इतिहासावर महानगरपालिकेचं अतिक्रमण..!
काल बऱ्याच दिवसांनी फोर्ट विभागातील ‘काळा घोडा’ इथं जाणं झालं. तिथं गेलो आणि चमकलोच. जहांगीर आर्ट गॅलरीच्या दारातल्या पार्कींग लांटमधे उंची गाड्याच्या पार्कींगच्या गर्दीत एका उंचं चबुतऱ्यावर चक्क एक काळ्या रंगाचा घोडा ‘पार्क’ केलेला दिसला. मला आश्चर्यच वाटलं. इथे घोडा पार्क कधी आणि कोणी केला हे कळेना म्हणून चबुतऱ्यावरची पाटी वाचण्यासाठी आणखी जवळ गेलो आणि मग मात्र मला हसावं की रडावं की असंच वेड्यासारखं ओरडत सुटावं हेच कळेना..
घोडा ज्या चबुतऱ्यावर पार्क केला आहे त्या चबुतऱ्यावर ‘काळा घोडा मुंबईच्या सर्वोत्तम कला, संस्कृती व मुक्त कल्पनांचे प्रतिक आहे’ अशी अक्षरे कोरलेला एक पितळी बोर्ड वाचण्यात आला. हेच त्यांनी इंग्लिश मधेही दुसऱ्या बाजूस लिहिलंय. घोड्याचं हे शिल्प ‘काळा घोडा रेसिडेंट असोसिएशन’ यांनी प्रोयोजित केल्याचंही तिथे उल्लेख आहे.चबुताऱ्याच्या पश्चिम बाजूला ‘The Spirit of Kala Ghoda’ व मराठीत ‘काळा घोडा अंतरंग’ असं लिहिलंय. म्हणजे काय ते मला आता २४ तासानंतरही कळलेल नाही.
आता मला एक प्रश्न पडला की, हा काळा घोडा नेमकं कशाच प्रतिक आहे. मुंबईच्या (देशाच्याही) इतिहासचं की तिथे लिहिल्याप्रमाणे मुंबईच्या सर्वोत्तम कला, संस्कृतीचं? मुंबईत नवीनच येणाऱ्या पाहुण्यांचं हे वाचून काय मत होईल? पाहुण्यांचं जाऊ देत, आपल्यचं भावी पिढ्यांना हे वाचून काय कळेल अशा अनेक प्रश्नाचं माझ्या मनात मोहोळ उठलं.
‘काळा घोडा’ हा परिसर सध्या दक्षिण मुंबईतील एलिट वर्गाच्या ‘काळा घोडा फेस्टीवल’साठी म्हणून प्रसिद्ध झाला आहे. हे चांगलंही आहे. परंतु आता उभारलेला हा काळा घोडा मुंबईच्या इतिहासाशी सुसंगत नाही. फेस्टीवल सुरु होण्यापुर्वीपासून ‘काळा घोडा’ हा मुंबईच्या इतिबासाचा तुकडा नाममात्र का होईना पण शिल्लक आहे. स्वातंत्र्यानंतर खरा ‘काळा घोडा’ जिजामाता उद्यानात हलवलेला असला तरी त्या ‘काळ्या घोड्या’च्या नावाने तो परिसर विख्यात आहे. आता ह्या काळ्या घोडयामुळे मुंबईचा खरा इतिहास कधीतरी भावी पिढ्यांना कळेल का की काळा घोडा म्हणजे मुंबई महानगरपालिकेनं उभारलेलं
आणि रेसिडेंट असोसिएशन्ने प्रायोजित केलेलं एक सुरेख शिल्प एवढाच संदर्भ त्यांना मिळेल?
स्वातंत्र्यानंतर मुंबईचा मूळ काळा घोडा जिजामाता उद्यानात हलवला हे चांगलं कि वाईट हा इथे मुद्दा नाही. महानगरपालिकेने कोणताही इतिहास नसलेला नवीन काळा घोडा उभारला या बद्दलही अडचण नाही. मात्र भावी पिढ्यांसाठी तेथील मूळ काळा घोडा म्हणजे काय होता, तो उभारण्यामागे कोणता उद्देश होता, तो पुतळा मुंबईच्या नागरिकांना त्यावेळी सर डेव्हिड ससून या श्रीमंत तरीही परोपकारी असलेल्या व्यापाऱ्याच्या देणगीतून कसा उभारला, त्या परिसराच ‘काळा घोडा’ नांव कसं पडलं याची माहिती देणारा एखादा फलक आताच्या घोड्याच्या चबुताऱ्यावर लावण्यास काय हरकत होती, आपण आपला नको असलेला तरीही महत्वाचा इतिहास असा पुसून टाकण्याचा असा प्रयत्न का करतोय आणि इतिहास असा पुसून टाकता येतो का याचा विचार कोणीतरी केलाय असे वाटत नाही.
एखाद्या ठिकाणाला प्राप्त झालेलं नांव म्हणजे काही अक्षरांची एका विशिष्ट क्रमाने केलेली मांडणी नसते तर नांवातील त्या शब्दांमागे प्रचंड इतिहास दडलेला असतो व चार-दोन अक्षरांचं ते नांव उच्चारताच तो इतिहास क्षणात नजरेसमेर उभा राहातो हे आम्हाला कधी कळणार कोण जाणे. नव्या पिढीला तर ‘काळा घोडा’चा इतिहास कितपत माहित असेल याविषयी शंकाच आहे.
