नवीन लेखन...

मुंबई : रणजीचे राजे

भारतातील सर्वात मोठी प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा अर्थात प्रतिष्ठेच्या ‘रणजी करंडक’साठीचा २०२३-२४ चा हंगाम १४ मार्चला संपला. रणजीच्या अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या मुंबईने १९३४-३५ मध्ये ही स्पर्धा सुरू झाल्यापासून विक्रमी ४२व्यांदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही स्पर्धा जिंकली. २०१५-१६ ला विजेतेपद मिळवल्यावर पुन्हा हा चषक जिंकण्यासाठी मुंबईला ८ वर्षांची दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. १९८४-८५ नंतर तब्बल नऊ वर्षांनी १९९३-९४ मध्ये मुंबईला जेतेपद मिळवता आले होते. त्यानंतर प्रथमच दोन विजेतेपदांमध्ये एवढा कालावधी गेला. अर्थात २०२०-२१ मध्ये कोरोनामुळे ही स्पर्धा झाली नव्हती.

यावेळी मुख्य (Elite) स्पर्धेमध्ये ३२ संघ प्रत्येकी ८ असे ४ गटांमध्ये विभागले होते. त्यातील ‘ब’ गटामध्ये मुंबईचा समावेश होता, ज्यात ईतर संघ होते – बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, केरळ, आंध्रा आणि छत्तीसगढ. सात गटसाखळी सामन्यांपैकी मुंबईने ५ जिंकले, १ अनिर्णित राहिला तर उत्तर प्रदेश विरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला. प्रत्येक गटातून गुणतक्त्यात वरच्या दोन स्थानावरील संघ उपांत्यपूर्व फेरीत जाणार होते. त्यामुळे ‘अ’ गटातून विदर्भ व सौराष्ट्र, ‘ब’ गटातून मुंबई व आंध्र प्रदेश, ‘क’ गटातून तामिळनाडू व कर्नाटक आणि ‘ड’ गटातून मध्य प्रदेश व बडोदा बाद फेरीत पोहोचले.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांमध्ये विदर्भने कर्नाटकला १२७ धावांनी, मध्य प्रदेशने आंध्रला फक्त ४ धावांनी, तर तामिळनाडूने सौराष्ट्रला १ डाव आणि ३३ धावांनी हरवले. मुंबईने बडोद्याला पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मात दिली. पुढचे उपांत्य फेरीचे सामने विदर्भ विरुद्ध मध्य प्रदेश आणि मुंबई विरुद्ध तामिळनाडू असे झाले. ज्यामध्ये विदर्भने मध्य प्रदेशला ६२ धावांनी हरवले तर मुंबईने तामिळनाडूवर १ डाव आणि ७० धावांनी मात केली. १० ते १४ मार्च दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भाचा कडवा प्रतिकार मोडून काढत मुंबईने घरच्या मैदानावर १६९ धावांनी विजय मिळवला आणि विजेतेपदावर नाव कोरले.

या हंगामातील मुंबई संघाच्या कामगिरीवर नजर फिरवल्यास आढळून येईल की, कर्णधार अजिंक्य राहाणेने आपल्या लौकिकाला जागत संपूर्ण मौसमात संघाचे उत्कृष्ट नेतृत्व केले आणि विजेतेपदात सिंहाचा वाटा उचलला. त्याचा स्वत:चा फलंदाजीचा फॉर्म खूपच वाईट राहिला आणि पूर्ण स्पर्धेत त्याला केवळ दोन अर्धशतके करता आली. त्यातील दुसरे अर्धशतक अंतिम सामन्यात दुसऱ्या डावात मोक्याच्या क्षणी आले. पण आपल्या फलंदाजीतील अपयशाचा परिणाम त्याने आपल्या कप्तानीवर अजिबात होऊ दिला नाही आणि नव्या-जुन्या खेळाडूंची सुरेख मोट बांधत त्यांच्याकडून अप्रतिम सांघिक कामगिरी करून घेतली. भारतीय संघातून बाहेर पडल्यामुळे अजिंक्य पूर्ण हंगाम मुंबई संघाबरोबर राहिला, ज्याचा त्याने संघाला पूर्ण फायदा करून दिला. दोन साखळी सामन्यांमध्ये दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही पण तेव्हाही त्याने संघाबरोबर राहात योग्य ते मार्गदर्शन केले.

