नवीन लेखन...

मुंबईचा आद्य राजा बिंब..

ज्यांना मुंबईच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते किंवा ज्यांना मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असतो, त्यांना मुंबईवर लिहिल्या गेलेल्या विविध पुस्तकांचं वाचन करताना, मुंबईचा ‘राजा बिंब’ भेटतोच भेटतो. मुंबईतील माहीम येथे आपली राजधानी स्थापन करणारा हा पहिला राजा. परंतु या बिंबाच्या नावाचा आणि तो कधी होऊन गेला, याबद्दल खूप गोंधळ आहे. बिंब राजाचा उल्लेख बऱ्याचदा ‘बिंबराजा’, ‘भिम’, ‘भिमराजा’ असा वेगवेगळ्या पद्धतीने येतो आणि मनात अगोदरच झालेला गोंधळ आणखी वाढतो.

बिंब राजाचे नांव आणि त्याच्या कारकीर्दीचा समय यावर माझ्या वाचनात आलेली ‘महिकावातीची बखर’ उत्तम प्रकाश पाडते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी विश्लेषण केलेली ही ‘महिकावतीची बखर’, ‘बिंब राजा’ अगदी स्पष्ट करून सांगते. वि. का.. राजवाडेंनी या बखरीतल्या नावांच्या आणि बिंब राजा आणि संबंधितांच्या होऊन गेलेल्या काळाच्या स्पष्टतेसाठी तर बखरीवर प्रचंड मेहेनत घेतलेली पुस्तकाच्या पानापानावर दिसून येते. इतिहासाचार्यांचा या क्षेत्रातील आदरयुक्त दबदबा पाहाता, त्यांनी या पुस्तकात नोंदलेल्या निरीक्षणाबद्दल माझ्या मनात तरी कोणतीही शंका नाही. माझ्या माहिती प्रमाणे त्याकाळची माहिती देणारा हा एकमेव दस्तऐवज आज उपलब्ध असल्याचं समजतं.

बखरीत नोंदल्याप्रमाणे मुंबईवर वेगवेगळ्या कालावधीत एकूण दोन वेगवेगळ्या बिंबानी राज्य केलं. माहीम मुंबई येथे राजधानी स्थापन करणारा पहिला राजा होता राजा ‘प्रताप बिंब’ आणि याच्या नंतर जवळपास १५५ वर्षांनी आलेला ‘बिंब यादव’..! या दोन राजांच्या नांवात असलेल्या साधर्म्यामुळे, माहीम येथे राजधानी स्थापन करणारा हा बिंब नेमका कोण आणि ते होऊन गेलेल्या काळात जवळपास १५५ वर्षांचं अंतर असल्याने, त्यातील नेमका कुठला बिंब कधी होऊन गेला यातही विविध लेखकांत मतभेद आढळून येतात. महिकावतीची बखर’ मात्र हे दोन्ही बिंब, पहिला बिंब आणि त्यानंतर १५५वर्षांनी आलेला दुसरा बिंब व त्या दोघांच्या दरम्यान होऊन गेलेले अन्य राजे यांचा पट अगदी व्यवस्थित उलगडून दाखवते.

मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब –

मुंबईतील माहिम या ठिकाणी राजधानी स्थापन करणारा पहिला बिंब म्हणजे प्रताप बिंब राजा. ‘प्रताप’ हे त्याचं नांव आणि ‘बिंब’ हे आडनांव. हा गुजरातेतल्या अनहिलवाडच्या चालुक्याचा मंडलिक असलेल्या चांपानेरचा राजा गोवर्धन बिम्बाचा भाऊ. शके १०६०, म्हणजे इसवी सन ११३८ मध्ये गोवर्धन बिम्बाने आपला भाऊ प्रताप बिंबाला उत्तर कोकणवर स्वारी करण्याचे आदेश दिले. उत्तर कोकण म्हणजे साधारणत: गुजरातेतल्या दमण पासून ते मुंबईच्या मलबार हिलपर्यंतचा प्रदेश. आपल्या भावाची आज्ञा शिरसावंद्या मानून हा प्रताप बिंब जानेवारी सन ११३८ ला उत्तर कोकण प्रान्त सर करण्यास गुजरातेतून निघाला.

