प्रवास लोकलचा…
खिडकी जवळचे सीट
दोन सीट च्या मधली उभे राहण्याची जागा
फॅन खालचे सीट
दरवाज्यात उभे राहून हवा खाणे
सामान वर ठेवणारा स्वयंसेवक
गरजूना जागा देणारे दयाळू
कुठे उतरायचे ते सांगणारे गाईड
स्पेशल डब्बा आहे याची जाणीव असणारे आणि करून देणारे
चौथे सीट
मसाज घेत उभे राहण्याची धडपड
हाडे मोडतील ही भीती
मोबाईल, पाकीट मारले जाईल ही भीती
फाटलेले पत्रे आणि बॉम्बची भीती
धक्का-बुक्की, घाम, वास
दारूचा वास आणि धुंदी
गाडीतून पडून मरण्याची भीती
लाटेसारखा येणारा आणि जाणारा गर्दीचा दबाव
दुसऱ्याच्या पायात घातलेला पाय, घवले वळणे
खेटणे, दाबणे, बलात्कार, लाल-पांंढरी थुंकी, रक्त, शु, शी आणि उलटी
ढोलकी, टाळ आणि पत्ते
कोपरापासून तुटलेला की कापलेला हात
गुडघ्यापासून तुटलेला की कापलेला पाय
घुंगरू, डफ आणि नाच
शेम्बडी गोड बाळे आणि त्यांच्या अस्थीपंजर आया
मोबाइल गेम्स, डाउनलोड केलेल्या फिल्म्स, सिरिअल्स
भिकारी, व्यापारी, मवाली, गर्दुल्ले
बहुभाषिक शिव्या आणि भांडणे
चणे, शेंगा, आलेपाक, गोळ्या
चित्रांची पुस्तके, टाचण्या, पिना आणि रबर
खास कंपनीने स्वस्तात दिलेले
तीन सीटांवर निश्चिंत झोपलेली माणसे
दरवाजात मांडी ठोकून बसणारी माणसे
स्थितप्रज्ञ गार्ड आणि ड्रायव्हर
टपावरची माणसे
आणि चाकाखालचीही माणसे
प्रेत आणि नवजात
सुख आणि दुःख
माझे आणि तुझे
मान आणि अपमान
अभिमान आणि दुराभिमान
चांगले आणि वाईट
स्वच्छ आणि घाण
आणि आपले स्टेशन आले की…
एका क्षणात
सगळा खेळ खल्लास…
अगदी थेट आयुष्यासारखा
— शुभराज बुवा
छान