नवीन लेखन...

मुक्ताचे क्षितीज

‘ वाचू आनंदे ‘चा आगळा वेगळा कार्यक्रम. संपूर्ण सभागृह भरलेले. व्यासपीठावर माईक समोर ती उभी . नाव मुक्ता . इयत्ता चौथी. आवाज खणखणीत . उभं राहण्याची , प्रेक्षकांकडे पाहण्याची आणि त्यांची दाद मिळताच किंचित स्वाभाविक झुकून नम्रपणे दाद स्वीकारण्याची एक विलक्षण शैली. देहबोली आत्मविश्वासाने भरलेली.

ती उभी राहिली तेव्हाच जाणवत होतं , हे पाणी काही वेगळंच आहे. उजवा हात छातीवर ठेवून डाव्या हाताने माईकचा स्टॅन्ड पकडत तिनं माझ्याकडे पाहत विचारलं,
‘ सर , प्रारंभ करायचा का ?’
तिच्या त्या स्वरातलं मार्दव विलक्षण होतं. मी प्रमुख अतिथी होतो , त्यामुळं तिनं मला विचारलं होतं. मी होकार दिला आणि नंतर पुढची वीस मिनिटं आम्ही सगळे तिच्या वक्तृत्वात आकंठ बुडून गेलो. तिला आवडलेल्या पुस्तकावर ती ओघवत्या शैलीत बोलत होती. संपूर्ण पुस्तक तिनं शब्दांच्या माध्यमातून श्रोत्यांच्या समोर उभं केलं आणि तिनं बोलणं संपवलं . टाळ्यांचा कडकडाट, तिनं पुन्हा त्याच नम्रपणानं स्वीकारला आणि ती खाली उतरून सभागृहात आली.
माझ्यासह सर्वचजण भारावले होते. एवढ्या लहान वयात आलेली समज , धारिष्ट्य , भाषेवरचं प्रभुत्व आणि पुस्तक परीक्षणासारखा अवघड विषय तिनं ज्या पद्धतीने पेलला होता, मांडला होता ,ते सारंच विलक्षण होतं.
…कार्यक्रम संपला . मुख्याध्यापिका , सर्व शिक्षकवृंद, इतर पाहुणे यांच्याबरोबर मी त्यांच्या स्टाफरूम मध्ये आलो. मी त्यांच्याशी उपक्रमाबाबत बोलत होतो, काही काही मुद्दे सांगत होतो, पण मनातून ती मुक्ता जात नव्हती . अखेर मी त्यांना विचारले, ‘इतकी चांगली तयारी कुणी करून घेतली, त्यांचंही अभिनंदन करायला हवं ‘
‘आम्ही कुणीच मदत केली नाही, मुक्ता स्वतःच सगळी तयारी करते, स्वयंभूच आहे म्हणा ना . ‘
त्या आणखी काही सांगत होत्या, तिची हुशारी, सगळ्याच स्पर्धात तिनं मिळवलेलं यश , शाळेला तिनं मिळवून दिलेलं मानाचं स्थान…एक ना दोन, किती सांगू आणि किती नको असं सगळ्यांना होऊन गेलं होतं. मी कौतुक करून निघालो. बाहेर आलो तर समोरच मुक्ता . हसली . पण दुसऱ्याच क्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला चमत्कारिक वाटलं. ही मघाशी बोलणारी मुक्ता नव्हती. मी तिला जवळ बोलावलं,
‘ काय झालं मुक्ता ?’
ती काहीच बोलली नाही , आता तिचं रडणं हुंदक्यात रूपांतरित झालं होतं, मी परत स्टाफरूम मध्ये आलो,
‘काय झालं तिला ?’
माझ्या या प्रश्नाला जे उत्तर मिळालं ते ऐकून मी हादरून गेलो…

मुक्ता गरीब घराण्यातली होती, पण शिक्षणाची , वाचनाची खूप आवड . स्पर्धेत उतरण्याची आणि ती स्पर्धा गाजवण्याची जन्मजात हातोटी तिला लाभली होती . यामुळं ती सगळ्यांची लाडकी झाली होती . आई अशिक्षित होती पण मुलीला शिकवत होती .तिचं कौतुक सगळीकडे होत होतं. वृत्तपत्रात येत होतं आणि तेच तिला घातक ठरलं होतं. तिचा बाप भयंकर पियक्कड , दारुड्या आणि क्रूर होता. दारूसाठी तिच्या आईला मारझोड नित्याचीच होती, आई विरोध करायची, मार खायची पण दारूला पैसे देत नसायची . हे अनेक दिवस चाललं होतं.पण एके दिवशी त्यानं मुक्ताची सगळी बक्षिसं , सर्टिफिकेट्स, आणि स्मृतिचिन्ह पाहिली आणि त्याच्या हाती नवं शस्त्र आलं. तिची आई पैसे देत नसली की तो मुक्ताची बक्षिसं फाडायला , जाळायला निघायचा आणि त्या ब्लॅकमेलिंगपायी पैसे देणं अपरिहार्य व्हायचं. आईची मारझोड थांबली होती पण मुक्ताच्या मनाची कुतरओढ सुरू झाली होती . तिची मुस्कटदाबी सुरु झाली होती.

सगळं ऐकून मी हादरून गेलो होतो . मी बाहेर आलो. मुक्ता अजून तिथेच होती.
‘ सर, माझी बक्षिसं परत मिळवून द्याल? ‘
तिनं काकुळतीला येऊन विचारलं .
मी होकार भरला आणि तिचा पत्ता विचारून घेतला , वेळ काढून हे काम करायचं असं ठरवून परत कॉलेजला आलो.
आणि दुसऱ्याच दिवशी बातमी कळली…
मुक्तानं शाळा सोडली . कारण तिची बक्षिसं, तिची सर्टिफिकेट्स , सगळं सगळं त्या क्रूर बापानं जाळून टाकलं होतं…
तिचं क्षितीज पूर्णतया उद्ध्वस्त झालं होतं …
——-
कथा इथे संपली, पण अनेक नव्या प्रश्नांना जन्म देऊन…

ते प्रश्न तुमच्याही मनात असतील …

अशा मुक्ता आपल्याही आजूबाजूला असतील . नाही का ?
त्यांच्यासाठी आपण शब्दांतून व्यक्त व्हायला हवं …
तरच विधायक काही घडू शकेल !

— डॉ. श्रीकृष्ण जोशी,
रत्नागिरी 
९४२३८७५८०६

(कथा काल्पनिक नाही, वाचन संस्कृती जतन करण्यासाठी सर्वत्र पाठवायला हरकत नाही, अर्थात नावासह.)

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 118 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..