महाराष्ट्राच्या साहित्य, सांस्कृतिक, नाटय़ क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा निर्माण करणाऱ्या मुंबई मराठी साहित्य संघाने २१ जुलै रोजी नव्वदीत पदार्पण केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय मुंबईतून पुण्यात हलवण्यात आल्यावर मुंबईतही तशी एक मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणारी संस्था असावी, असा ठराव १९३४ सालच्या साहित्य संमेलनात करण्यात आला. त्याच्या फलस्वरूप २१ जुलै, १९३५ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना करण्यात आली. संस्थेचे पहिले कार्यालय संस्थापक डॉ अ.ना.भालेराव यांच्या गिरगावातील नारायण – सदन या निवासस्थानी सुरु झाले.१९३४ साली मुंबई येथे भरलेल्या मुंबई आणि उपनगर साहित्य संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर यांची नियुक्ती झाली. या अधिवेशनापासून साहित्यिक स्वरूपाचे स्थायी कार्य करण्यासाठी अशी संस्था स्थापन करण्याची कल्पना निघाली. साधनांच्या मर्यादेप्रमाणे साहित्य संघाचे प्रारंभीचे कार्य मर्यादित राहिले. मुंबई व उपनगर भागांत वार्षिक साहित्य संमेलने भरविणे, साहित्यविषयक प्रासंगिक चर्चा घडवून आणणे, आल्या-गेल्या साहित्यिकांचा परामर्श घेणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱया परीक्षांचे वर्ग चालविणे, स्वतःची नियतकालिके चालविणे, कै.वामन मल्हार जोशी स्मरणार्थ दरसाल एखाद्या विद्वान वक्त्यांची पूर्वनियोजित व्याख्याने करवून ती शक्य तेव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध करणे, व्याख्यानमाला चालविणे, असे या कार्याचे विविध प्रकारचे स्वरूप होते.
१९३८ साली स्वा.सावरकर व १९५० साली राजकवी यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महाराष्ट्र साहित्य संमेलने भरली ती संघाच्याच वतीने. तथापी,१९४१ साली मुंबईस संघाच्या विद्यमाने भरलेले महाराष्ट्र नाटय़संमेलनाचे ३२ वे अधिवेशन संघाच्या कार्यास जरा निराळी व जोराची कलाटणी देण्यास कारणीभूत ठरले.मराठी रंगभूमीस १९४३ साली १०० वर्षे पूर्ण होतात हे लक्षांत घेऊन त्यावर्षी महोत्सव करण्याची कल्पना याच अधिवेशनात निघाली. त्यावर्षी मुख्य महोत्सव सांगली येथे नोव्हेंबर महिन्यात झाला, तरी एप्रिल १९४४ मध्ये साहित्य संघाने मुंबई येथे नाट्योत्सव मोठ्या प्रमाणावर खुल्या नाट्यगृहात पुनः साजरा केला, इतकेच नव्हे तर त्यानंतर दरसाल कमीअधिक प्रमाणात मुंबईत नाट्योत्सव साजरा करण्याची प्रथा पडली. ही प्रथा आजपर्यंत संघाने अव्याहत पाळली आहे. खुल्या नाट्यगृहाची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली असली तरी अलीकडे मुंबईत व इतरत्र ती संघाने लोकप्रिय केली.१९४४ साली पहिला नाट्योत्सव साजरा करत असतानाच ‘साहित्य संघाच्या व तत्सम इतर संस्थांच्या साहित्यविषयक चळवळींकरिता व मुंबईतील नाट्यसंस्थांना प्रतिष्ठित समाजासमोर अल्प भाडयात नाट्यप्रयोग करून दाखवण्याची सोय करणे’ असा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला होता. तो तर साध्य केला गेलाच, परंतु लवकरच गिरगावातल्या केळेवाडीतील जमीन संपादन करून संघाने तेथे एक अद्ययावत नाट्यगृह बांधले. ६ एप्रिल १९६४ रोजी या संघमंदिराचं उद्घाटन झाले आणि मराठी रंगभूमीला हक्काचं घर मिळाले. अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित ‘संगीत शाकुंतल’मधील नांदी १९३५ आणि १९६४ मध्ये साहित्य संघाच्या नाटय़गृहाच्या उद्घाटनाच्या वेळी सादर करण्यात आली होती.
प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर, श्री.दाजीसाहेब तुळजापूरकर, श्री. श्री. म. वर्दे, श्री. रामराव विजयकर, श्री. भास्करराव जाधव, श्री. भा. सी. सुकथनकर, श्री. र. धो. कर्वे, श्री. खं. सा .दौंडकर असे मुंबईच्या विविध समाजातील थोर कार्यकर्ते संघाच्या बाल्यावस्थेत संघास लाभले आणि त्यांच्या विविध गुणांचा संघाला फायदा मिळाला म्हणूनच संघाबद्दल अल्पकाळात सार्वत्रिक आपुलकी निर्माण झाली, प्रतिष्ठा वाढली व साहित्य संघ मंदिराचे स्वप्न साकार झाले.
मुंबई मराठी साहित्य संघ.
संकलन – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply