नवीन लेखन...

मुग्ध प्रणयी चारुकेशी

आपल्या रागदारी संगीतातून ज्या भावना व्यक्त होतात, त्या बहुतांशी अतिशय संयत स्वरूपाच्या असतात. किंबहुना, “संयत” हेच रागदारी संगीताचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. अगदी दु:खाची भावना घेतली तरी, इथे “तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे” असेच दु:ख स्वरांमधून स्त्रवत असते. इथे ओक्साबोक्शी भावनेला तसे स्थान नाही. भक्ती म्हटली तरी त्यात लीनतेला सर्वात महत्व. ईश्वराच्या नावाने काहीवेळा “टाहो” फोडला जातो पण ती एक छटा झाली, लक्षण नव्हे. प्रणयी भावना देखील, संयत, मुग्धपणे व्यक्त होते. एखादे भक्ष्य ध्यानात ठेऊन, ओरबाडण्याला इथे कधीही स्थान मिळत नाही.
या दृष्टीने पुढे विचार करता, कलाकार आणि रसिक यांच्यामधील संवाद देखील असाच मूकपणे साधला जातो. खरेतर, “एकांताने, एकांताशी एकांतवासात साधलेला अमूर्त संवाद” असे थोडे सूत्रबद्ध वाक्य इथे लिहिता यॆइल. त्यामुळे कलेशी एकरूप होणे, एकात्मता साधणे, अशा वृत्तींना इथे साहजिक अधिक महत्व प्राप्त होणे, क्रमप्राप्त ठरते.
खरतर राग “चारुकेशी” आणि पूर्वीच्या संस्कृत ग्रंथात दिलेला समय आणि रागाची प्रकृती बघत, थोडा विस्मय वाटतो. सकाळचा दुसरा प्रहर, या रागासाठी उत्तम असे म्हटले आहे आणि या रागाचे “वळण” बघता, या काळात, प्रणयी भावना बाळगणे कितपत संय्युक्तिक ठरते, हा प्रश्नच आहे!! अर्थात, आधुनिक काळात, जिथे रागांच्या समयाबाबतचे संकेत आणि नियम, फारसे पाळले जात नाहीत तेंव्हा या मतांना किती महत्व द्यायचे, हे वैय्यक्तिक स्तरावर योग्य ठरते. आधुनिक जीवनशैली अशा संकेतांना साजेशी नाही, हेच खरे.
आता रागाच्या तांत्रिक भागाकडे वळल्यास, या रागात सगळे स्वर लागतात परंतु, “धैवत” आणि “निषाद” हे स्वर कोमल घेतले जातात तर बाकीचे सगळे स्वर शुद्ध स्वरूपात, लावले जातात. याचाच अर्थ, रागाची जाती ही,”संपूर्ण-संपूर्ण” या प्रकारात जमा होते. या अनुरोधाने पुढे लिहायचे झाल्यास, “ध,नि,सा,रे,ग,म,ग,रे” किंवा “रे, ग,म,ध,प”, तसेच “रे,ग,म,रे,सा” अशा स्वरांच्या संगती, या रागाची बढत करताना, वापरल्या जातात.
मुळात, हा राग कर्नाटकी संगीतातील परंतु रागांच्या चलनवलनामधून हा राग उत्तर भारतीय संगीतात आला आणि चांगल्यापैकी स्थिरावला. या रागाचा “तोंडवळा” बघता, कधी कधी या रागाचे, “भैरव” किंवा “दरबारी” रागाशी साहचर्य जाणवते. अर्थात, याला तसा अर्थ नाही कारण, असे साम्य, इतर अनेक रागांच्या बाबतीत देखील दर्शविता येईल.
कवियत्री इंदिरा संत यांचे एक कविता आठवली.
“वाऱ्यावरून की यावी
     आर्त चांदण्याची शीळ
भारणाऱ्या गाण्यांतील
     यावी काळजाची ओळ
संपलेल्या आयुष्याची
     अशी एक सय व्हावी
तापलेल्या जीवभावां
     धून नादावून जावी.”
संगीताच्या क्षेत्रात खरेतर शब्द माध्यम हे नेहमीच परके राहिलेले आहे पण तरीही काहीवेळा शब्दांची जोड, आपल्याला जाणवणाऱ्या नेमक्या भावनांना मोकळी वाट करून देते, हे देखील तितकेच खरे.