राजकीय व्युह रचनेचा भाग म्हणून प्रताप बिंब थेट उत्तर कोकणावर चालून न येता प्रथम पैठणला गेला. पैठणला त्या काळी राज्य करणारा भौम आडनांवाचा संस्थानिक होता, तो या प्रताप बिम्बाच्या नातेवांईकांपैकी होता. किंबहूना प्रताप बिम्बाचं ‘बिंब’ हे आडनांव देखील ‘भौम’ या आडनांवाचा अपभ्रंश आहे, असं राजवाडे म्हणतात. या भौमाकडे प्रताप बिंब तब्बल दोन वर्ष राहीला. ही दोन वर्ष प्रताप बिम्बाने चढाईसाठी लागणारं द्रव्य आणि साधन-सामग्रीचीजमवा-जमाविसाठी घालवली. सर्व तयारी पूर्ण होताच, इसवी सन ११४० मध्ये प्रताप बिंब त्याचा प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी, एक ब्राह्मण पुरोहित हेमाडपंत आणि सात मराठा (सोमवंशी-सूर्यवंशी मराठा) सरदाराना घेऊन उत्तर कोकणच्या मोहिमेची सुरुवात दमणवर स्वारी करून करायची ठरवलं.

त्याच वर्षी, शके १०६२, म्हणजे इसवी सन ११४० मध्ये प्रताप बिंब दमणमध्ये दाखल झाला. कोकणावर त्याकाळी राज्य असणाऱ्या शिलाहारांचा मांडलिक असलेला दमणचा दुर्बळ राजा काळोजी सिरन्या प्रताप बिंबला शरण आला. विनासायास दमण हाती आल्यावर प्रताप बिंब आणखी दक्षिणेकडचा प्रदेश सर करण्यास निघाला. चिंचणी-तारापूर, पालघर, केळवे-माहिम, वसई पर्यंतचा प्रदेश प्रताप बिंबाने वेगाने काबिज केला. दमण ते वसईच्या खाडीच्या उत्तर किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश आता प्रताप बिंबाच्या अधिपत्याखाली आला.

दमण नंतर केळवे-माहिमचा राजा विनाजी घोडेलही प्रताप बिंबास शरण आला. दमण ते पालघर-वसईपर्यंतचा हा प्रदेश सुंदर असला तरी, या प्रदेशावर राज्य करणाऱ्या शिलाहारांचा हा पडता काळ होता आणि या प्रदेशातूल त्यांच्या मांडलिक राजांवर शिलाहारांचा कोणताही वचक नसल्याने, या मांडलिकांचा निरंकूश राज्य कारभार चालल्याने, हा सर्व प्रदेश वैराण आणि उध्वस्त झालेला होता. मुळातच सुंदर असलेल्या या प्रदेशात आपल्या मुळ प्रदेशातून लोक आणून त्यांना इथे वसवण्याच प्रताप बिंबाने ठरवलं आणि त्याने आपला पुत्र मही बिंब यास चंपानेर-गुजरातहून वसाहत करण्यासाठी लोक आणण्यास सांगीतलं. मही बिंब गुजरातेहून सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी असे सर्व मिळून ६६ कुळे घेऊन निघाला. मही बिंबाने पैठणहून काही ब्राह्मणांनाही बोलावलं. दमण-माहिमची व्यवस्था लावण्यासाठी प्रताप बिंब स्वत: केळवे- माहिम येथे राहीला. केळवे-माहिमला त्साने राजधानी स्थापण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा एक अधिकारी हरबाजी कुळकरणी याला दमणची व्यवस्था पाहाण्यासाठी धाडून दिलं. एवढं झाल्यावर प्रताप बिंबाने त्याचा प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी यास इसवी सन ११४२ मधे पुढच्या मोहिमेस, म्हणजे वालुकेश्वरापर्यंतचा प्रदेश सर करण्यास जाण्याची आज्ञा केली.