१८७५ साली इंग्लंडच्या राजाने (तेंव्हाच्या भारताच्याही), किंग एडवर्ड सातवा (प्रिन्सऑफ वेल्स) यांने, मुंबईस भेट दिली व त्याच्या स्मरणार्थ त्याचा हा भव्य अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला..हा पुतळा सर अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून यामुंबईतील श्रीमंत व परोपकारी ज्यू व्यापाऱ्यांने त्या वेळच्या मुंबई शहराला आणि शहरवासियांना भेट दिला होता..खरं तर हा पुतळा सातव्या एडवर्डचा, पण तो त्याच्यामुळे कधीच ओळखला गेला नाही..पुतळा सुरुवातीपासून ओळखला जातो तो त्याच्या घोड्यामुळे..! घोड्यावर सवार सातवा किंग एडवर्ड संपूर्ण लष्करी, फिल्ड मार्शलच्या गणवेशात असून राजा व त्याच्या बुटापासून केसांपर्यतचे काळ्या दगडात कोरलेले सर्व बारकावेमुद्दाम बघण्यासारखे आहेत.. अत्यंत प्रमाणबद्ध असलेल्या आणि काळ्या पत्थरात घडवलेल्या या संपूर्ण शिल्पात शिल्पकाराने घोड्याचं सौष्ठव इतक्या अचूकपणे पकडलय की तो अगदी जिवंत असून कधीही चालायला लागेल असा क्षणभर भास होतो आणि कदाचित म्हणून सातव्या एडवर्डपेक्षाही त्याचा घोडाच लोकांच्या लक्षात राहिला असावा. मूळ काळ्या घोड्याची अशी व्यवस्थित माहिती देणारी एखादी पाटी, त्या काळ्या घोड्याचा त्याच्यावरील स्वरासकटचा फोटो व त्याचा सध्याचा मुक्कामाचा पत्ता तिथे लावला असता तर भावी पिढ्यानाही कळलं असतं की येवढा सुप्रसिद्ध काळा घोडा म्हणजे काय होत ते. त्यावेळच्या देशवासीयांनी कोणत्या बलाढ्य शत्रूशी लढा देऊन स्वातंत्र्य खेचून आणलंय ते..! देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण वेचलेल्या आपल्या पूर्वजांचा त्यांना अभिमान वाटला असता. सध्या उभारलेला काळा घोडा असा कोणता अभिमान त्यांच्या मनात जागृत करेल का हा ही प्रश्नच आहे.
इतिहास विसरून कसा चालेल? जर्मनीत, ऑस्ट्रियात लाखो ज्यूंचं शिरकाण जिथ केल गेल, ते कॉंन्संट्रेशन कँप्स त्या देशवासीयांनी निगुतीने जपून ठेवलेत व कोणत्या दिव्यातून जाऊन त्यांनी आपला देश जिवंत ठेवलाय एवढेच नव्हे तर बलाढ्य केलाय याची निशाणी नवीन पिढ्यांसाठी जगती ठेवलीय. जर्मनी, ऑस्ट्रियासारख्या युरोपातील देशांसाठी तो खरं तर कालंकच होता. परंतु त्यांनी तो कलंक इतिहासाचा एक महत्वाचा साक्षीदार म्हणून भावी पिढ्यांसमोर अजून जपून ठेवलाय. काय करावं आणि काय आणि काय करू नये हे कळण्यासाठी तरी अश्या ‘कलंकित’ खुणा नविन पिढीच्या नजरेसमोर असणं आवश्यक असतात. इतिहास असा समोर ठेवल्याने स्फूर्ती मिळते आणि देशप्रेमाची स्फुल्लिंग जागृत होते हे आपल्या लोकांच्या लक्षात येतंय की नाही कुणास ठाऊक..! या शिल्पाला इथं परवानगी देणारे, त्याची उद्घाटनं करणाऱ्या आजच्या आपल्या सुबुद्ध राजकर्त्यांना तरी हे समजायला हवं होतं..
या घोड्याचं शिल्प कलापूर्ण आहे व त्याबद्दल शिपकार श्रीहरी भोसले याचं कौतुकाच आहे. घोड्याचा रंग काळा आहे आणि त्यात ‘कला’ही आहे म्हणून इंग्रजी ‘Kala Ghoda’ स्पेलिंगमधलं kala या शब्दाचा अर्थ ‘काळा’ असा न घेता ‘कला’ असा घेतला तर ते योग्य ठरेल आणि काळा घोड्याच्या इतिहासापेक्षा तिथे होणाऱ्या ‘फेस्टीवल’शी अधिक सुसंगत असेल असं आपलं माझ मत. या घोड्याचा इतिहासाशी जराही संबंध नाही म्हणून मी या लेखाच्या सुरुवातीला घोडा ‘पार्क’ केलाय असा शब्दप्रयोग केलाय, ‘उभारलाय’ असं म्हटलेलं नाही..
‘फेस्टीवल’पेक्षा ‘इतिहास’ महत्वाचा असतो हे आपल्याला ज्या दिवशी कळेल त्या दिवशी भारत खऱ्या अर्थाने बलशाली होण्याकडे दमदार पावले टाकेल. जो देश आणि त्यातील देशवासी इतिहास विसरतात त्यांना इतिहास विसरतो असं म्हणतात ते काय उगाच?
-नितीन साळुंखे
09321811091
salunkesnitin@gmail.com
Leave a Reply