नवीन लेखन...

मूल्ये- जीवनाला अर्थ देणारे इंधन!

खालील यादीतील स्वतःचे वर्णन करणारी कोणतीही दहा मूल्ये निवडावी-

समतोल, सक्षम, अनिश्चिततेवर मात, धैर्य, संवादी, निर्मितीक्षमता, सकारात्मकता, नैतिकता, नेतृत्वगुण, संयम, चिकाटी, विकास-व्यक्तिगत आणि व्यावसायिक, लवचिकता, विश्वास, बुद्धिमत्ता, स्वयंशिस्त, स्थितिस्थापकत्व, शिकण्यातील सातत्य, सहृदयता, स्वागतशीलता, सचोटी, समग्रता, पर्यावरण जागरूकता, निरामय प्रकृती, स्व-नियमन, वेळेबाबत शिस्त, प्रामाणिक स्वभाव, तळमळ, देशभक्ती, वैचारिक सुस्पष्टता इत्यादी!

ही यादी केवळ प्रतीकात्मक आहे आणि ती कितीही वाढविता येऊ शकते. मूल्यांचे शोध न संपणारे असतात. मूलभूत आस्था आणि श्रद्धा यांच्याबाबत मनात गोंधळ असेल तर मूल्ये सहजी सापडत नाहीत. मग वर्तन समस्या उदभवतात, आणि अंततः त्याचा परिणाम निवडी आणि निर्णयांवर होतो.

मूल्ये नजरेला स्वच्छ करतात आणि एकाग्रता बहाल करतात. त्यामुळे पुढची वाट सुस्पष्ट दिसू लागते. स्व-जाणिवा जागृत झाल्या की आयुष्य अधिक खरं आणि कृतार्थ वाटायला लागतं.

विकसित केलेली मूल्यव्यवस्था म्हणजे होकायंत्र! रस्ता हरपल्यावर आपल्याला दिशादर्शन करण्याचे आणि त्याद्वारे योग्य मार्गावर आणण्याचे कार्य आपली जीवनमूल्ये करीत असतात.

आपल्या भावनांना, कृतींना आणि वर्तनाला इंधन पुरविण्याचे कार्य आपली जीवनमूल्ये करीत असतात. मानसशास्त्र, अध्ययन, तत्वज्ञान आणि समाजशास्त्र अशा अनेक शाखांचे कार्य समजण्यासाठी जीवनमूल्यांचा सखोल आणि समूळ अभ्यास आवश्यक असतो. “माणसे जशी वागतात, ती तशी कां वागतात” या अनादी प्रश्नाचे उत्तर सापडण्यासाठी अलिबाबाच्या गुहेत शिरताना ” तिळा तिळा दार उघड ” नामक ती चावी असते. मानवाची मूल्यसंस्था नैतिकतेशी बद्ध असते. स्वतःचा शोध (मी कोण?), स्व-संवर्धन आणि स्व-स्वीकार या प्रवासाच्या पायाशी नीतीमूल्ये असतात.

“मुक्तपणे निवडलेली, कृतींच्या उत्क्रांत होत जाणाऱ्या गतीमान प्रवाहाचे प्रतिबिंब ठरणारी आणि वर्तनाचे आंतरिक पैलू जगासमोर आणणारी व्यवस्था म्हणजे जीवनमूल्ये ” अशी मूल्यांची व्याख्या विल्सन आणि डूफ्रेन या जोडगोळीने २००९ साली केली.

मनोविकास तज्ज्ञांचा असा ठाम विश्वास आहे की मूल्ये आपले जीवन आमूलाग्र बदलू शकतात. अभ्यासांती असे सिद्ध झाले आहे की आपलं आंतरिक भावविश्व सकारात्मक करण्याचे, नीतीशास्त्रानुसार संपन्न करण्याचे सामर्थ्य मूल्यव्यवस्थेत असते. जगण्याच्या वैश्विक प्रेरणांना चालना देण्याची ताकत मूल्यांमध्ये असते. आपले प्रतिसाद मूल्यांवर आधारित असतात कारण जीवनाचे आकलन, जीवनाचा अर्थ, जीवनाचे प्रयोजन त्यामधून स्थापित होत असतो.

उदा. प्रामाणिकपणावर भरवसा असलेली व्यक्ती तिच्या साऱ्या कृतींमधून प्रामाणिक वर्तनाचे दाखले देईल. खोटारडेपणा, फसवाफसवी किंवा जीवनहेतू साध्य होण्यासाठी गैरमार्गाचा वापर तिच्याकडून होणार नाही.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..