पुढच्या महिनाभरात बाळकृष्णराव सोमवंशी यांने वाळकेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या अंमलाखाली आणला. वाळकेश्वाराच्या टेकडीवर, म्हणजे मलबार हिलवर जिथे आज राजभावन आहे तिथे, बाळकृष्णरावाने आपल्या सैन्याचा तळ ठेवला. वाळकेश्वराचं आणि तिथल्या मारुतरायाचं दर्शन घेतलं. माझ्या मते हा मारुती* म्हणजे सोबतच्या चित्रातला असावा. काही दिवस वाळकेश्वराला मुक्काम झाल्यावर त्यांने प्रताप बिंबाला वाळकेश्वरी येऊन आपला प्रदेश पाहाण्याची व तिथे वसाहत करण्याची विनंती केली.

एवढ्यात मही बिंब केळवे-माहिमात याऊन ठेपला होता. मही बिंबासोबत वसाहत करण्यासाठी आलेल्या कुळांची व्यवस्था केळवे-माहिम, पालघर परिसरात लावून, प्रताप बिंबाने मही बिंब आणि त्याने सोबत आलेल्या सोमवंशी क्षत्रिय मराठा-सूर्यवंशी क्षत्रिय मराठा आणि शेषवंशीय क्षत्रिय मराठा कुळांपैकी काही कुळं व पैठणहून आणलेले काही ब्राह्मण सोबत घेतले आणि तो वाळकेश्वराकडे निघाला. पुढच्या काही दिवसांत प्रताप बिंबाचा लवाजमा वाळकेश्वरी पोचला. तिथे काही दिवस राहून प्रताप बिंबाने वाळकेश्वराच्या साक्षीने स्वत:स राज्याभिषेक करवून घेतला व तो दमण ते वाळकेश्वरापर्यंतच्या जवळपास ८४ मैल, म्हणजे १३५ किलो मिटर (आजच्या काळात हे अंतर ११५ किमि. भरतं) पसरलेल्या राज्याचा राजा म्हणून घोषित झाला. अगोदरच मुक्रर केल्याप्रमाणे या नविन राज्याची राजधानी म्हणून केळवे-माहिम ठरली. इथे त्याने बक्षिस म्हणून पैठणहून राज्याभिषेकासाठी आलेल्या माध्यंदिन ब्राह्मणांना काही जहागिरींचं वाटप केलं. पैकी गंगाधर नाईक सांवखेडकर यांना पसपवली, म्हणजे आताच्या पवंई नजिकचं पासपोली गांव इनाम दिलं, तर विश्वनाथपंत कांबळे (होय, कांबळेच..!) यांस गोरेगांव नजिकचं पहाडी गांव वंशपरंपरागत जहागिरी म्हणून दिलं. वाळकेश्वरास बसून त्याने वाळकेश्वरापासून एवढ्या लांबच्या गांवांचं वाटप का केलं, हे समजण्यास काही मार्ग नाही.

