नवीन लेखन...

मुक्तांगण, अलिबाग

मुलांचं मन फुलपाखरांसारखं चंचल आणि रंगीबेरंगी असतं. आपण फुलपाखराला पकडायचा प्रयत्न केला तर सहजासहजी ते आपल्या हातात येत नाही, तसंच मुलांना जर अतिशय कडक पध्दतीने शिस्त लावायचा प्रयत्न केला तर ती मनाने पालकांपासून दूर होत जातात. परंतु जर त्यांना खेळीमेळीने आणि त्यांना रुचेल अशा पध्दतीने म्हणजेच गोष्टींच्या आणि खेळांच्या माध्यमातून शिकवले, तर हे संस्कार मुलांकडून लवकर आत्मसात केले जातात, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारं हे सुत्र सौ. स्वाती लेले यांच्या मुक्तांगण या उपक्रमाने नेहमीच जपलंय.

दररोज (शनिवार व रविवार सोडून) संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत सौण् .स्वाती लेले यांच्या घराच्या एैसपैस अंगणात ४० ते ५० मुलं जमतात आणि या एक तासात मुक्त अशा निरागस स्वातंत्र्याचा पुरेपुर अनुभव घेतात, स्वतःच्या कला जोपासतात, सामुहिक खेळांद्वारे इतर मुलांशी मैत्रीचं निखळ नातं निर्माण करतात, मस्ती करतात, त्यांच्यात उपजत असलेल्या खेळकरपणाला आणि खोडकरपणाला अशा वेळी उधाणाच येतं, सुरवातीला अतिशय खोडकर असणारा मुलगा नंतर शांततेची गोडी चाखायला शिकतो, तर कधी अतिशय अंतर्मग्न राहणारा मुलगा शेवटी इतरांसारखाच दंगेखोर बनतो. मजा आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी मुक्तांगणाच्या खेळांशी, कार्यक्रमांशी आणि स्पर्धांशी निगडीत असल्या तरी केवळ मजा आणि मनोरंजन हा मुक्तांगणाचा हेतू कधीच नव्हता. मुक्तांगणाने मुलांमधील ’मूलपण‘ जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला असला तरीही या मुलांमधील वेगवेगळया प्रगल्भ विचारांची दालन उघडण्याचा सुध्दा एक वेगळा प्रयत्न करतं. मुलांसाठी विटीदांडू, लगोरी, डबा एैसपैस, लपंडाव, कबडडी, खो-खो असे मैदानी खेळ घेवून एकीकडे मुलांच्या अंगाला आणि स्नायूंना लवचिकता तर आणतंच, शिवाय अनेक स्मरणशक्तीचा कस लावणारे खेळ घेवून त्यांच्या बौध्दिक क्षमतेला धारसुध्दा आणतं. प्रत्येक दिवशीचं सत्र सुरू करण्यापुर्वी घेतल्या जाणार्‍या शुभंकरोती, ओंकार साधना आणि प्रार्थनेमुळे मुलांच्या मनाला उभारी तर येतेच शिवाय धार्मिक गोष्टींशी या मुलांचा एक भावनिक बंध निर्माण होतो. मुलांवर वेगवेगळे संस्कार करणार्‍या आणि त्यांना विविध प्रकारच्या माणसांची पारख करण्यास शिकवणार्‍या गोष्टी, अनुभवकथन यांद्वारे मुक्तांगणने नेहमीच एक संस्कारक्षम असा साचा मुलांना अगदी खेळकरपणे आणि त्यांना आवडेल अशा शैलीने उपलब्ध करुन दिला आहे. मे महिन्यात मुक्तांगणचं पूर्ण वेळ शिबीर याच आंगणामध्ये आयोजित केलं जातं. हे अंगण आता केवळ लेले कुटुंबाचं राहिलं नसून ते अलिबागच्या विविध वयोगटांतील मुलांचं आपलं असं झालं आहे. या शिबीरात मुलांना खेळांबरोबरच पेंटिंग, हस्तकला, ओरिगामी, हस्तकला, चिकणमातीपासून विविध प्रकारच्या वस्तू बनवणे इ.कलांमध्ये पारंगत करण्याचा प्रयत्न केला जातो. संक्रांतीच्या वेळी या मुलांना पतंग बनवायला शिकवलं जातं. मुक्तांगणने काही काळापूर्वीच आकाशदर्शनाचा अनोखा कार्यक्रम अलोट प्रतिसादात आयोजित केला होता. याशिवाय मुक्तांगणने आयोजित केलेल्या अॅटिटयूड टेस्टस्नासुध्दा मुलांचा आणि पालकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या चाचण्यांनंतर मुलांना त्यांच्यासाठी योग्य असलेल्या शैक्षणिक दिशांची माहिती देण्यासाठी तसेच त्यांच्यावरील मानसिक ताण दूर करण्यासाठी, अनेक तज्ञ लोकांची मार्गदर्शक सत्रे आयोजित केली.

आज पालक आपल्या मुलांना पहिलीपासूनच क्लासला घालत असल्याने, ती अगदी लहानपणापासूनच प्रौढांसारखा विचार करायला लागतात, या परिथितीत मुक्तांगणने त्यांच्यातील विसरत चाललेलं बालपण अगदी घट्ट धरून ठेवलेलं आहे. मुलांना आपल भावविश्व उलगडता यावं यासाठी त्यांचे विविध छंद जोपासण्यासाठी आणि त्यांना प्राथमिक शिस्तीचे आणि संस्कारांचे धडे देण्यासाठी मुक्तांगण प्रयत्नशील आहे. मुक्तांगणने सर्व मुलांना एक हवंहवंसं वाटणारं आभाळच निर्माण करून दिलंय, जिथे मुलं स्वतःच्या कल्पनाशक्तीची आणि प्रतिमेची नक्षी चिमुकल्या हातांनी काढतात आणि त्या नक्षीत स्वतःच्या अंतरंगामधले अनेक रंग भरतात. प्रत्येक आठवडयात एक दिवस चित्रकलेचा वार असतो जेव्हा एक बाई मुक्तांगणात येऊन मुलांना चित्रकलेचे प्राथमिक धडे देतात. कित्येकदा गोष्टी सांगण्यासाठी आणि खुलवण्यासाठी अनेक तज्ज्ञ लोकांना पाचारण केलं जातं. इथे मुलांना वेगवेगळया विषयांवरच्या आणि आशयांवरच्या कवितांना चाल कशी द्यायची आणि त्या सुरात कशा म्हणायच्या हे शिकवले जाते. देशभक्तीपर कवितवर विशेष भर देवून अनेकदा हसतं खेळत त्यांच्या हृदयात देशप्रेमाचे बीज रोवले जाते. कधी कधी तर किलोभर रांगोळी आणून मुलांना वाटेल तिथे आणि वाटेल तसे आकार काढण्याची व रंगवण्याची मुभा दिली जाते. कधी मुलांना सुगड रंगवायलासुध्दा सांगितलं जात. थोडक्यात काय तर ज्या पारपरिक कलांपासून मुल लांब चालली आहेत त्या कलांना आपलसं करण्यास या मुलांना प्रवृत्त केलं जातं.

— अनिकेत जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..