.
ही विनंती मात्र तिने धुडकावून लावली.
ह्या नाचाच्या प्रसंगानंतर कांही दिवसांनी मिस मेबीन म्हणाली, “ह्या सगळ्या लोकांना किती मजा वाटेल जर त्यांना त्यावेळी खरं काय झालं ते कळेल ?”
मिसेस पॅकलटाईडने ताबडतोब विचारलं, “म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ?”
“तुम्ही वाघाऐवजी बकऱ्याला कशी गोळी घातलीत आणि वाघ कसा नुसता त्या आवाजानेच घाबरून मेला.”
मिस मेबीन तिचं छानसं पण मिसेस पॅकलटाईडला न आवडणारं हंसू हंसत म्हणाली.
मिसेस पॅकलटाईड म्हणाली, “कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही.”
हे बोलतांना तिच्या चेहऱ्याचा रंग क्षणोक्षणी बदलत होता.
“लूना बिंबरटन तर नक्कीच ह्या हकीकतीलर विश्वास ठेवेल,” मिस मेबीन म्हणाली.
मिसेस पॅकलटाईडचा पूर्ण रंगच हिरवा झाला, ती म्हणाली, “तू माझा विश्वासघात करणार नाहीस.”
“मी डार्कींग ह्या समुद्रकाठी असलेल्या गावात एक छान कॉटेज पाहिले आहे.
ते मला विकत घ्यायचं आहे.”
कांहीतरी संबंध नसल्यासारखं सहज मिस मेबीन म्हणाली.
“६८० पौंड फक्त. फ्रीहोल्ड जागा.
दर वाजवी आहे.
फक्त माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत.”
लुईसा मेबीनचं सुंदर कॉटेज, ज्याचं नाव तिने “लेस फेवज्” असं ठेवले आहे आणि वसंत ऋतुंत ते त्याच्या टायगर लिलीजच्या कंपाउंडमुळे फारच छान दिसतं. तें तिच्या मैत्रिणींना आश्चर्यचकित करणारं, तिचा हेवा करायला लावणारं आणि आनंदीतही करणारं ठिकाण झालं आहे.
त्या म्हणतात, “आश्चर्य वाटतं की लुईसाला हे घेणं कसं परवडलं ?”
मिसेस पॅकलटाईड मात्र आता शिकारीत भाग घेत नाहीत.
कांही मैत्रिणी विचारतात, त्यांना त्या म्हणतात, “शिकारीला अवांतर खर्चही खूपच येतो, म्हणून शिकार सोडली.”
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा – मिसेस पॅकलटाईडस् टायगर.
मूळ लेखक – साकी (एच्. एच्. मुनरो १८७० – १९१६)
तळटीप : साकी ह्या टोपण नावाने मुनरोने बरंच लिखाण केलं.
तो विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द होता.
ही एक अशीच विनोदी कथा.
भारतात आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका स्वतःला राजघराण्यांतल्याच समजत.
येन केन प्रकारेण प्रसिध्दी मिळवायचा त्या प्रयत्न करीत.
पोकळ बडेजाव मिरवीत.
अशाच एका इंग्रज बाईने वाघ मारला, त्याचं नर्म विनोदी वर्णन कथेत आलं आहे.
खरी गोष्ट माहित असलेली तिची पगारी जोडीदार मात्र त्या संधीचा योग्य वेळी स्वत:ला घर मिळवण्यासाठी करून घेते व चोरावर मोर बनते.
Leave a Reply