जीव काढून घ्यायचा
आणि विचारायचं जिवंत आहेस का…?
किती सोयीस्कर बदलतोस
भूमिका तुझी…?
बेफाम वादळात…
शिड म्हणून वापरायचं
आणि म्हणायचं तुटते आहेस का…?
किती ग्राह्य धरायचं तुला…?
अग्नी पंखांची भरारी व्हायची मी
आणि म्हणायचं माझ्यासाठी
फडफडशील का…?
सुंदर अविष्काराचं चिञ व्हायचं…
आणि म्हणायचं भावनांचे रंग
भरशील का…?
वास्तवाच्या तप्त अग्नीत झोकायचं
आणि म्हणायचं सोसशील का…?
एकतानतेत तू नहायचंस
आणि म्हणायचं अहीर भैरव
होशील का…?
सावज केलंस माझं…
आता मी विचारते….
मृगया माझी केलीसच का….?
©लीना राजीव.