आता आपण, या रागावर आधारित, उस्ताद शुजात खान यांनी सादर केलेली एक रचना आहे. उस्ताद विलायत खानसाहेबांचा पुत्र, त्यामुळे अत्यंत व्यापक संगीताचा पट, लहानपणापासून उपलब्ध. अर्थात, संगीत शिक्षणाचा स्त्रोत हा इमादखानी घराण्याशी संलग्न. त्यामुळे वादनात, “गायकी” अंगाचा असर सहज समजून घेता येतो. काहीवेळा मात्र, गुरुभक्तीचा आंधळा स्वीकार केल्याचे जाणवते. वेगळ्या शब्दात, उस्ताद विलायत खानसाहेब, सतार वादन करताना, अधून मधून, “गायकी” दाखवत आणि त्या गायकीचे तंतोतंत प्रत्यंतर आपल्या वादनातून देत असत. हे सगळे, आपले वाद्यावर किती प्रभुत्व आहे, हे दाखवून देण्याचा प्रकार होता, याच सवयीची री ओढलेली, उस्ताद शुजात खान, यांच्या वादनात दिसून येते.
या सादरीकरणात, आलापी खास ऐकण्यासारखी आहे. त्यात “गायकी” अंग स्पष्टपणे दिसते.  वादनावर बरेचवेळा उस्ताद विलायत खान साहेबांची किंचित छाप जाणवते तरी देखील स्वत:ची ओळख ठेवण्यात, हे वादन यशस्वी होते. वरती जी स्वरसंहती दिली आहे, त्याचे प्रत्यंतर या वादनात आढळते. तसेच आलापीनंतर जोडून घेतलेला “झाला” फारच बहारीचा आहे. यात एक गंमत आहे, सुंदर गत चाललेली आहे, मध्येच सुंदर हरकत घेतली जाते आणि त्या हरकतीच्या विस्तारात तान अस्तित्वात येते आणि असा सगळा लयीचा आविष्कार चालू  असताना,ज्याप्रकारे, हा वादक “समे”वर येतो आणि ठेहराव घेतो, त्यावरून, वादकाचे, वाद्यावर किती प्रभुत्व आहे, हे समजून घेता येते. आणखी खास ” बात”म्हणजे, द्रुत लयीत वादन चालत असताना, मध्येच एखादी “खंडित” तान घ्यायची आणि ती घेत आसनात, “मींड” काढायची!! वादनातील अतिशय अवघड भाग, इथे ऐकायला मिळतो.
हिंदी चित्रपट जेंव्हा सत्तरीच्या दशकात शिरत होता,  त्यावेळेस,चित्रपट संगीतावरील पाश्चात्य संगीताचा प्रभाव बराच गडद झाला होता. किंबहुना, आधुनिक वाद्यमेळाची रचना, ही पाश्चात्य वाद्यमेळावर बरीचशी आधारित असायची. तसे अधून मधून, भारतीय संगीतावर आधारित चित्रपट आणि संगीत रचना ऐकायला मिळायच्या पण त्याचे प्रमाण, साठीच्या दशकाच्या मानाने बरेच कमी झाले होते आणि अशा वेळेस, “दस्तक” चित्रपट आला. या चित्रपटातील संगीताने, संगीतकार मदन मोहनला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता (उल्लेखनीय बाब म्हणजे मदन मोहनला “फिल्मफेयर” पुरस्कार कधीच मिळाला नाही!!) याच चित्रपटातील, एक गाणे आपल्याला चारुकेशी रागावर आधारित, असे ऐकायला मिळते. “बैय्या ना धरो, ओ बलमा” हेच ते लताबाईंच्या आवाजातील एक अजरामर गीत. केरवा तालात बांधलेली रचना आहे.
