मुकुंद संगोराम यांचा जन्म १८ एप्रिलला झाला.
मुकुंद संगोराम हे गेली चार दशके पत्रकारितेत सक्रीय आहेत. सध्या मुकुंद संगोराम हे लोकसत्ता दैनिकाचे सहाय्यक संपादक आहेत. ते आधी तरुण भारत आणि पुणे वर्तमान या दैनिकांचे सहसंपादक होते. मुकुंद संगोराम हे समाजकारण, नागरी प्रश्न, संगीत, कला, संस्कृती या विषयावर सातत्याने लेखन करत असतात.त्यांची ‘आजकाल’, ‘समेपासून समेपर्यंत‘, ‘ख्यालिया’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली असून सध्या ते‘स्वरावकाश’ या सदराचे लेखन ते करत आहेत.
मुकुंद संगोराम हे संगीताचे उत्तम जाणकार आहेत. लोकसत्ता मध्ये त्यांनी संगीत विषयक सदरलेखन केले आहे. त्यांना हा वारसा त्यांचे वडील प्रा.डॉ.श्रीरंग संगोराम यांच्याकडून मिळाला. मुकुंद संगोराम यांना दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा मानाचा संगीत समीक्षणासाठीचा पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ललित लेखनाबद्दल देण्यात येणारा विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार विविध प्रकारच्या मराठी साहित्याच्या निर्मितीतून मराठी साहित्य सेवा करणाऱ्या लेखक/पत्रकारांना मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘मराठी रत्न’ पुरस्कार, महाराष्ट्र संपादक परिषद, पुणे ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मुकुंद संगोराम हे आर्य संगीत प्रसारक मंडळ, पुणेचे विश्वस्त म्हणून काम बघत आहेत.
मुकुंद यांचे वडील प्रा.डॉ.श्रीरंग संगोराम हे महाराष्ट्रातील उत्तम संगीत समीक्षक, जाणकार होते. ते पुणे विद्यापीठात हिंदीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. पुण्यातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट दिवंगत आणि अर्थशास्त्र व अकाउंटन्सी विषयक लेखन करणारे सदरलेखक मिलिंद संगोराम हे मुकुंद संगोराम यांचे धाकटे बंधू होत. मुकुंद संगोराम यांचा मुलगा गंधार संगोराम हाही संगीतकार असून त्यास एकूण एकोणीस वाद्ये वाजविता येतात. गंधारने प्रायोगिक नाटके, एकांकिका, चित्रपट, लघुचित्रपट आणि जिंगल्स इत्यादीसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यात चारु आरो ई, परका, शरम गयी तो, Logging Out आणि T for temptation ह्या मराठी नाटकांचा प्रामुख्याने समावेश आहे. ह्या व्यतिरिक्त द. मिरासदारांच्या “दळण” ह्या एकांकीकेलाही त्यांने संगीत दिले आहे. गंधार संगोराम यांच्या पुण्यातील ‘बी बिरबल’ या संस्थेने ‘पुलं’च्या हस्ताक्षराचा फाँट विकसित केला आहे. यासाठी फाँटतज्ज्ञ किमया गांधी यांचं विशेष साह्य लाभलं आहे. या फाँटला ‘पु. ल. १००’ असं नाव देण्यात आलं आहे. हा फाँट कोणीही डाउनलोड करून वैयक्तिक लेखनासाठी त्याचा वापर करू शकतं.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply