भारताचं अतिपूर्वेचं राज्य अरुणाचल प्रदेश. त्याच्या सीमेपर्यंत रेल्वेनं जायचं म्हणजे ६० ते ६५ तासांच्या प्रवासाची मानसिक तयारी असावी लागते. हे अतिपूर्वेकडील सर्वांत मोठं राज्य. त्यातच हा चिनी सरहद्दीवरील संवेदनशील प्रदेश. दुर्दैवानं, या ठिकाणी अजूनही रेल्वेचा मागमूसही नाही, घनदाट जंगलांनी संपन्न असलेल्या या अरुणाचल प्रदेशमधील लाकडापासून रेल्वेच्या रुळांमधील स्लीपर्स बनविले जातात. किंबहुना, संपूर्ण भारताच्या रेल्वेलाईनची मदार एक वेळ त्यावर अवलंबून होती; सिमेंटचे स्लीपर्स हे आता आलेले आहेत. अशा या आसाममधील सर्वांत शेवटचं स्टेशन दिब्रुगड. इथून अरुणाचलमध्ये बस, मोटार वा नदीमधून मोटरबोटीने शिरावं लागतं. त्याकरता ‘इनर लाईन परमिट’ घ्यावं लागतं.
अरुणाचल प्रदेशाची संपूर्ण माहिती गोळा करत आम्ही आठ जणांनी रेल्वेनं दिब्रुगडपर्यंत जाण्याचं ठरविलं. हा प्रवास आरामात करायचा व जलद गाड्या पकडायच्या असंही ठरलं. मुंबई ते दिल्ली व दिल्ली ते दिब्रुगड अशा दोन राजधानी एक्सप्रेसनी प्रवासनियोजन केलं. मुंबई-दिल्ली १७ तास, ६ तास दिल्ली स्टेशनवर थांबणं, असं करत दिल्ली ते दिब्रुगड ४० तास, असा हा एकूण प्रवास काळ ६३ तासांचा होता.
भारतात राजधानी एक्सप्रेसचं युग साधारण ३५ ते ४० वर्षांपूर्वी सुरू झालं. प्रथम मुंबई-दिल्ली व कलकत्ता-दिल्ली या दोन गाड्या सुरू झाल्या आणि हळूहळू प्रत्येक राज्याच्या राजधानीतून एक वा दोन गाड्या दिल्लीपर्यंत धावण्यास सुरुवात झाली. या गाड्या सुरू झाल्या तेव्हा त्याबाबत अनेक उलट-सुलट मतं पेपरमध्ये येत होती, पण आता राजधानी एक्सप्रेस गाड्या ह्या भारतीय रेल्वेवरील सर्वांत मानाच्या व कायम मागणी असलेल्या गाड्या आहेत. नवी दिल्ली स्टेशनमध्ये लालचुटूक व पिवळसर रंगाच्या डब्यांच्या गाड्यांची सतत ये-जा चालू असते. संपूर्ण वातानुकूलित (ए.सी.) गाडीला जनरेटर्स. चहा-नाश्ता, लज्जतदार जेवण यांचा समावेश तिकिटातच असल्यामुळे प्रत्येक प्रवासी हा आनंद मनसोक्त लुटत असतो. मुंबई-दिल्ली राजधानी ५०० ते ६०० कि.मी. अंतर न थांबता धावत असते. या मार्गावर आता जर्मनीत बांधलेले डबे आहेत. त्यांत काही सोयी जास्त आहेत, पण भारतात बांधलेले डबेच लोकांच्या जास्त पसंतीस येतात.
या गाडीचा पहिल्या वर्गाचा प्रवास म्हणजे जेवणा-खाण्याची चंगळच असते. घडीची टेबलं मांडून खाण्याच्या पदार्थांचा मारा रेल्वे कर्मचारी तत्परतेने व प्रेमाने करत असतात. झोपण्याचे बर्थ अगदी आलिशान आहेत. धांदलीत विमानाने प्रवास करण्यापेक्षा हा प्रवास सुखद अनुभवाचा आहे.
राजधानी एक्सप्रेसने दिल्ली ते दिब्रुगड प्रवास ४० तासांचा, दोन रात्रींचा!
दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, आसाम, अशी राज्ये ओलांडत जाताना प्रत्येक राज्याची विविधता पाहता येते. या गाडीतील प्रवासीसुद्धा वेगवेगळ्या ढंगांचे! त्यांच्या निरनिराळ्या भाषा प्रवासभर कानांवर पडत असतात. लखनौ, मुगलसराई, बरौनी, न्यु जलपईगुरी, गौहत्ती, अशा भव्य स्टेशनांवर तिला थांबे आहेत. गौहत्ती येण्याअगोदर विशाल ब्रह्मपुत्रेवरील १।। कि.मी. लांबीचा अतिभव्य -कम-मोटाररोड ब्रिज पाहून आपण अवाकच होतो. ब्रिजवरून जाताना गाडीच्या कानांत घुमणाऱ्या कर्कश आवाजाची लय, खोलवर दिसणारं नदीचं संथ पात्र, हे सर्व व्हिडिओमध्ये घेण्याकरता आम्ही दोघे मित्र एकमेकांना घट्ट पकडून दारात उभं राहून शूटिंग केलं होतं. तो एक अविस्मरणीयच अनुभव होता.
गौहत्ती ते दिब्रुगड हा संपूर्ण रात्रभराचा प्रवास. यावेळी गाडी अतिशय कमी वेगात जाते. हा संपूर्ण प्रदेश अशांत आहे आणि त्यात एकेरी मार्ग (सिंगल लाईन)! हा प्रवास करून पहाटे ५ वाजता न्युतीनसुखिया स्टेशनवरील एका छोट्या स्टॉलवरच्या गरम वाफाळलेल्या चहाची लज्जत औरच होती. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी हिरवीगार भातशेती, मध्यात माशांच्या पैदाशीकरता तयार केलेली छोटी तळी, बांबूंवर उभारलेल्या छोट्या झोपड्या, मधून जाणाऱ्या लालचुटुक मातकट पाऊलवाटा, क्षितिजाला भिडलेल्या हिरव्यागार डोंगररांगा, मध्येच भुरभुरणारा पाऊस, काही रस्त्यांच्या कडेनं झालेला चिखलाचा रबाडा. निसर्गाचं असं वेगळं, अविस्मरणीय दृश्य पाहत ३९०० कि.मी.चा प्रवास दिब्रुगडमध्ये पुरा झाला. हा प्रवास पूर्ण केला, की भारताच्या दुसऱ्या टोकाला पावलं लागल्याचा आनंद ओसंडून वाहतो. केवढा पसरलेला भारत आणि त्याच्या कानाकोपऱ्यांत पोहचणारी भारतीय रेल्वे! ६५ तासांच्या प्रवासाचा शिणवटा अजिबात जाणवत नाही. पावलं समाधानानं विशाल ब्रह्मपुत्रेच्या काठाकडे वळतात.
-डॉ. अविनाश वैद्य
Chhan