स्वयंपाकघरापासून शेजघरापर्यंत,
तिचं आयुष्य जडलं होतं.
जन्म देणं अन् रांधून वाढणं,
इतकंच तिचं कर्म होतं.
किंमत तिच्या शब्दाला नव्हती,
शिकण्याची गरज वाटत नव्हती.
अबला अबला म्हणून आधाराने,
जगत ती रहात होती.
तिला शिकून करायचंय काय?,
घरातच राहणार तिचा पाय.
तोंड तिने उघडायचं नाय,
दोन वेळचं जेवण,वर्षाकाठी लुगडं –
जगायला आणखी लागतंय काय?
गृहलक्ष्मीच्या हातातच लक्ष्मी नव्हती,
कदर अन्नपूर्णेची कुणालाच नव्हती.
सुखावर अधिकार फक्त त्याचा,
शेअर तिने त्यात, नाही मागायचा.
हे सगळं चालायचं कुठवर?,
किती हा अन्याय जन्मदात्रीवर.
तिलाही हे जाणवायला लागलं,
सज्ञान होण्याचं तिने ठरवून टाकलं.
अडथळे खूप उभारले त्यांनी,
साथही दिली त्यातल्याच काहींनी.
पेरल्या होत्या चिक्कार, ‘काचा वाटेवर’,
चुरडत निघाली ती यशाच्या शिखरावर.
बांध आता कसलाच नव्हता, अडवणार तिला,
स्वयंसिद्ध होण्याचा होता, मार्ग तिला गवसला.
यशाने तिच्या घरावर श्री शारदा प्रसन्न झाली,
पाऊले लक्ष्मीची घराच्या उंबऱ्यावरी उमटली.
प्रासादिक म्हणे
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply