मुखपुस्तिका उर्फ फेसबुक एक्सप्रेस ही जागतिक प्रवासाला निघालेली कुठूनही सुटून कुठेही जाणारी रेल्वेगाडी असून यातील सर्व बोगी आपल्याला झेपेल त्या प्रवाश्यांना घेऊन जलद, मध्यम वा संथ गतीने धावत एक्सप्रेसला बिलगलेल्या असतात. तिकीटच नसल्यामुळे कोणीही कुठेही चढा, कुठेही उतरा.
इंजिनपासून जवळच्या जनता बोगीमधे खचाखच गर्दी असते. या बोगीतील प्रवासी त्यांच्या दृष्टीनी पोस्टची ‘लायकी’ ठरवत लाईक करतात. त्यातल्या काही लाईकस् बरोबर कॉमेंट्सही पोस्ट केलेल्या असतात तर काही लाईकस् नातेसंबंध टिकवण्यासाठी निव्वळ देण्याघेण्यातल्या असतात. शिवाय काही आपले अस्तित्व दाखवण्यासाठी असतात; म्हणजे “मी आहे” एवढंच.
त्यानंतर पुढच्या काही बोगीत विषयवार समविचारी लोकांचे कंपू आपापले कुपे अडवून बसलेले आढळतात. पोषक पण कधीकधी भरपूर चढाओढीचं वातावरण असतं कुपेमधलं. नवीन प्रवाशाला स्थैर्य मिळवून सीट नावावर करायला वेळ लागू शकतो. या प्रत्येक कुपेला एक स्वतंत्र टीसीही असतो जो कंपूची शिस्त संभाळायची शिकस्त करत रहातो.
काही प्रवासी आपली सीट थोड्या वेळासाठी आजूबाजूच्या सहप्रवाशांबरोबर शेअरही करतात तर काही जण जनता बोगी आणि कुपे असाही प्रवास करतात.
पंँट्रीच्या स्वतंत्र बोगीमधे संपूर्ण गाडीचे दोन चार टीसी परीक्षकाच्या भूमिकेत संधीची वाट बघत असतात. स्वतःची पोस्ट क्वचितच असते पण संधी मिळताच इतरांची पोस्ट कुरतडतात किंवा ज्ञानवाटप करतात आणि भडका उडताच चेन ओढून स्पीड कमी होताच गाडीतून कल्टी मारतात.
काही प्रवासी रोजच अपडाऊन टाळून ” मी नाही त्यातला, माझा क्लासच वेगळा ” असं भासवून मधेच कधीतरी गाडी पकडतात आणि जमेल तेंव्हा उतरुनही जातात. कायम असंच चालू असतं त्यांचं.
या मुखपुस्तिका उर्फ फेसबुक एक्सप्रेसमुळेच कित्येक नवीन लेखक, कवी जन्माला आले, माहितीचा प्रसार त्वरित होऊ लागला, निवृत्त आणि एकाकी जेष्ठ नागरिक आणि गृहिणींना हक्काचा विरंगुळा मिळाला, नवनवीन तंत्रज्ञानाशी तोंडओळख होते, वगैरे वगैरे..
— प्रकाश तांबे
8600478883
Leave a Reply