“बैय्या ना धरो ओ बलमा
ना करो मोसे रार
बैय्या ना धरो ओ बलमा “
या गाण्याची गंमत म्हणजे, या गाण्यात, सुरवातीच्या ओळीत “चारुकेशी” राग दिसतो पण पुढे रचना वेगवेगळ्या लयीची बंधने स्वीकारते आणि रागापासून दूर जाते.तसे बघितले तर, “बैय्या ना धरो” अशी लखनवी बाजाची ठुमरी प्रसिद्ध आहे आणि या गाण्याचा मुखडा, त्या ठुमरीच्या रचनेवर आधारलेला आहे. मजेचा भाग असा आहे, पहिल्या अंतरा जिथे संपतो, तिथून रागाला बाजूला ठेवले जाते आणि चाल स्वतंत्र होते. मदन मोहन, यांच्या रचनांचे हेच एक व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. त्यांच्या चाली, लयीला अवघड होतात, त्या याच प्रकारे “स्वतंत्र” होतात म्हणून!! हे असे विस्तारीकरण करणे, अतिशय कठीण असते. लताबाईंची गायकी, अशा रचनेत खास खुलून येते. शब्दागणिक निश्चित हरकत, दाणेदार तान आणि गायनातून, कवितेच्या आशयवृद्धीचा प्रत्यय!!  चालीचे “मूळ” ठुमरीमध्ये दडले असेल म्हणून कदाचित, पण चाल फार अवघड झाली आहे. गाण्यात फार, बारीक हरकती आहेत, ज्याने गाण्याचे सौंदर्य वाढते पण, इतरांना गायचे म्हणजे एक परीक्षा असते!!
प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या अप्रतिम मराठी भावगीतांपैकी एक गाणे – “रिमझिम झरती श्रावण धारा” हे गाणे रसिकांच्या चांगल्याच परिचयाचे आहे. हे गाणे देखील चारुकेशी रागावर आधारित आहे. वास्तविक गाण्याचे शब्द मल्हार रागाचे भाव व्यक्त करतात,असे सत्कृतदर्शनी जरी भासले तरी एकूणच ही कविता, ही विरही भावनेकडे झुकलेली आहे. ज्याला “शब्दप्रधान गायकी” म्हणून गौरवावे लागेल, अशा ताकदीचे असामान्य गाणे म्हणता येईल. शक्यतो कुठेही “यतिभंग” झालेला आढळणार नाही. चाल तशी साधी आहे पण अवीट गोड आहे. बहुदा त्यामुळेच हे गाणे आपल्या भावभावनेशी निगडीत आहे.
” रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात,
प्रियावीण उदास वाटे रात”.
संगीतकार दशरथ पुजारी यांची चाल आहे. हा देखील असाच, थोडा दुर्दैवी संगीतकार म्हणता येइल. आयुष्यभर कितीतरी अप्रतिम रचना सादर केल्या परंतु संगीतकार म्हणून फारशी मान्यता पदरी पडली नाही आणि हळूहळू विस्मरणाच्या फेऱ्यात हरवून गेला!!
हृदयनाथ मंगेशकर हे प्रामुख्याने संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत परंतु त्यांनी देखील काही अतिशय अनुपम अशी गाणी गायली आहेत. संगीतकार श्रीनिवास खळे निर्मित असेच एक सुंदर भावगीत मराठी रसिक मनांत ठाण मांडून बसले आहे.
 “वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले;
एकमेकांवरी उधळले, गेले ते दिन गेले”.
कवी भवानीशंकर पंडित यांची कविता आहे. खळे साहेबांची चाल म्हणजे त्यात गायकी अंग असणे जणू ठरलेलेच असते. गाणे एका लयीत चालत असताना, त्या लयीतून वेगळी हरकत काढणे आणि गाण्याला अवघड जागी पोहोचवणे, हे खळे साहेबांच्या रचनांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य. या गाण्यात, चारुकेशी राग तसा सरळसोट दिसत नाही पण, काही हरकती या रागाशी जवळीक दाखवतात.
उस्ताद गुलाम अली यांनी या रागाशी नाते सांगत अशीच एक अप्रतिम गझल पेश केली आहे.
“दुख की लहेर ने छेडा होगा,
याद मे कंकर फेका होगा;
आज तो मेरा दिल कहेता है,
वोह इस वक्त, अकेला होगा”.
गझलची सुरवात अगदी चारुकेशी राग डोळ्यासमोर ठेऊन केली आहे परंतु गुलाम अलींची कुठलीच रचना कधीही एकाच रागाला बांधून घेत नाही आणि तसेच इथे झाले आहे. केरवा तालात ही रचना बांधलेली आहे. अर्थात नेहमीप्रमाणे, या गायनात देखील, त्यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे पहिल्यापासून अवघड हरकती घेणे, किंवा अचानक एखादी अचंबित करणारी तान घ्यायची आणि ऐकणाऱ्याला अवाक करायची सवय आढळते.
– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..