या हंगामात मुंबईकडून अजिंक्यशिवाय श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शिवम दुबे, सर्फराज खान, शार्दुल ठाकूर, धवल कुळकर्णी अश्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबरच अनेक युवा, होतकरू खेळाडू खेळले. जसे की फलंदाजांमध्ये भुपेन लालवानी, मुशिर खान, सुवेद पारकर, सूर्यांश शेडगे वगैरे तर यष्टीरक्षक म्हणून हार्दिक तामोरे व प्रसाद पवार. गोलंदाजांमध्ये तनुष कोटीयन, शम्स मुलानी, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, अथर्व अंकोलेकर, रॉयस्टन डायस इत्यादी. या हंगामात मोठा नावलौकिक असणाऱ्या फलंदाजांना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी फारशी करता आली नाही. उलट गोलंदाजांनी सातत्याने बळी मिळवतानाच वेळोवेळी फलंदाजीत चमक दाखवत संघाला अडचणीच्या वेळी सावरले. यामध्ये शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, तुषार देशपांडे यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

बडोद्याविरुद्ध उपउपांत्य सामन्यात पहिल्या डावात नवोदित मुशीर खानने द्विशतक ठोकले. मोक्याच्या क्षणी वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने दोन शतकवीरांना बाद करत पहिल्या डावातील महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. तर दुसऱ्या डावात दहाव्या व अकराव्या क्रमांकावरील तनुष व तुषारने शतके झळकावत विश्वविक्रमाची बरोबरी केली. उपांत्य सामन्यात संघ ७ बाद १०६ असा अडचणीत सापडला असताना शार्दुल ठाकूरने झंझावाती शतक ठोकत आणि नंतर गोलंदाजीतही चमक दाखवत तामिळनाडूला नेस्तनाबूत केले. त्याला तामोरे, तनुष, तुषार, मुशीर यांची चांगली साथ मिळाली. अंतिम सामन्यात प्रथम मुंबईला २२४ पर्यंतच मजल मारता आली ज्यात शार्दुलचा ७५ धावांचा मोलाचा वाटा होता. पण विदर्भचा डावही अवघ्या १०५ धावांत गुंडाळला गेला ज्यात कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळणाऱ्या धवलबरोबरच शम्स व तनुषने प्रत्येकी ३ बळी मिळवले. दुसऱ्या डावात मुशीरचे शतक व अजिंक्य, श्रेयस, शम्स यांची अर्धशतके यांच्या जोरावर मुंबईने ४१८ धावा करत विदर्भला विजयासाठी ५३८ धावांचे विशाल लक्ष्य दिले. दुसऱ्या डावात कर्णधार वाडकरच्या शतकी खेळीच्या जोरावर विदर्भने चांगली लढत दिली व सामना पाचव्या दिवसावर नेला. पण शेवटी कोटीयनने ईतर गोलंदांच्या साथीने त्यांचा डाव गुंडाळला आणि मुंबईला १६९ धावांनी विजय मिळवून देत करंडकावर मुंबईचे नाव कोरले.

साखळी सामन्यांमध्ये शिवम दुबेने चांगली फलंदाजी केली तर बाद फेरीच्या सामन्यांमध्ये युवा मुशीर खानने धमाकेदार अष्टपैलू कामगिरी करत छाप पाडली. पृथ्वी शॉने अधूनमधून त्याच्या धडाकेबाज शैलीत धावा केल्या. श्रेयसचा फॉर्म अंतिम सामना वगळता चांगला नव्हता. ऑफ स्पिनर तनुष कोटीयनने ५०० धावा आणि २९ बळी घेत मालिकावीराचा बहुमान मिळवला. डावखु-या शम्स मुलानीने बळी मिळवतानाच आपल्या फलंदाजीनेही वेळोवेळी संघाला सावरले आणि राष्ट्रीय संघातील रवींद्र जाडेजा व अक्षर पटेल यांच्या अष्टपैलू कामगिरीची आठवण करून दिली. यष्टीरक्षक हार्दिक तामोरेने चिवट फलंदाजी करतानाच यष्टिंमागे चांगली कामगिरी केली. वेगवान गोलंदाज मोहित अवस्थीने संपूर्ण मोसमात प्रभावी गोलंदाजी करत बळी मिळवले.