वाळकेश्वरी काही दिवस मुक्काम करुन राजा प्रताप बिंब पुन्हा केळवे-माहिमला येण्यास निघाला. वाळकेश्वराहून परत येताना राजा प्रताप बिंबाचा पहिला मुक्काम ‘वहिनळे-रांजणफर’ या गांवांत पडला. ही गांवं आताच्या मुंबंईच्या नकाशावर नक्की कुठली, ते सापडणं अवघड आहे, तरी ही गांवं वांद्रे-खार परिसरातली असावीत असं वाटतं. कारणं वांद्रे येथील मेहेबूब स्टुडीयोच्या नजीक एक ‘रनवर’ किंवा ‘रानवर’ नांवाचे गाव अजूनही आहे. आणखी एक ‘राजान’ नांवाचं गांव त्याच परिसरात आहे. ह्या दोन गांवांपैकी कुठलं तरी गांव पूर्वीचं रांजणफर असावं आणि ‘वहिनळे’चंच पुढे ‘वांद्रे’ झालं असावं की काय, अशी दाट शंका मला येते. असो. या मुक्कामात राजा प्रताप बिंबाने आणखी काही जहागिरींचं वाटप केलं. मरोळची जहागिरी रखमाजीराव सोमवंशी यांना तर मालाडची जहागिरी गंगाधररावांना दिली व त्यांच्या त्यांच्या वतनात त्यांना वसाहती करण्याचे हुकून दिले व राजा पुढच्या प्रवासासाठी निघाला.

राजा प्रताप बिंबाने त्याचा पुढचा मुक्काम नीट कळत नाही, पण तो जोगेश्वरी किंवा कान्हेरीच्या गुंफात केला असावा. या मुक्कामात त्याने मुंबई-माहिम आणि वरळीची जहागिरी गंभिरराव सूर्यवंशी यांना दिली. दमणच्या हरबाजी कुळकर्ण्यांना मालाडपासून घोडबंदरपर्यंतचा परिसर वतनात दिला आणि पुत्र मही बिॅबाला त्याने कल्याणची भुमी सर करण्यास पाठवलं..

राजा प्रताप बिंब वाळकेश्वराला स्वत:ला राज्याभिषेक करायला केळवे-माहिमहून (महिकावती) निघाला, तो जिंकलेल्या सर्व प्रदेशाची घडी बसवत बसवत परतीच्या प्रवासाला निघाला, त्यास साधारणत: वर्षभराचा अवधी लागला असावा, असं बखरीत दिलेल्या काळावरून लक्षात येतं.

राजा प्रताप बिंबाची वर्षभराची मोहिम वसईच्या खाडीच्या दक्षिणेकडे सुरू असताना, त्याच्या महिकावतीच्या राज्यात, म्हणजे केळवे-माहिम परिसरात वेगळ्याच घटना घडत होत्या. बिंब राजा, राजपुत्र व बहुतेक सर्व महत्वाच्या सरदारांची त्या परिसरातली अनुपस्थिती पाहून, शिलाहारांनी राजा प्रताप बिंबाच्या वसई ते दमण परिसरावर हल्ला करुन राजधानी महिकावती, म्हणजे केळवे-माहिम आपल्या ताब्यात घेतली आणि राजा प्रताप बिंबाला वसईच्या खाडीच्या दक्षिणेस वाळकेश्वरापर्यंतच्या प्रदेशात कोंडून टाकलं.

प्रताप बिंबाने आपली राजधानी केळवे-माहिम शिलाहारांच्या ताब्यात गेल्याचे वर्तमान समजल्यानंतर, पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असावेत. त्यासाठी त्याने याच्या सैन्याचं आणि स्वत:च्या मुक्कामाचं स्थान म्हणून मुंबई-माहिम ठरवलं असावं. पुढचा काही काळ राजा प्रताप बिंबाने आपली जुनी राजधानी घेण्याचे प्रयत्न केले असावेत व त्या प्रयत्नांना यश येत नाही हे पाहून शेवटी आपली राजधानी म्हणून त्याने मुंबंई माहिम मुक्रर केली असावी. अर्थात, रादा बिंबाने ‘बिंबस्थान-माहिम’ येथे राजधानी स्थापन केली’ एवढाच उल्लेख बखरीत आहे. बखरीत दिलेल्या काळातील फरकाचा तपशील भरून काढण्यासाठी मी या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे कल्पनेने मांडणी केलेली आहें.

या माहिम बेटाला पूर्वी नांव नव्हतं. ओसाड, वेराण असलेल्या या बेटाला ‘बरड बेट’ किंवा बॅरन लॅन्ड असं म्हणत. शके १०६० च्या अखेरीस, म्हणजे इसवी सन ११३८, राजा प्रताप बिंबाने या ठिकाणाला आपली राजधानी बनवलं आणि आपल्या जुन्या राजधानीचंच ‘माहिम’ हे नांव दिलं आणि तेंव्हापासून या बेटाला माहिम हे नांव पडलं, असं म्हणता येतं. माहिमला ‘बिंबाच्या लष्कराचे ठाणे’ या अर्थाने ‘बिंबस्थान’ असंही एक नांव त्याने दिलं. केवळ माहिमच नव्हे, तर केळवे माहिम परिसरातल्या आणखीही काही ठिकाणची नांव त्यांने मुंबईतील काही ठिकाणांना दिली. उदा. नायगांव, धारावी इ. राजा प्रताप बिंबाने त्याची कुळदेवता ‘प्रभावती’ हिची स्थापना माहिम येथे केली असावी, असं मानण्यास जागा आहे, कारण कुळदेवतेचं देऊळ स्थापन करण्याची आजही प्रथा आहे. हिच प्रभावती पुढे ‘प्रभादेवी’ म्हणून प्रसिद्धीस पावली. आजही हिचं मंदिर (आणि आता रेल्वे स्टेशनही) मुंबईत आहे..!!

असा हा ‘राजा प्रताप बिंब’ सध्याच्या मुंबईतल्या माहिमला राजधानी स्थापन करणारा या अर्थाने मुंबईचा पहिला राजा. राजा प्रताप बिंबाने इसवी सन ११५९-६० पासून पुढची ९ वर्ष मुंबईवर राज्य केलं. राजा प्रताप बिंब आणि त्याच्यानंतर माहिमच्या गादीवर बसलेले राजे आणि त्यांची कारकिर्द खालील प्रमाणे होती..;

**राजा प्रताप बिंब –
शके १०६२-१०६९ या कालावधीतला वाळकेश्वर ते दमण पर्यंतच्या राज्याचा राजा म्हणून ७ वर्ष. मुंबई-माहिम ही राजधानी आणि वाळकेश्वर ते वसईपर्यंतच्या प्रदेशाचा राजा म्हणून ५ वर्ष.

प्रताप बिंबाचा पुत्र मही बिंब –
शके १०६९ ते ११३४- एकूण ६५ वर्ष

मही बिंबाचा पुत्र केशवदेव बिंब-
शके ११३४ ते ११५९ – एकूण २५ वर्ष

केशवदेवास पुत्र नसल्याने जनार्दन प्रधान दत्तक आला व पुढची शके ११५९ ते ११६३ अशी चार वर्ष.

जनार्दन प्रधानाचा पराभव चौलचा वैश्य राजा नागरशाने केला व त्या नंतर माहिम-मुंबईवर त्याने शके ११६३ ते शके १२१६ पर्यंत अशी ५३ वर्ष राज्य केलं.

शके १२१६ मधे या परिसरात अवतरला, तो देवगिरीच्या रामदेवराव जाधव(यादव) याच्या तीन पुत्रांपैकी एक ‘बिंब जाधव (यादव)’. हा माहिम-मुंबईवर राज्य केलेला दुसरा बिंब. याने शके १२२५ पर्यंत या प्रदेशावर राज्य केले. याच्यानंतरही शके १२६९-७०पर्यंत काही राजे इथे होऊन गेले व त्यानंतर इथे मुसलमानी अंमल सुरू झाला.