या सर्वांबरोबरच प्रशिक्षक ओंकार साळवी आणि ईतर सपोर्ट स्टाफ यांचा संघाच्या यशात मोठा वाटा राहिला. जून २०२३ मध्ये संघाचे बंगळुरूजवळील अळूर येथे पहिले हंगामपूर्व १५ दिवसांचे निवासी शिबिर झाले आणि तेव्हापासूनच संघाची जोरदार, नियोजनबद्ध तयारी चालू झाली. या शिबिरात आणि नंतर वेळोवेळी सामन्यांदरम्यान झालेल्या संघबैठका आणि सरावसत्रांमध्ये कामगिरी उंचावण्यासाठी व ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रम, सराव, तंदुरुस्ती, कौशल्य सुधारणा याबरोबरच सकारात्मक मनोभूमिकेसाठी निकोप चर्चा, तंत्रज्ञान, समाजमाध्यमे, संगीत यांची मदत घेतली गेली. ‘मुंबई क्रिकेट असोसीएशन’नेही सतत संघाबरोबर संपर्क ठेवत त्यांना हरप्रकारे पाठिंबा दिला. या सर्व प्रामाणिक प्रयत्नांची परिणीती अंतिम यशात झाली. स्पर्धा जिंकल्यानंतर ‘बीसीसीआय’बरोबरच ‘एमसीए’नेही संघाला ५ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला.

याशिवाय यंदाच्या रणजी स्पर्धेतील ईतर काही प्रमुख क्षणचित्रे खालीलप्रमाणे सांगता येतील :

-आंध्रच्या रिकी भुई याने सर्वाधिक ९०२ धावा केल्या,

-तामिळनाडूच्या साईकिशोरने सर्वाधिक ५३ बळी मिळवले,

-कर्नाटकचा यष्टीरक्षक शरथने सर्वाधिक ३१ जणांना बाद केले,

-केरळच्या जलज सक्सेनाने ६८ धावांत ९ बळी घेत एका डावातील सर्वोत्तम गोलंदाजी केली,

-महाराष्ट्राच्या हितेश वाळुंजने १४/१६३ अशी सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवली,

-बडोद्याच्या शिवालीक शर्मा आणि शाश्वत रावत यांनी हिमाचल प्रदेशविरुद्ध पाचव्या विकेटसाठी ३४५

धावांची सर्वोच्च भागीदारी केली,

-गोव्याची ७ बाद ६१८ (डाव घोषित) ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या राहिली,

-उत्तराखंडच्या दीपक धपोलाने एकदा नव्हे तर दोनदा हॅटट्रिक घेतली,

वरील विक्रम उल्लेखनीय असले तरी ‘जो जीता वही सिकंदर’ या न्यायाने कायम स्मरणात राहील ते – विजेतेपद जिंकल्यानंतर मुशीर, पृथ्वी, भुपेन या नवोदितांच्या साथीने शार्दूल, श्रेयस या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी ढोल व संगीताच्या तालावर केलेला जल्लोष, आपल्या प्रथमश्रेणी कारकिर्दीला रामराम ठोकल्यावर भावूक होऊन स्टेडियमला फेरी मारणारा धवल कुळकर्णी आणि जेतेपदाचा करंडक उंचावणारा हसतमुख कर्णधार अजिंक्य रहाणे. आम्हीच ‘रणजीचे राजे’ हे पुन्हा एकदा सिद्ध करणाऱ्या मुंबई संघाचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन!!

– गुरुप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)      

Avatar
About गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर 4 Articles
एका अग्रगण्य राष्ट्रीयकृत बँकेत २६ वर्षे कार्यकाळाचा अनुभव. मराठी साहित्य, खेळ व भारतीय इतिहास यांची विशेष आवड. क्रिकेट व बँकिंग यासंबंधी विविध संकेतस्थळे, मासिके व दिवाळी अंकांतून लिखाण, विशिष्ट संकल्पनांवर आधारित शब्दकोडी रचण्याचा छंद
Contact: Twitter

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..