शके १०६२ मधे आलेल्या पहिल्या बिंबाचं नांव ‘प्रताप’ असून, आडनांव ‘बिंब’ होतं. तर त्याच्या नंतर जवळपास १५५ वर्षांनी झालेला दुसऱ्या बिंबाचं नांव ‘बिंब’, तर आडनांव ‘जाधव (यादव)’ होतं. सुमारे १५५ वर्षांच्या अंतराने झालेल्या दोन्ही बिंबांनी ९ वर्षच राज्य केलं, ही गोष्ट मला आश्चर्याची वाटते. या दुसऱ्या बिंबाची कथा पुन्हा कधीतरी सांगायचा प्रयत्न करेन. दोन्ही बिंबातल्या नावांच्या सारखेपणामुळे लेखाच्या सुरुवातीला म्हणालो तसा गोंधळ होतो व मग असा गोंधळ त्यांच्या होऊन गेलेल्या काळातही परावर्तित होतो.

-©️नितीन साळुंखे
9321811091

टिप-
1. *मारुतीची फोटो. बाळकृष्णरावाने दर्शन घेतलेला वाळकेश्वराचा मारुती हाच असावा असा माझा अंदाज आहे, खात्री नव्हे.

2. **महिकावतीची बखर अनेकदा वाचून त्याचं सार वरील लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काही प्रमाणात गोंधळ उरतोच. सदर बखरीतल्या घटना प्रत्यक्ष घडल्यानंतर ‘काही शे’ वर्षांनी लिहिल्या गेल्या असल्यामुळे, तपशीलात तेवढासा सुसंगतपणा जाणवत नाही. इतिहासाचार्य राजवाडेंनी या बखरीचं विश्लेषण करताना त्यात बरीच सटीकता आणण्याचा प्रयत्न केला आहे हे जाणवलं तरी काही प्रमाणात अद्यापही त्यात सुसंगतता दिसते. उदा. प्रताप बिंब शके १०६० मधे दक्षिण कोकणावर स्वारी करण्यास निघाला, तो दोन वर्षांनी शके १०६२ मधे पैठण मार्गे कोकणतल्या दमण येथे आला, असं बखरीत नोंदलं आहे. पुढे त्याने मुंबई-माहिम येथे राजधानी स्थपन केल्याचा शके पुन्हा १०६० दिलं आहे व त्यानंतर त्याने ९ वर्ष इथून राज्य सांभाळल्याचा उल्लेख आहे. मुळात तो मुंबई प्रांतात आलाच शके १०६२ ला, तर मग तो ९ वर्ष इथे राज्य करेलच कसा, हा प्रश्न मला पडला व ती दुरुस्ती मी अंदाजाने ५ वर्ष असावीत अशी करुन घेतली आहे.

3. मुंबई-माहिमला राजधानी करणारा पहिला बिंब कोण, येवढेच स्पष्ट करण्यासाठी हा लेख आहे. त्यामुळे इतर तपशील मी यात लिहिलेला नाही. मुंबई-माहिम ही जरी प्रताप बिंबीने वसवलेली असली तरी, त्यावेळच्या राजकीय धामधुमीत या राज्याची भुमी वाळकेश्वर ते वसई व पुढे दमणपर्यंत कमी-जास्त होत राहीली होती, हे लक्षात ठेवावं.

4. प्रताप बिंब हा मुळचा गुजरातेतील अनहिलपाटण किंवा अहीनलवाडचा व येताना तो मुंबईत तिकडून सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी कुळं घेऊन आला असं म्हटलं आहे. शेषवंशी समाज म्हणजे आताचा भंडारी समाज, तर सोमवंशी व सूर्यवंशी म्हणजे साधारणत: पाटील, म्हात्रे, चौधरी, चुरी, वर्तक, सावे वैगेरे आडनांवांचा समाज. हा समाज आजही केळवे-माहिम व मुंबईत मोठ्यासंख्येने सापडतो व त्यांच्या गांवच्या बोलीत गुजराती-मारवाडी शब्द सापडतात. सोमवंशी-सूर्यवंशी आणि शेषवंशी समाजाचा किंवा त्यांच्या बोलीचा मी जाणकार नव्हे, तर मी एका माहितगार व्यक्तीकडून ही माहिती विचारून ही टिप लिहिली आहे. त्यात काही चुक असल्यास ती माझी समजावी व माझ्या लेखाचा मुख्य हेतू लक्षात घेऊन दुरुस्ती सुचवावी.

5. मुंबईचे मुळ रहिवासी असलेल्या कोळ्यांनतर सोमवंशी क्षत्रिय पाठारे, सूर्यवंशी क्षत्रिय व शेषवंशी क्षत्रिय हे मुंबईचे दुसरे मुळनिवासी ठरतात. सोमवंशी क्षत्रिय पाठारे समाज व पाठारे प्रभू समाज हे पूर्णत: वेगळे. पाठारे प्रभु दुसऱ्या बिंबासोबत, म्हणजे शके १२१६ मधे मुंबईत आले. याचा अर्थ पाठारे प्रभू समाज कोळी, सोम.-सूर्य-शोष वंशीयांनंतरचे मुंबईला घडवणारा तिसरा महत्वाचा समाज होतो.

6. सोमवंशी क्षत्रिय, सूर्यवंशी क्षत्रिय व शेषवंशी क्षत्रिय या तिन्ही समाजांचा बखरीतला एकत्रित उल्लेख ‘मराठा’ असा आहे. याचा अर्थ त्या काळात ‘क्षत्रिय’चा समानार्थ ‘मराठा’ असा होत असावा, असं मला वाटतं.

7. हा लेख लिहिताना इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंचं ‘महिकावतीची बखर’ हे पुस्तक आधारभूत मानलेलं आहे. काही तपशिलांच्या पुष्टीकरता श्री. अशोक सावेंचं ‘महिकावतीची बखर’ याच नांवाचं पुस्तकही संदर्भासाठी घेतलेलं आहे. श्री. अशोक सावेंच्या मत आणखीही एक बिंब होता, परंतू शिलाहारांपैकी असून तो प्रताप बिंबाच्या पूर्वी होऊन गेला होता. काही शिलालेखांवर त्या बिंबाचा उल्लेख सापडतो असं श्री. सावेंनी लिहिलं आहे. हा बिंब मुंबईचा पहिला राजा बिंबाच्या पूर्वी होऊन गेला, असंही श्री. सावेंनी लिहिलं आहे, परंतू मुंबईच्या संदर्भात ज्या बिम्बाचा किंवा बिंब राजाचा उल्लेख वारंवार येतो, तो हा बिन्ब खचितच नव्हे. म्हणून याचा उल्लेख मात्र इथे केला आहे, ते केवळ तो माहिती असावा म्हणून..!!

8. सोमवंशी, सूर्यवंशी व शेषवंशी समाजाचे आणखीही अंतर्गत भेद आहेत, मात्र ते इथे देणं अपेक्षित नसल्याने, त्यांचं ढोबळ वैशिष्ट्य माझ्या विदुषी स्नेही डाॅ. सौ. सुनिता सुवेन पाटील यांच्याकडून माहित करून घेतलं आहे. त्यांनी बरोबरच सांगीतलं असेल, लिहिण्यात काही चूक असल्यास ते पाप माझे.

9. ‘शके’वरून इसवी सन काढताना ‘शके’त ७८ मिळवावेत. उदा शके १०६२+७८= इसवी सन ११४०.

10. केळवे-माहिम म्हणजे ‘महिकावती’ आणि मुंबई-माहिम म्हणजे ‘बिंबस्थान’.

-©️नितीन साळुंखे
9321811091

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा- लेखांक – ३० वा

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

2 Comments on मुंबईचा आद्य राजा बिंब..

  1. आगरी समाज हा पैठण वरून आला व तो कोकणात पसरला असा उल्लेख सापडतो पण या सामाज्याचा मूळ इतिहास सापडत नाही तरी आपणास माहित असल्यास कृपया सांगावे
    रामनाथ म्हात्रे
    तुर्भे नवी मुंबई
    ८१०४३३१६९६

  2. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्यातील मूळ निवासी आगरी समाजा बाबतचा उल्लेख लेखामद्धे असणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..